रविवार, ५ जून, २०१६

सायलीचा निर्णय

सायली म्हणजे आई बाबांचा जीव की प्राण होती. लहानपणापासूनच त्यांनी तिचे अगदी लाडात पालनपोषण केले होते. प्रत्येक आईबाबांना आपली मुले लाडकी असतातच अगदी तस्संच टिपीकल नातं त्यांच्यात होतं.

अगदी शाळेत असल्यापासूनच सायली हुशार होती. वर्गात नेहमी पहिल्या तीनाच्या आतच नंबर काढायची. तिच्या मैत्रिणींना तिचा खुप हेवा वाटायचा. आईबाबांनाही लेकीचा अभिमान तर शिक्षकांना खुप कौतुक वाटायचे.

हळूहळू सायली मोठी होऊ लागली. आता ती बारावीत गेली होती. तिचे वागणेही हल्ली जबाबदारीचे वाटत होते. बारावीच्या वर्गात गेल्यावर जणू काही मुले शहाण्यासारखी वागू लागतात असं लॉजीक की एक सुप्त टेन्शन मुलांच्या मनात असतं ही सत्यता...पण मुलं थोडी दडपणाखाली वावरतातच.

तसा सायलीचा आभ्यास मस्तच चालला होता. बारावी विज्ञान शाखेतून तिने प्रवेश घेतला होता. आज सकाळी सकाळीच सायली थोडी नाराज दिसत होती. काम करता करता तिच्या आईचे लक्ष तिच्याकडे गेले.

"बाळ, काय झालं? आज नाराज का दिसत आहेस बेटा?"

"काही नाही आई..."

"कसलं टेन्शन वैगेरे आहे का गं? मला सांगायला हरकत नाही."

"आई, मी तुमचे स्वप्न पूर्ण नाही करु शकले तर??"

या प्रश्नावर आई दचकून गेली. आईचा चेहरा पडला. उसने हसू आणून ती म्हणाली, "बाळ अगं असं काय म्हणत आहेस आज?"

"असंच." सायलीचा चेहरा केविलवाणा दिसत होता.

सायली एक वाक्य बोलून गेली आणि आईच्या मनात जणू वादळ घोंगावू लागले. सायलीच्या बारावीच्या परिक्षेऐवजी तिच्या मनाच्या घालमेलीने आई अस्वस्थ झाली होती.

संध्याकाळी कामातून सायलीचे बाबा घरी आले. सायलीच्या आईकडून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. हातपाय धुऊन मग ते सायलीच्या आभ्यासाच्या खोलीत गेले.
सायली आभ्यासात मग्न होती. बाबांनी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.

"बेटा, घाबरायचे नाही...मी आहे ना." बाबांच्या डोळ्यांत पाणी आले.

बाबांनी दिलेला धीर पाहून सायली त्यांना बिलगली. एकूलती एक मुलगी अशी परीक्षेच्या टेन्शनमध्ये असणे बाबांना रुचले नाही. म्हणूनच ते सायलीला धीर देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू लागले.

आईबाबा खंबीरपणे पाठीशी असल्याने सायलीचे टेन्शन थोडे कमी झाले.

"आपल्यापरीने भरपूर प्रयत्न करायचा. अपयश आले तरी खचून जायचे नाही. पुन्हा प्रयत्न करायचा...यश मिळेपर्यंत हा सिलसिला सुरु ठेवायचा." हा अगदी मौल्यवान कानमंत्र बाबांनी सायलीला देऊन ठेवला होता.

पुढे दिवस निघून गेले. आणि परिक्षेचे दिवस सुरु झाले. सायलीचा आभ्यास जोर धरु लागला. पेपर सोपे जात होते. आज शेवटचा पेपर होता.

सायली निघून तयार झाली. आईबाबांच्या पाया पडली. देवालाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडली. पण आज सायलीचे शरीर तिला साथ देत नव्हते. शाळेत जाता जाता तिचे अंग तापाने फणफणले. पण इलाज नव्हता. पेपर वेळेत सुरु होणार असल्याने तिला डॉक्टरकडे जायला मिळाले नाही. तशाच अवस्थेत ती पेपर लिहीत होती. तिचे हात थरथर करत होते. अक्षरे नीटशी वळत नव्हती. लिखाणाचा स्पीड कमी झाला..त्यातच भर म्हणून वाचलेलेही विस्मरणात गेले की काय असे तिला वाटू लागले. या सर्वाचा एकत्रित परिणाम व्हायचा तोच झाला. सायलीला शेवटचा पेपर कठीण गेला.

पेपर सुटला. सायलीच्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेले. तेथून मग ती तिच्या घरी गेली. रात्रीपर्यंत ताप कमी झाला होता. पण आजच्या दिवसातील घडामोडी तिने घरी मात्र सांगीतल्या नाहीत.

परीक्षा संपल्याने आई बाबांचे टेन्शन साफ उतरले होते परंतू त्या दिवसापासून सायली मात्र अस्वस्थ वाटत होती.

'काय करावं? आई बाबांना कसं सांगावं? त्यांना वाईट तर वाटणार नाही?' हे विचारचक्र तिच्या मनात सुरु होते. त्यापुढचा जवळजवळ दीडेक महीना असाच गेला.

आज बारावीच्या निकालाचा दिवस होता. आईबाबा आणि इतर नातेवाईकांची सुद्घा सायलीच्या निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र निकाल काय असेल याची पूरेपूर जाणीव सायलीला होती. तिचा चेहराच जणू ते व्यक्त करीत होता.

सकाळी नेहमीप्रमाणे ऊठून ती तयार झाली. देवाला नमस्कार केला. आई बाबांच्या पाया पडली आणि रिझल्ट आणायला घराबाहेर पडली.

दुपार झाली. तिचे आईबाबा घरी तिची आतुरतेने वाट बघत होते. बघता बघता संध्याकाळही व्हायला आली. तरीही सायलीचा पत्ता नव्हता. आई बाबांची चिंता वाढू लागली. कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडे चौकशी करुन झाली. त्यांच्याकडून सायली नापास झाल्याचे कळताच ते दोघेही पुरते हादरुन गेले.

आता पोलिस स्टेशन गाठण्याशिवाय दुसरा मार्गच त्यांना सूचेना..'मुलीने जीवाचं काही बरंवाईट.....' असे चित्रविचित्र विचार मनात वादळासारखे घोंगावू लागले.

सायलीच्या आईबाबांना या विचारांनी जणू घामच फुटला होता. सायली म्हणजे त्या दोघांच्याही काळजाचा तुकडा होता. झपाझप पावले टाकत, धावत ते दोघेही पोलिस स्टेशनच्या दिशेन निघाले. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूधारा ओघळत होत्या.

कसेबसे ते पोलिस स्टेशनला पोहोचले. तिथे रडतच सर्व हकीकत उपस्थित पोलिसांना सांगितली.

'नुकताच कुठल्यातरी एका मुलीने नदीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केलाय. तिला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात अॅम्ब्यूलन्समधून आणले आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.' अशी वार्ता तेव्हा तिथल्या पोलिसांकडून त्यांना मिळाली आणि सायलीच्या आईने हंबरडाच फोडला. घाबरुन दोघांचीही मोठ्याने रडारड सुरु झाली. मग पोलिसांच्याच गाडीतून त्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आले.

पोलिसांच्या गाडीतून उतरल्या बरोबर पंचनामा करणारे दोन पोलिस जवळ येऊन म्हणाले, "सायली जाधव तुमचीच मुलगी का? तुम्ही तिचेच आईवडील का??"

या पोलिसांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे भान विसरुन दोघेही धाय मोकलून रडू लागले. त्यांचे जणू अवसानच गळाले. त्यांच्या दृष्टीने आता सारे काही संपले होते.

"अहो सायलीचे आई बाबा तुम्ही रडताय कशाला??"

रडता रडताच पोलिसाचे आश्चर्यकारक बोलणे त्यांच्या कानी पडले.

"अहो खरंच ! तुम्हाला तर आनंद वाटायला पाहजे. तुमच्या सायलीची कर्तबगारी महान आहे. तुम्हाला तिचा अभिमान वाटायला हवा." पोलिस हसऱ्या चेहऱ्यानेच म्हणाला.

सायलीचे आईबाबा चक्रावून गेले. नक्की काय झालंय कळेना. अश्रू पुसता पुसताच बाबांनी विचारलं, "म्हणजे? तुम्ही नक्की काय म्हणताय?"

"अहो तुमच्या सायलीने आज नदीत उडी मारलेल्या एका मुलीचा जीव वाचवलाय. नुसताच अभिमान नव्हे तर 'वीरता' पुरस्कार मिळायला हवाय तिला अशी कामगिरी केलेय तिने !"

हे वाक्य ऐकल्याबरोबर सायलीच्या आईबाबांचा चेहरा खुलला. त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना हायसे वाटले. तोच त्यांना रुग्णालयातून सायली बाहेर पडताना दिसली. तिचा चेहरा आनंदीत होता. आईने तिला जवळ घेतले.

"सायली बेटा...आम्ही खुप घाबरलो होतो. तुला घरी यायला ऊशीर झाल्याचं खरं कारण आता लक्षात येतंय आमच्या."

"हो बाबा...ती मुलगी नापास झाली होती. पण तिने चुकीचा मार्ग पत्करला होता. बाबा जीव दिल्याने प्रश्न सुटत नाहीच, उलट वाढतो. आयुष्यभर आपल्या जीवलगांना ते कडवं सत्य पचवताच येत नाही. आणि हो...जीव देणं म्हणजे शूरपणा नाहीच. असं मरण्यापेक्षा परिस्थितीशी प्रयत्नांनी लढून, सामना करुन जिंकलेलं कधीही चांगलं..."

"आपली पोर आता खरंच मोठी आणि हुश्शार झालीय हं." सायलीची आई हसतच म्हणाली.

"मग, मुलगी कुणाची आहे..." बाबाही हसतच म्हणाले.

"बाबा, मी सुद्धा नापास झालीय. पण मी हार मानणार नाही. पुन्हा जोमाने प्रयत्न करेन."

सायली भलेही नापास झाली होती...पण तरीही बाबांनी मोठ्या अभिमानाने लेकीचे कौतूक करीत सर्वच नातेवाईकांना पेढे वाटले.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 लेखन-श्री. प्रविण निकम



बुधवार, १ जून, २०१६

मैत्री

साधारण १९९० चा काळ. त्या संध्याकाळी ती थोडी निराश वाटत होती. तिचा मूड अजिबात चांगला नव्हता हे तिच्या अबोल ओठांनी आणि बोलक्या डोळ्यांनीच कळत होते. एक वेगळाच असा अस्वस्थपणा तिच्या डोळ्यांत जाणवत होता. पण त्याचे कारण मात्र उमगत नव्हते. आणि विचारण्यासाठी सुद्धा ती वेळ योग्य नव्हतीच. कारण विचारले असते तरी उत्तर मिळाले नसतेच. जणू काही त्या बागेतील फुललेली फुले सुद्धा कोमेजून गेलीत की काय असे वाटत होते.

महेश सकाळी अगदी लवकर उठला.
लालीच्या विचारांत त्याची आख्खी रात्र निघून गेली होती. नेहमी व्यक्त होणारी लाली अचानक गप्प आणि भावनाविवश अवस्थेत पाहून तो सुद्धा थोडा हबकलाच होता.
त्याने सायकलला पायंडल मारले आणि तडक लालीच्या घरी पोहोचला.

"मावशी लाली कुठंय?" महेशने विचारले.

"अरे ती तर मघाशीच निघून गेली घरातून."

"पण कुठे?"

"अरे ऑफीसला जाते एवढंच म्हणाली."

महेश आणि लाली चांगले फ्रेंड्स होते. अगदी त्या युगातली छान मैत्री जणू. पण महेशला ती मैत्रीच्याही पलिकडे कुणीतरी भासत होती. पण त्याने तसे तिला अजिबात जाणवू दिले नव्हते. खरं तर लाली हे तिचं घरचं लाडाचं नाव होतं परंतु खरं नाव लीला होतं. दिसायला रेखीव, सुंदर अशी लाली सर्वांना आवडेल अशीच होती.

महेशच्या मनात वेगळीच शंका येत होती. लाली आपल्याला टाळतेय की काय असा विचार पटकन त्याच्या मनात येऊन गेला परंतू त्याने लागलीच स्वत:ची समजूत घातली.

महेश लालीच्या घरुन तडक निघाला तो ऑफीसच्या दिशेने. ऑफीसला पोहचल्यावरही त्याला लाली तिथे आलीच नाही असे समजले. काय भानगड आहे काही कळायलाच मार्ग नव्हता. आता फक्त एकच ठिकाण महेशला माहीत होते जिथे लाली जाऊ शकत होती. त्याने पुन्हा सायकलवर टांग टाकली आणि तो निघाला.

गावाच्या बाहेर एक छोटे मंदिर होते. मंदिराच्या दारात सायकलला ब्रेक लागले. महेशने समोर पाहीले. लाली मंदिराच्या पायरीवर एकटीच बसली होती. महेश जवळ गेला. त्याने लालीच्या डोक्यावर आधाराचा हात ठेवला. तशी लाली ढसाढसा हुंदके देऊ लागली. महेशला काहीच कळायला मार्ग नव्हता.

"मला नाही सांगणार?" महेश म्हणाला.

"तुला नाही तर कुणाला सांगणार !" लालीचे डोळे अश्रूंनी भरुन गेले होते.

आणि लाली सांगू लागली....

तिच्या आत्याचा मुलगा जो उच्चशिक्षित होता तो लालीला खुप आवडायचा. जणू मनातच बसला होता. लालीचेही नशीब चांगले होते. म्हणून तर तिच्या आत्याने लालीच्या आईला 'आम्हाला मुलगी द्याल का' म्हणून विचारले.
त्या मुलाचे नाव विराज होते. विराजच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यानेही होकार दर्शविला होता. परंतू लग्न होईपर्यंत कुठेही गाजावाजा करायचा नाही असे दोन्हा कुटुंबांनी ठरविले होते. कारण लग्न एक वर्षानंतर करायचे अशी नवऱ्याकडील माणसांची अट होती.

आता एक वर्ष पूर्ण व्हायला आले होते परंतू विराजचे कुटुंब लग्नाचा विषय पुढे नेतच नव्हते. आणि लालीच्या घरच्यांनी चौकशी केल्यानंतर जी गोष्ट हाती लागली ती ऐकून लाली हादरलीच. विराजचे त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. आणि त्या मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नाची सक्ती करत होते अन्यथा मुलीची फसवणूक केल्यासंबंधी पोलिसांत जाऊ अशी धमकी देत होते.

लालीचे स्वप्न जणू धुळीस मिळाले होते. पहिल्यांदा आयुष्याचा जोडीदार निवडला पण साऱ्याच गोष्टी चुकल्या. ज्या मनाने संसाराची मोठी स्वप्ने पाहिली तेच मन कोलमडून पडले होते...


लालीचे हुंदके संपतच नव्हते. महेशही हे सारं ऐकून हबकूनच गेला होता. कारण तो सुद्धा लालीचीच स्वप्ने पाहत होता. पण इथे तर चित्र वेगळेच होते. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहेच जणू असे मनाशीच म्हणून महेशने थोडा स्वत:चा मूड सावरला. पण लाली मात्र निराश दिसत होती.

"माझं ऐकशील ?"

"हं..." लाली रडतच म्हणाली.

"जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर."

"पण कसं?"

"मन रमवण्याचा प्रयत्न कर इतर गोष्टींत."

"हं..."

"ती समोर चहाची टपरी दिसतेय ना..चल तिथे आपण थोडा चहा घेऊया." महेशने सुचवलं.

दोघे त्या टपरीच्या दिशेने चालू लागले. गरमागरम चहा घेतला. लालीचा मूड थोडा सुधारल्यासारखा वाटत होता.

"लाली..." महेश हळू आवाजात म्हणाला.

"काय?"

"माझ्याशी लग्न करशील?" आपले स्वप्नही भंग होऊ नये म्हणून उतावीळपणे महेशने प्रश्न विचारला.

"सॉरी हा विषय पुन्हा काढू नकोस महेश."
महेश आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय असा विचार लालीच्या मनात येऊन गेला.

"कृपया तू जा इथून, मला एकटीला राहू दे." लाली थोडी रागानेच बोलली.

"पण तू सायकलवर बस, मी तुला घरी सोडतो."

"अजिबात नको." मी जाईन एकटी.

महेशचा नाईलाज झाला. तो एकटाच सायकलने निघाला. दुसऱ्या दिवशी ऑफीसमध्येही दोघे एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत. रोज ऑफीसमध्ये एकत्र डबा खाणारे जीवलग दोन फ्रेंड्स आता डबाही आणत नव्हते. लालीचं स्वप्न कोलमडलं होतं तसंच महेशचंही स्वप्न भग्न झालं होतं. दोघांच्याही चेहऱ्यावर नाराजीचा सूर होता.
परंतू ऑफिसला येणे गरजेचे होते.

असे चार दिवस निघून गेले. पाचव्या दिवशी लालीचा मूड बऱ्यापैकी सावरला होता. तिने जण एकंदर परिस्थितीचा स्विकार केला होता.
पण आज तिची नजर ज्याला शोधत होती तो महेश मात्र ऑफिसला आला नव्हता. बोलत नसले तरी त्याच्याबद्दल मनातून लालीलाही आपुलकी काळजी होतीच. महेश का आला नसेल या विचाराने ती थोडी अस्वस्थ दिसत होती. तरीही तिने इतर कारकुनांना विचारले पण कुणालाच काही पत्ता नव्हता. आता मात्र काळजीने ती हैराण झाली. जेवणाच्या सुटीत तडक ऑफिसबाहेर पडली. आणि झपाझप पावले टाकत निघाली.

थोड्या वेळातच ती मंदिराजवळ पोहोचली. महेश सुन्नावस्थेत पायरीवर बसला होता. नजर शून्यात होती. अचानक त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरला. त्याने वळून पाहीले आणि तो स्तब्ध झाला.

"रागावलास माझ्यावर?"

"नाही गं, कशाला रागवेन."

"मग बोलत का नव्हतास?"

"तूच म्हणाली होतीस बोलू नकोस म्हणून."

थोडा वेळ दोघेही स्तब्ध झाले. दोघांचेही डोळे भरुन आले होते.

"मी सुद्धा माणूसच आहे ना रे !" हुंदके देत लाली म्हणाली.

"माहीत नाही का मला.." महेशचेही अश्रू टपकू लागले.

"पण आता मी सावरलीय चांगल्याप्रकारे."

"मलाही थोडा वेळ लागेल पण मी सुद्धा सावरेन गं..." महेशनेही तिला शब्द दिला.

मध्ये काही दिवस निघून गेले. महेशही बऱ्यापैकी सावरला. खरी परिस्थिती एकदा का मनाने स्विकारली की मग त्रास कमी होतो हे सत्य दोघांनीही आजमावले. त्यामुळेच तेथून पुढे त्यांची मैत्री कुठल्याही अपेक्षेविना बहरली. स्त्री आणि पुरुषामध्ये स्वार्थापलिकडचं आणि आणि अपेक्षांपलिकडचंही एक निखळ मैत्रीचं नातं असू शकतं हे त्यांनी जणू सिद्धच केलं होतं.

____________________________________

लेखन- श्री. प्रविण निकम©

गणपतराव आणि जादूचा दिवा

गणपतरावांचे घर म्हणजे जणू काही पूर्वीच्या काळातील (राज)वाडाच..!! घराची सर्व रचना पुरातन काळाला शोभेल अशी...

त्या दिवशी रविवार होता. गणपतरावांनी ठरवलं की आज जरा घराची साफसफाई करुन घ्यावी. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते मग कंटाळा करत नाहीत. मग ते जणू काही अभियानच राबवतायत की काय असा घरच्यांचा समज होतो. ते माळ्यावर चढले. हातात झाडू, खराटा घेतला. खुप दिवस माळ्याकडे दूर्लक्ष झाले होते. सर्व डेडस्टॉक मालमटरेल( मटेरियल) तिथे कोंबून कोंबून ठेवला होता. तो सर्व पसारा पाहून मग त्यांना भलतेच स्फुरण चढले. जणू काही तलवारच हाती घेतल्याप्रमाणे त्यांनी झाडू हाती घेतला. आणि लढाईत तलवार चालवतात तशी माळ्यावर तलवार चालवू लागले. आणि जाळी जळमटांमध्ये अडकून पडलेल्या आठ पायांच्या कोळ्यांना शत्रू समजून त्यांच्यावर तुटून पडले...

.........मध्येच चुकून "हर हर महादेव" ओरडले आणि गणपतरावांची बायको धावत आली. तेव्हा कुठे ते भानावर आले. आपण लढाई नव्हे तर साफसफाई करतोय हे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ७/८ कोळी, ५ झुरळे धारातीर्थी पडली होती.

साफसफाई करता करता गणपतरावांचे एका वस्तूकडे लक्ष गेले आणि ते थोडे चकीतच झाले. कोपऱ्यात चक्क एक दिवा होता. थोडा चमकत होता. ते त्वरेने दिव्याकडे झुकले. दिवा हातात घेतला. आणि गणपतरावांना गोष्टीतल्या त्या 'अल्लादिन आणि जादूच्या दिव्या'ची आठवण झाली. लहानपणी गोष्टींतून त्याबाबत अगदी भरभरुन वाचले होते. 'हा दिवा सुद्धा त्याच पठडीतला तर नाही ना...' असे त्यांना वाटून गेले.

गणपतरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी वरचेवर दिवा हाताने घासून बघीतला. तर त्यातून राक्षस बाहेर आलाच नाही. उलट त्यांचेच हात काळे झाले. ते वैतागले. परंतु त्यात नक्कीच काहीतरी जादू असावी असा त्यांचा ठाम समज होता. पण दिवा घासला तरी राक्षस कसा बाहेर येत नाही...या विचाराने ते हैराण झाले.

हॅत्तेच्या...! त्यांचे चुकले होते. त्या दिव्यात तर सेल होते. त्यांनी लगोलग त्यांच्याकडील विजेरीतील nippo चे दोन सेल काढले आणि दिव्यात टाकले....आणि अहो आश्चर्यम्....!!!!

दिव्यातून चक्क राक्षस बाहेर पडला...हा राक्षस आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना असा विचार करतात न करतात तोच त्या राक्षसाने गणपतरावांच्या पायांवर लोळण घेतली. तो त्यांचे आभार मानू लागला.

"अरे पण झालेय काय, पाया का पडतोस?"

"काय करणार साहेब, मला जायचे होते अल्लादिनच्या दिव्यात पण मागील १२ वर्षांपासून भूलचुकीने या तुमच्या दिव्यात आलो नी अडकून पडलो. थँक्स तुम्ही मला शोधून काढल्याबद्दल.."-राक्षस गयावया करत म्हणाला.

हा राक्षस इंग्लिश कुठे शिकला हे विचारण्याचा गणपतरावांना अतोनात मोह झाला होता...पण जाऊदे म्हणून त्यांनी टाळलं...

"साहेब, मला मुक्त करा...."-राक्षस

"अरे पण कसं?"-गणपतरावांची शंका

"साहेब, दर बारा वर्षांनी मला दिव्यातून कायमस्वरुपी मुक्त होण्याची संधी असते. बारा वर्षांनंतर कुठलीही ३ कामे करुन देण्यात मी यशस्वी झालो तर कायमस्वरुपी माझी मुक्तता होईल. पण ती कामे मी सूचवू शकत नाही हेच माझे दुर्दैव...! तुम्ही माझ्याकडून कुठलीही ३ कामे करुन घेऊ शकताय..."

"पण अल्लादिनच्या गोष्टीत तर तू खुप काही करायचास...आणि माझी फक्त तीनच कामे?"- गणपतरावांनी नाराजी व्यक्त केली.

"हो साहेब, आता माझीही शक्ती संपत आलेय. माझ्या खात्यात फक्त शेवटची ३ कामे उरलीत. ती करुन दिली की मी मुक्त होईन त्यातले एखादे काम जरी मी करु शकलो नाही तर पुन्हा मी त्या दिव्यात अडकून पडेन, मग मात्र माझी सुटका पुढच्या बारा वर्षांनंतरच...!!!"

गणपतरावांनाही मग त्या राक्षसाची दया आली. चला तीन तर तीन..काही हरकत नाही...

"सांगा काय करु साहेब?"-राक्षसाला मुक्त होण्याची घाई झाली होती.

"पण सांगताना अगोदर एक दोन साडेमाडे तीन असं म्हणून मगच पुढे काम सांगायचं...!!!"-राक्षसाने नियम सांगीतला.

'च्यामारी....भलत्याच अटी आहेत याच्या ' असं मनातल्या मनात म्हणून काय मागावं हा गणपतराव विचार करु लागले.

"एक दोन साडे माडे तीन...जा मला पंचपक्वानाचं भरलेलं ताट आण..."

गणपतराव खादाड आहते हे त्याच्या लक्षात आलं...त्याने झपकन हवेत हात फिरवून पंचपक्वानांनी भरलेलं ताट त्यांच्यापुढे सादर केलं...

"साहेब, दुसरं काम सांगा..."

"एक दोन साडे माडे तीन...जा माझ्यासाठी उंचीतले कपडे आण....!!!"

त्यांच्या मागण्या किती संकुचित आहेत हे राक्षसाने ओळखलं असावं बहुतेक. त्याने हवेत हात फिरवला आणि काय आश्चर्य...भारीतले कपडे हजर...!!!

गणपतराव भलतेच खुश झाले.


"आता शेवटचे काम सांगा साहेब, म्हणजे मी मुक्त होऊ शकेन..."-आता राक्षसाच्या चेहऱ्यावरही टवटवी आली होती.

आता शेवटची मागणी मात्र संकुचित करायची नाही. आता काही तरी मोठ्ठं मागायचं असं गणपतरावांनी ठरवलं....आणि केली सुरुवात....

"एक दोन साडे माडे तीन...मला जगातला सर्वात यशस्वी पुरुष बनव....!!!"

आणि काय आश्चर्य....!!!!! दिव्यातून धूर बाहेर पडला...आणि पाहतात तर काय...राक्षस पुन्हा दिव्यात...!!!!

गणपतराव गोंधळून गेले. पाहतात तर काय...दिव्यातून राक्षस मोठमोठ्याने रडत होता.

"अरे पण झाले तरी काय नक्की...?"

"साहेब...तुम्ही पंचपक्वानांचं ताट मागीतलंत. ते मला शक्य होतं. एका मोठ्या सेव्हन स्टार हॉटेलमधून ते मी आणून दिलं...तुम्ही भारीतली कपडे मागीतलेत...ते सुद्धा एका महागड्या मॉलमधून मी आणून दिले..."

"मग?????"- गणपतरावांनी आश्चर्याने विचारले.

"अहो, पण यशस्वी असे सहजासहजी नाही होता येत...जीवनात यशस्वी व्हायला कुठलाच शॉर्टकट नाहीय या विश्वात. त्यासाठी अतोनात प्रयत्न, मेहनत, चिकाटी, हिम्मत..याच गोष्टी कराव्या लागतात. आयतेच कुणीही यशस्वी झालेले मला तरी आठवत नाही. आणि तुम्हाला यशस्वी बनवणं मला शक्य नसल्यामुळेच मी पुन्हा बारा वर्षांसाठी दिव्यात अडकून पडलो..."

गणपतरावांनी केवढी मोठी चूक केली होती ती त्यांच्या लक्षात आली. त्यांच्यामुळेच राक्षस पुन्हा दिव्यात अडकून पडला हे पाहून गणपतरावांना वाईट वाटले...

पण पुढील बारा वर्षांनी मात्र मी तुझी अवश्य सुटका करीन असे त्याला आश्वासन देऊन गणपतराव माळ्यावरुन खाली उतरले.

आणि इथून पुढे यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घ्यायची, प्रयत्नांची पराकाष्टा करायची असे गणपतरावांनी मनोमन ठरवले.....


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 लेखन-प्रविणसर

स्वर्गाची (रिटर्न) वारी !

आमच्या गावातले गोपीचंद मास्तर १० वेळा स्वर्गात जाऊन आलेत अशी गावभर चर्चा होती. पण ते स्वर्गात गेले कसे आणि कुठून हे मात्र कळायला अजिबात मार्ग नव्हता. चांगलं वागलं की माणूस स्वर्गात जातो आणि वाईट वागलं की नरकात एवढंच काय ते आम्हाला माहीत होतं. पण हे मास्तर चक्क १० वेळा स्वर्गात जाऊन आले म्हणजे कम्मालच होती. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. शेवटी ठरले या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.

एके दिवशी गोपीचंद मास्तर आपल्या जावयाकडे वस्तीचे राहायला गेल्याची संधी साधून इकडे गावाने मिटींग बसवली.

"मास्तर गावात राहूनही स्वर्गात जाण्याचा आम्हाला पत्ता लागून देत नाहीत म्हणजे काय...!!! आम्हाला पण जायचंय स्वर्गात..."
-नामदेव पवार बरळला.

"आरं पण त्यासाठी मरावं लागतं. तू हायेस का मरायला तयार बोल?" धोंडोबाने फिरकी घेतली.

"आरं मास्तर पण जीतं हायेत न्हवं, मं ते कसं काय गेलं स्वर्गास्नी??"

या पांडूच्या प्रश्नावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. उद्या मास्तर आले की त्यांना जाब विचारायलाच हवा असा निर्णय ठरला...

"जायचं तर सगळ्यांनीच जायचं स्वर्गात, नाहीतर कुणीच नाही, मास्तरानी पण नाही..!!!"- गावच्या प्रमुखानं निर्णय दिला.

कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि आम्ही मास्तरांना विचारतोय असा विचार करुन जो तो झोपी गेला.

दुसरा दिवस उजाडला. सगळे ऊठले. मास्तर नुकतेच आले होते घरी. एकेक करता सारा गाव मास्तरांच्या घरी जमला...गावाच्या समोर मास्तरांना बसवले...

"मास्तर, आता नाय म्हणू नका...पण तुमी स्वर्गात जाऊन आलाय बऱ्याच वेळा हे आम्हास्नी ठाऊक झालंय...!!!"

मास्तरांच्या जीवात जीव आला...नाहीतर आख्खा गाव कशासाठी घरी जमलाय या विचाराने त्यांची पाचावर धारण बसली होती.

"अच्छा अच्छा ते होय...!!! मला आला कंटाळा की जातो स्वर्गात...आणि परत यावंस वाटलं की येतो परत..." मास्तरांनी पुडी सोडली...

"मास्तर माझा बा भेटला काय हो तिकडं? हीथं नुसता दारु ढोसायचा..."- सदा घोडकेने विचारलं.

"अरे बाबा, तुम्हाला माहीत आहे ना वाईट गोष्टी केल्या की माणूस नरकात जातो...मग तुझा बाप स्वर्गात कसा भेटणार....!!!"
-मास्तर.

"म्हणजे आम्हाला स्वर्गात जायचं तर कायतरी चांगलं काम करावं लागणार की काय?"- शेवंतानं डेअरिंग करुन विचारलं...

"हो तर, त्या शिवाय का जाता येणार आहे?...तुम्ही सगळ्यांनी चांगलं वागायला सुरुवात करा...एका महीन्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना जरुर स्वर्गात घेऊन जाईन..."- मास्तरांनी आश्वासन दिलं.

गावकऱ्यांनी कसं चांगलं वागायचं, कोणत्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या मास्तरांकडून समजावून घेतल्या.

त्या दिवसापासून गावात, आणि गावातील माणसांच्यात अमुलाग्र बदल झाला. नेहमी खोटं बोलणारे अगदी खरं बोलू लागले. शाळेत न जाणारी ऊनाड मुले शाळेत जाऊ लागली. दारु आणि व्यसनं करणाऱ्यांनी सारी व्यसनं सोडली. प्रत्येकाची अगणं स्वच्छ झाली. रंगरंगोटी झाली. वैयक्तीक स्वच्छता वाढली. लोक एकमेकांशी प्रेमभावनेने बोलू लागले, एकमेकांना मदत करु लागले. प्रत्येकाने अतिशय सभ्यपणा स्विकारला होता. कारण स्वर्गात प्रत्येकालाच जायचे होते.

महीना संपला. १ तारखेला ठरल्याप्रमाणे गावकरी मास्तरांच्या घरी जमा झाले. मास्तरांनीही होकार दिला. आणि सुरु झाली स्वर्गाची वारी...!!!

'आपल्याला स्वर्गात बसने जायचं आहे' असं मास्तरांनी सांगताच सस्पेन्स वाढला. सगळे बसस्टॉपवर ऊभे होते.

'स्वर्गात जाणारी बस कुठली?'
'ड्रायव्हर कोण असतो'
नुसती चर्चा.

शेवटी एक रिकामी बस आलीच आणि मास्तरांनी सगळ्यांना बसमध्ये बसण्याची सूचना केली. ड्रायव्हर आपल्यासारखाच साधा माणूस बघून सारे अवाक् झाले.

आणि गाडीचा स्वर्गाच्या दिशेने प्रवास सूरु झाला. सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती.
 काही अंतर प्रवास केल्यावर अचानक गाडीला ब्रेक लागले...!!! उत्सुकतेने प्रत्येकजण खाली उतरला...समोर होती एक मस्त मोठी इमारत...प्रवेशद्वारावर भली मोठी पाटी- 'स्वर्ग'...!!!

प्रत्येकाने स्वर्गात प्रवेश केला. वाह..! लई भारी. रंगरंगोटी जिकडेतिकडे, गार हवा, थंड पाणी, सरबते, पंचपक्वाने...!!! गावकरी भारावून गेले. पक्वानं वाढायला सुंदर अशा अप्सराही होत्या. सर्वांनी खाण्याची मजा लुटली.

"चला आता तुम्हाला संपूर्ण स्वर्ग दाखवतो"- असे म्हणून मास्तरांनी गावकऱ्यांना आसपासच्या परिसरात नेले. अतिशय सुंदर घरे, स्वच्छता, चांगुलपणा जिकडेतिकडे पसरल्यासारखा वाटत होता...स्वर्गातील लोक अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या वर्तनाचे वाटत होते...जिकडे तिकडे झाडांनी, फुलांनी शोभा आणली होती. लोकांनी स्वर्गात आणल्याबद्दल मास्तरांचे आभार मानले...! !!

प्रत्येकजण मास्तरांच्या पायांवर डोके ठेवत होता...!!!

मास्तरांनी सर्वांची हात जोडून माफी मागीतली.
"मला माफ करा ग्रामस्थ मंडळींनो...!!!"

सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. काय भानगड आहे ते कुणाच्याही लक्षात येईना.

"मित्रांनो, हा स्वर्ग नसून आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आदर्श गाव आहे...!!! तुम्ही 'स्वर्ग' नावाची जी पाटी वाचलीत ते इथले एक झक्कास उपहारगृह होते स्वर्ग नावाचे. मी तुमच्याशी खोटं बोललो. पण चांगलं वागल्याने इथे पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करता येतो हे तुम्हाला पटवून द्यायचे होते...म्हणून हा सारा खटाटोप...तोही आपल्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून मी पुढाकाराने घडवून आणला..."

लोकांना यावर काय बोलावे तेच कळत नव्हते.
त्यावर सरपंचांनी पुढे होऊन टाळ्या वाजवल्या आणि मग त्यांचे अनुकरण करत आख्खा गाव टाळ्या वाजवू लागला...!!!

"मंडळीनो, मी अशा दहा गावांना आजपर्यंत भेट दिल्यामुळेच मी दहा वेळा स्वर्गात जाऊन आलोय असे तुम्हाला सांगीतले होते."

एव्हाना सगळ्यांची ट्यूब पेटली होती....
स्वर्गाचे अमिष दाखवून मास्तरांनी आपल्याही गावाचा महीन्याभरात जणू स्वर्गच करुन टाकला आहे हे साऱ्यांच्या लक्षात आले...
आणि मग सुरु झाली...आपल्याच स्वत:च्या स्वर्गाची वारी....!!!

 ______लेखन-प्रविण निकम

कौन बनेगा क(रोड)पती

प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना तसेच काहीतरी पण सर्व सोपस्कार पार करुन शेवटी लागलाच नंबर एकदाचा 'कौन बनेगा करोडपती' शो मध्ये....!!!

सोनी टिव्ही म्हटलं की CID आठवतो. पण कौन बनेगा करोडपतीचीही झालर त्याला असतेच. कधी एकदाचा 'हॉट सीट' वर बसतोय असे मला झाले होते कारण एसीमुळे मला जणू गारठाच भरला होता.

"हाय, मै अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शो में आपका हार्दीक स्वागत करता हूँ...!" हे वाक्य ऐकायला माझे कान जणू आसूसले होते.

शेवटी एकदाचा माझा नंबर आला आणि मी हॉटसीट च्या दिशेने धावलो...पण ती हॉटसीट थोडी उंच असल्याने वर चढून बसायला थोडा प्रॉब्लेम झाला पण मी केलं मॅनेज...

आता थोड्याच वेळात मी करोडपती होणार या विचारानेच मला उकळ्या फुटल्या होत्या...


"प्रविणजी आपका स्वागत है...!!! ये रहा पहला सवाल...!!!"- बच्चनजींच्या आवाजाने मी थोडा घाबरुनच गेलो...

"कृपया थोडे हळू आवाजात बोला ना "- मी अशी विनंती करताच बच्चन गांगरले...त्यांनी रुमालाने चेहरा पुसला आणि कॉम्प्यूटर स्क्रीन कडे बोट दाखवून प्रश्न वाचण्याचा इशारा केला.

मी डोळे फाडून प्रश्न वाचू लागलो. प्रश्न इंग्रजीमध्ये होता.
1. what is the first capital letter of the capital of India??

1. A
2.N
3.m
4.M

मला प्रश्नाचा काही अर्थच लागेना...शाळेत कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स मुलांना शिकवली होती तेवढेच काय ते आठवत होते. माझं नॉलेज घरी विसरुन आलो की काय असे जाणवू लागले...

पण वेळ न दवडता first capital letter म्हणून A दिले ठोकून....

"पक्का???" - इति. अमिताभजी

"हो एकदम पक्का.." -मी

"लॉक कर दूँ?"- बच्चनजी

"ते कशाने करणार, कुलूप आणलेय का??"

माझा मिश्किल स्वभाव नडला. अमिताभजी चष्म्याच्या आतून माझ्याकडे डोळे वटारुन पाहू लागले...
तसा मी लगेच म्हणालो, "करा लॉक हवं तर..!!"

"ये हुई ना बात..कम्प्युटरजी इनका जवाब लॉक कर दो," हसण्याचा आव आणत ते कॉम्प्युटरला म्हणाले...

आणि तिथे स्मशान शांतता पसरली. बहुतेक मी जिंकलो होतो...

"We are sorry pravinji..." आप हार चुके है...आपका जवाब गलत निकला.."

" पण कसे काय?? हे शक्यच नाही..तुमचा कॉम्प्युटर बिघडला असेल.." मी मराठीत हुज्जत घालू लागलो.

तरीही ते काही ऐकेचनात...बाचाबाची अगदी मारामारी पर्यंत पोहोचली...पब्लीकला तर तेवढेच हवे असते. प्रेक्षक असलेल्या पब्लीकनेही मग स्टुडीओची सगळी नासधूस केली...
हॉटसीटचा तर फडशा उडाला होता...
आराथारा पाहून मी आणि बच्चनजींनी तेथून धूम ठोकली...पळता पळता रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर पोहोचलो...दोघांनी दोन कटींग घेतले. पैसे बच्चनजींनीच दिले कारण करोडपती होणार म्हणून मी पैशांचे पाकीट घरीच ठेऊन आलो होतो...

सहज मनात आले च्यामारी "कौन बनेगा करोडपती" मध्ये भाग घेऊन 'रोडपती' होण्याची वेळ माझ्यावर आली होती...!!!

खऱ्याची दुनिया नाही...!!!

--------------------------------

 प्रविण निकम

बापूजी once more...!

कालची संध्याकाळ थोडी वादळीच ठरली. 'वादळी' या शब्दाचं प्रायोजन केवळ सरकारच्या हिवाळी/पावसाळी अधिवेशनावरुन प्रेरणा घेऊन केलेला आहे.

...तर समाजात वावरताना अहिंसेचा मार्ग स्विकारावा की नाही या विषयावरुन मी आणि माझ्या पत्नीमध्ये शीतयुद्ध पेटले. माझ्या स्वभावधर्मानुसार 'जशास तसे' या फंड्याचे मी समर्थन करीत होतो तर माझी पत्नी अहिंसेनेच जग जिंकता येते हे मला पटविण्याचा आटापिटा करत होती. पण एक दोन वाक्यातच ऐकून घेणारा तो मी नाहीच..!!! आमच्यात शाब्दीक चकमकी सुरु असताना अचानक दारावरची बेल 'trrrrriiiiiing......' अशी वाजली. आमच्यात आता तुंबळ शाब्दीक युद्ध सुरु असल्याने आमचे दोघांचेही बेलच्या आवाजाकडे लक्षच नव्हते...मात्र पुन्हा बेल वाजल्यावर आम्ही भानावर आलो...नशीब आमच्या वादविवादात तरी आम्ही अहिंसेचा मार्ग अवलंबला होता...!!!

मध्येच कोण कडमडलं म्हणून खडसावायला मी दाराची कडी उघडली आणि माझी बोबडीच वळली...!!! माझी पत्नी माझ्या मागे उभी होती..ती सुद्धा अवाक् झाली...

बाहेर दरवाज्यात चक्क 'बापूजी' उभे होते. पंचा, हातात काठी असा पेहराव पाहून अहिंसेचाच मार्ग खरा की काय असा चटकन मनात विचार येऊन गेला.

"आत नाही बोलावणार का??"

बापूजींच्या आवाजाने मी आणि माझी पत्नी अगदीच गडबडून गेलो.

"या....या  ना बापूजी...." आम्ही दोघेही एकसूरात म्हणालो.

बापूजी आत आले. लाकडी खुर्चीवरच बसले.
माझे मन लगेच इतिहासात गेले. एकेकाळी बापूजींनी मीठाचा सत्याग्रह केला होता ते आठवले...

"मीठ हल्ली खुपच महाग झाले आहे नाही??", बापूजी समोर असताना काय बोलावे हे कळत नसल्यानेच बहुतेक ती बरळली असावी.

पण मी लगेचच तिला इशारा करुन शांत बसण्याची सूचना केली.

मी विदेशी कंपनीचा शर्ट आणि जीन्स घातली होती. ते क्षणात काढून टाकून पटकन आपणही पंचा नेसावा असा मोह मलाही झाला होता पण पत्नीने डोळे वटारल्याने तो मोह मी आवरता घेतला...

"कसे काय येणे केलेत बापूजी??"- मी अस्सल फॉर्मॅलिटीचा प्रश्न विचारला..

"बरं झालं विचारलंत...मी इकडून जात होतो. हिंसा कि अहिंसा या विषयावर तुमची वादावादी कानावर पडली म्हणून आलो...!!"

"नाही नाही बापू अहिंसेचाच मार्ग खरा"..अशी सपशेल माघार घेत मी बापूंच्या पायावर डोके ठेवले तर ते पाहून माझ्या पत्नीला विजयी झाल्याचा भास होत होता...!!!

"हे बघ माझे डोके फिरवू नकोस...मी तसे म्हणालो का आता काही??"- बापूजींनी आधुनिक भाषा वापरुन मला चपराक दिली.

"पण बापूजीआजकाल अहिंसा चालते काय हो?"-मी

"का नाही चालणार? चालतेच....कारण हिंसा करणे हे हिंस्त्र प्राण्यांचे लक्षण आहे. आणि आपण मनुष्यप्राणी जरी असलो तरी हिंस्त्र मात्र नक्कीच नाही आहोत...!!!"

मला बापूजींचे म्हणणे पटले. आमच्याकडे अचानक बापूजी अवतरल्यामुळे त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे माझ्या पत्नीला कळत नव्हते...चहा सोबत बिस्कीटे दिली तर बापूजी विदेशी कंपनीची आहेत म्हणून जाम बडबड करतील म्हणून तिने चक्क देशी कांदेपोहे केले. पण...

'कांदा विदेशातून आयात केलेला तर नाही ना ' असा मी ऊगाचच टोमणा हाणला...



कांदेपोहे चविष्ट झाले होते. बापूजींनी ते खाऊन तारीफ केली. बापूजी आमच्या घरापासून जवळजवळ १०० मीटर अंतरावर एका कुडामेढीच्या घरात राहत होते. त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा खुपच प्रभाव असल्याने त्यांचे राहणे, वागणे आणि पेहराव जवळजवळ गांधीजींसारखाच होता म्हणूनच आसपास सर्वजण त्यांना 'बापूजी' म्हणत. ते सहसा कुणाच्या घरी जात नसत. परंतु आमच्या घरी मात्र आज आले होते.

कांदेपोहे खाल्ल्यावर बापूजी जायला निघाले. परंतु एक प्रश्न मात्र मला सारखाच सतावत होता. शेवटी तो मी विचारलाच...

"बापूजी, या कलियुगात जो अहिंसेने वागतो त्याला जास्तच त्रास दिला जातो, त्याचा जास्तच गैरफायदा घेतला जातो...तेव्हा काय करायचे?"

"अहिंसेचा वापर तोपर्यंतच करायचा जोपर्यंत त्याचा फायदा होतोय..."-बापूजी म्हणाले.

"आणि तोटा होऊ लागला तर काय???"- मी ऊत्सुकता शिगेला ताणूनच विचारले.

बापूजींनी निर्वीकार चेहऱ्याने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले....त्यांच्या हातातली लाकडी काठी माझ्या हातात दिली आणि ते काठी शिवायच घराबाहेर निघून गेले....!!!

मी आणि माझी पत्नी अवाक् होऊन एकमेकांकडे पाहू लागलो.
जणू काही आमच्या प्रश्नाचे सध्याच्या युगाला चपखल बसेल असे उत्तर बापूंनी दिले होते....
आमचा वादविवाद तिथे संपलाच होता....!!!

 लेखन-प्रविणसर

आमचे कोंबडीपुराण

परवा सकाळी पहील्यांदाच कोंबड्याची बांग ऐकून मला जाग आली. गावी हा नैसर्गिक अलार्म असल्यावर घड्याळात गजर लावण्याची तशी गरज नसते. पूर्वी तर लोक सूर्याच्या स्थानावरुन अचूक वेळ सांगत असत. आता मात्र आपण संपूर्णपणे घड्याळावर अवलंबून असतो. त्याचे कारणही तसेच आहे. कारण हल्लीचे कोंबडेही आळशी झाले आहेत. रोज ठरावीक वेळेवर आरवले तर ठिक अन्यथा कामाच्या ठिकाणी बॉस कोंबड्यासारखी मान मुरगटायला कमी करणार नाही हे ठरलेले !

तर सांगण्याचा मुद्दा असा की चार दिवसांपूर्वी मी एक कोंबडा कोंबडीची जोडी आणली होती घरी हौस म्हणून पाळायला. ऐन श्रावण महीन्यातच आणली कारण इतर महीन्यात आणली तर पाळणे होत नाही...तसा बऱ्याच वेळा प्रयोग करुन पाहीला पण पाळण्यासाठी आणलेल्या बऱ्याच कोंबड्या माझ्या पोटातच गेल्या....म्हणूनच निगरगट्ट होऊन श्रावण महीना निवडला...!!! किमान एक महीना तरी पाळता येतील...

पण परवा एक मोठा चमत्कारच घडला. कोंबडा कोंबडीला खुराड्यातून बाहेर सोडण्यासाठी गेलो आणि काय आश्चर्य..!!!
खुराड्यात चक्क सोन्याचे अंडे...!!! मला फ्लॅशबॅकमध्ये 'सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडी'ची गोष्ट आठवली.

मी ताबडतोब माझ्या बायकोला आणि मुलांना ती गोष्ट सांगीतली. सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. आता काय करावे, कुणाला सांगावे अशा विचारांत असतानाच मी जरा सावध पवित्रा घेण्याचे ठरविले. माझ्या बायकोने वेळ न दवडता लगेचच 'सोनी' असे नामकरण करुन टाकले त्या कोंबडीचे.

"ही गोष्ट बाहेर कुणालाही कळू देऊ नका."-मी घरातल्याघरात फर्मान काढले.

पण काय करणार...बायकोच ती !
किमान शेजारी तरी सांगीतल्याशिवाय थोडेच चैन पडणार होते...

बायकोने काही स्पष्ट सांगीतले नाही पण "आमच्याकडे की नाही भारी वस्तू आहे..." असा क्लू मात्र दिला शेजारच्या काकींना..

एव्हाना मात्र अख्ख्या वाडीत पसरले की आमच्याकडे काहीतरी भारी वस्तू आहे म्हणून. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बायका घरी येऊ लागल्या आणि शंकेने घरात ढुंडाळू लागल्या कुठे काही भारी दिसतेय का ते. पण माझी बायकोही त्या आल्यावर कोंबडीकडे सारखी टक लावतच त्यांच्याशी बोलत होती...त्यामुळे त्या बायकांनी ओळखलेच...!!!

"काय गं कोंबडी भारीच दिसतेय...कधी आणलीस...?" बायकांनी विचारले.

"ह्यांनी आणली परवा...पण तुम्हाला गुपचूप सांगते, ती सोन्याचे अंडे वैगेरे देत नाही बरं का...!!!" असं सांगून माझ्या बायकोने सारे बिंग फोडून टाकले...आणि साऱ्या वाडीत पसरले की आमच्या घरची कोंबडी सोन्याची अंडी देते म्हणून.

...आता हसावे की रडावे तेच मला कळेना. गोष्टींतली गोष्ट सत्यरुपात पाहायला मिळणार म्हणून लोकांच्या झुंडी माझ्या घराकडे येऊ लागल्या.

...पोलीसांत बातमी गेली...



जगात असं घडलं नव्हतं कधी...
पोलीस आले. बघ्यांची संख्या वाढतच चालली होती. त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी ज्यादा कुमक मागविली. कोंबडीभोवती शिघ्र कृती दलाच्या जवानांनी गराडा घातला...शाळेच्या मुलांना घेऊन शिक्षकांच्याही फौजा येऊ लागल्या 'कोंबडी प्रदर्शन' पाहायला.

थोड्याच वेळात हिंदी, मराठी व इतरही भाषांतले चॅनेलवाले हजर झाले. "हे तुम्ही कसं केलंत" असं विचारु लागले...

त्यावर "मी रोज कोंबडीला सोन्याचे दाणे खायला टाकायचो, त्याचाच हा परिणाम" असं काहीबाही ठोकून दिले. कारण माझी जणूकाही बोबडीच वळाली होती. काय बोलावे आणि काय नाही हेच कळायला मार्ग नव्हता.

बघता बघता गिनीज बुक, लिम्का बुक वाले आपापली बुक्स घेऊन आले. जगातील प्रत्येक देशात, देशातील प्रत्येक माणसाच्या ओठी फक्त माझे कोंबडीपुराणच होते. टिव्हीवर मी आणि माझी कोंबडी झळकत होतो.

एव्हाना दहशतवादी संघटनांकडून मला धमक्या येऊ लागल्या होत्या.
'बऱ्या बोलाने कोंबडी आमच्या स्वाधीन करा नाहीतर अमुक उडवून देऊ, तमूक उडवून देऊ' अशा निनावी कॅसेटी येऊ लागल्या.

माझ्या घराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले...प्रत्येक देशांतील पथक संशोधनासाठी दाखल झाले. त्यात आम्ही उपाशीच. कसले जेवण अन् कसले काय...!!!

आमचे गाव गर्दीने फुलले होते. त्यातच चोर, पाकीटमारांचे फावले. परदेशी लोकांना याचा चांगलाच फटका बसला. पोलीसांना बऱ्याच वेळा लाठीचार्ज करावा लागला. काहीवेळा अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. माझ्या घरातल्या बऱ्याच वस्तू हातोहात लांबवल्या गेल्या...उरली होती फक्त कोंबडी...!!!

हा सर्व तमाशा, राडा पाहून कोंबडीही पुरती बावरुन गेली होती. बहुतेक 'पुढचे अंडे सोन्याचे द्यावे की साधेच?' या टेन्शनमध्ये असावी....

गर्दीचा फायदा घेत हाणामाऱ्या, स्त्रियांचे मंगळसूत्र वैगेरे खेचून पळ काढण्याचे प्रकार घडले. मुलाखत घेताघेता मागून माझेही पाकीट कुणीतरी लांबवले. त्यावेळी मी हासडलेली 'अस्सल गावरान' शिवीही कॅमेऱ्यात कैद झाली...

असे म्हणतात की निसर्गाने उभे केलेल्या प्रश्नांवर निसर्गच उत्तर शोधतो....झाले शेवटी तसेच...!!! डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच गर्दीचा फायदा घेत बाजूच्या झुडूपांतून झपकन एक मुंगूस आला. कोंबडीची मानगुट पकडली आणि गेला गवतात निसटून...!!!

ही बातमी पुन्हा वाऱ्यासारखी अख्ख्या जगात पसरली. एक मुंगूस सर्वांना भारी पडला होता. पोलीस यंत्रणा आता मुंगूसाला शोधण्यात गुंग झाली होती. मी आणि माझ्या बायकोने मात्र सुटकेचा 'निश्वास' टाकला होता.

आता आमच्याकडे उरला होता फक्त कोंबडा. सर्व राडा पाहून दात नसूनही त्याची जणू दातखिळीच बसली होती. कारण कालपासून त्याचे आरवणे बंदच झालेय. आता मला घड्याळात गजर लावावा लागतोय....!!!

आणि हो, पुन्हा कोंबड्या पाळायच्या नाहीत असा आम्ही आता ठाम निर्णय घेतलाय....
___________________________________
 लेखन-प्रविण निकम

मुलांची हृदयस्पर्शी गोष्ट

त्या दिवशी सकाळची वेळ होती. छोटी तिसरीतली प्राजक्ता आणि पाचवीतला ज्ञानेश यांची शाळेत निघण्याची घाई चालली होती. घरात दोघांनाही लाडाने प्राजू आणि ज्ञाना अशीच हाक मारायचे त्यांचे मम्मी आणि पप्पा. तेवढ्यात प्राजू पप्पांच्या जवळ जाऊन हळूवार म्हणाली, "पप्पा शाळेत जाताना मला दुकानात न्याल ना प्लीज?

ज्ञाना- पप्पा मला पण यायचेय.

दोघांचेही शाळेत निघताना ऊगाचच दुकानात जाणे त्यांच्या पप्पांना रुचले नाही.

"कितीवेळा सांगायचं रे तुम्हाला बाहेरचं खाणं चांगलं नसतं म्हणून..."-पप्पा

मुळात मुलांचा कल बाहेरच्या खाण्याकडे जास्त नसावा या मताचे होते ते.

"आम्हाला जायचेच आहे...!!!"-मुलांनी हट्ट केला.

मुलं आपल्या म्हणण्याला केराची टोपली दाखवतायत असे वाटल्याने त्यांच्या पप्पांना राग आला. ते मुलांवर ओरडले. मुलं नाराज झाली. त्यांचा चेहरा पडला.

शाळेत मुलांना सोडण्याची वेळ झाली होती.
निघताना दोघांनीही आज काहीच खाल्ले नव्हते. पप्पांनी दोघांनाही बाईकवर बसवले आणि ते तिघेही शाळेकडे रवाना झाले. बाईकवरुन उतरल्यावर एकदा दोन्ही मुलांनी पप्पांकडे पाहीले..मग एकमेकांकडे कटाक्ष टाकून ते आपापल्या वर्गात गेले.

शाळेबाहेर त्यांचे पप्पा मात्र ऊभेच होते. त्यांना  कसलं तरी वाईट वाटत होतं. मुलांनी निघताना नाश्ता केला नाही त्याचं की त्यांना दुकानात घेऊन गेलो नाही त्याचं...काहीच लक्षात येत नव्हतं. पण मुलं नाराज झाली होती एवढं मात्र लक्षात आलं होतं.

लगेच त्यांनी बाईकला किक मारली आणि ते जवळच्याच एका दुकानात गेले...त्यांनी दोन कॅडबरी चॉकलेट्स घेतली..आणि पुन्हा ते शाळेत आले. शिक्षकांना ती चॉकलेट्स प्राजू व ज्ञानाला द्यायला सांगीतली आणि ते घरी गेले.

संध्याकाळी पप्पा ऑफीसमधून घरी आल्यावर पाहतात तर मुलं खोलीत आभ्यास करत होती. पप्पांना पाहील्यावर मुलांनी त्यांच्याकडे एकदा पाहीलं..मग एकमेकांकडे पाहून खाली मान घालून पुन्हा आभ्यासाला लागली..

रात्र झाली..जेवण वैगेरे आटोपल्यानंतर साधारण ११ वा. च्या सुमारास सारे झोपायला खोलीत गेले. दोन्ही मुले झोपली होती. पण अर्धा पाऊणतास झाला तरी त्यांच्या पप्पांना काही झोपच येईना...का कुणास ठाऊक पण त्यांना पोरांची नाराजी सलत होती..ते प्रेमाने पोरांच्या डोक्यावरुन हात फिरवू लागले. तशी दोन्ही पोरं ऊठली...
पप्पांजवळ आली.

"पप्पा तुम्ही आम्हाला खुप आवडता"

दोन्ही मुलांच्या तोंडी हे वाक्य ऐकून त्यांच्या डोळ्यांंतून टचकन पाणी आले.
मुलांची मम्मीही ऊठली आणि तिने लाईट लावला. साधारण १२ वाजायला आले होते.
दोन्ही मुले कोपऱ्यातल्या त्यांच्या दफ्तरातून काहीतरी घेऊन आली...पप्पांसमोर उभी राहीली आणि पप्पांकडे पाहू लागली.

"पप्पा हॅप्पी बर्थ डे..."


होय आज खरंच पप्पांचा वाढदिवस होता. त्यांनी सहज मुलांच्या हातात पाहीले तर त्यांना भरुन आले. सकाळी त्यांनी मुलांसाठी शाळेत दिलेलीच चॉकलेट्स होती ती..!!! आणि मुलांनी न खाताच त्यांच्यासाठी परत आणली होती.

पप्पा पोरांना जवळ घेऊन रडू लागले..मुलांची मम्मीही रडू लागली..आणि मुलंही..

वास्तविक हल्ली प्रत्येक जण हसून वाढदिवस साजरा करतो...त्या चौघांनी मात्र त्या रात्री मस्त रडून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला होता...
___________________________________लेखन-प्रविणसर

तो समाधानाचा क्षण

साधारण १९९३ चा काळ. अमेयच्या बाबांची सरकारी नोकरी म्हणजे जणू विंचवाचं बि-हाड पाठीवर..दर चार वर्षांनी बदली व्हायची..दर चार वर्षांनी नविन ठिकाणी राहायला जावे लागायचे.

त्याच्या बाबांच्या ही गोष्ट लक्षात आली..मग त्यांनी त्यांच्या गावी कोकणात घर बांधण्याची तयारी सुरु केली...आणि मग मात्र सगळं कुटुंब गावी हक्काच्या घरी राहायला आलं...

परंतू त्यावेळी अमेयचे कुटुंब आर्थिक ओढाताणीचा सामना करत होते...घर बांधण्यात पैसे खर्च झाले होते..अमेयचा मोठा भाऊ कॉलेजला, अमेयही ११ वीला आणि छोटे दोघे हायस्कूलमध्ये शिकत होते.

कुटुंबाला हक्काच्या घराच्या रुपाने स्थिरता देऊन अमेयच्या बाबांनी नोकरीच्या ठिकाणी अपडाऊन करायचं ठरवलं...

घरभरणीपर्यंत ( गृहप्रवेश दिवस) काढलेली बाबांची रजा संपली होती.कामाला जायचा दिवस उजाडला. बाबा सकाळी लवकर ऊठून काय करतायत ते पाहायला म्हणून अमेय बाहेर गेला आणि आश्चर्यचकीत झाला...

आठ वर्षे जूनी सायकल..जी त्याचा मोठा भाऊ पाचवीला असताना चालवायचा...ती बाबा चक्क धुऊन स्वच्छ करत होते...

काय भानगड आहे अमेयला काहीच कळेना...

बाबांनी आंघोळ केली, भाकरी खाल्ली आणि कपडे घातले. काळी पर्स सायकलला अडकवली आणि आईला सांगून निघाले सायकलवर...


अमेयने आईला विचारल्यावर तिने सांगीतलं की ते कामाला गेलेत...!!!

अमेय ताडकन उडालाच...

३५ किलोमीटर जायचे आणि ३५ किलोमीटर यायचे तेही सायकलवर..!!!

कुटुंब चालवण्याचा हा फंडा अमेयच्या लक्षात आला.....
म्हणजेच महीन्याचे तिकीटाचे पैसे वाचले तर त्यात थोडेफार घर चालेल हा विचार होता त्यामागे..!!!

संध्याकाळी सायकलवरुन बाबा येताना दिसले की धावत जाऊन मडक्यातून पाणी आणून द्यायला अमेय उभा राहायचा...

अमेय ११ वीला कॉलेजला जात असल्याने गाडीचा पास आणि महीन्याला २० रुपये द्यायचे बाबा खर्चाला...

त्याला कॉलेजचे जीवन मौजमस्तीत नाही घालवता आले...
अमेयला २० रुपयांचे मोल जणू कळल होतेे...बाबानी सायकलवर जाऊन जे पैसे वाचवले त्यातलेच हे २० रुपये आहेत हे त्याच्या लक्षात आले.

मग मात्र अमेयने मौजमजा करायचे सोडून आभ्यासात लक्ष घातले. त्याचे वागणे राहणे उगाचच भरकटण्यापासून अलिप्त झाले.

त्याच्याकडील २० रुपयांची घडी खिशात तशीच राहत होती दिवसाच्या शेवटापर्यंत...!!!

त्या दिवशी अमेय नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला. कॉलेज सुटल्यावर एस.टी. ची तासनतास वाट पाहत राहावे लागायचे...रोजची गाडी आज मात्र लेट झाली होती. भूकेचा जोर वाढला होता...दोन तासांनंतर एस.टी. लागली..

एस.टी.त बसायला जाणार एवढ्यात अमेयला टायरजवळ एक पैशांचे पाकीट दिसले. उत्सुकते पोटी त्याने ते उचलले..आत मध्ये पाचशे रुपयांची नोट होती...

आता मात्र अमेयच्या डोक्यात विचारांचा भडीमार सुरु झाला...गरज आणि संस्कार यांची लढाई सुरु झाली..ते पाकीट घेऊन तो एस.टी.त जाऊन सीटवर बसला. पाचशे रुपये हातात होते त्याच्या...आणि कुणाला कानोकान खबरही नव्हती...

पण का कुणास ठाऊक...पाचशे रुपये मिळूनही खुश होण्याऐवजी तो नाराज झाला.
त्याला काही कळेनासे झाले होते. कंडक्टर गाडीत चढला...अमेय अस्वस्थ झाला होता.
पैशासाठी लोक ऊनातान्हात काय काय कष्ट घेतात हे त्याला आठवले...

आणि आठवले त्याचे बाबा...आणि त्यांची ती आठ वर्षे जूनी सायकल...!!!

कंडक्टरने बेल वाजवली आणि ड्रायव्हरने स्टार्टर दिला...तेवढ्यात अमेय सीटवरुन ताडकन ऊठला...

"थांबा, मला उतरायचे आहे"- अमेय नकळत बोलून गेला...

खाली उतरुन ते पाकीट त्याने कंट्रोलरकडे जमा केले...

दोन तास वाट पाहूनही मिळालेली गाडी आणि ५०० रुपये त्याने सोडले..

पण त्याच्या अस्वस्थ झालेल्या मनाला जे समाधान मिळाले त्याचे मोलच करता येऊ शकणार नव्हते...!!!

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 लेखन-प्रविणसर

अशी ही माणुसकी

रविवारी ऑफीसला सुटी असल्याने श्रीधर पनवेलच्या फ्लॅटवर आला होता. कामाच्या धावपळीतून आज तो जरा रिलॅक्स होता..

रोज सकाळी न चुकता योगा, योग्य वेळी जेवण आणि कुटुंबासह रविवारी मनोरंजन...हा त्याचा दिनक्रम.

त्याला नाटक पाहायचे प्रचंड वेड होते. त्या दिवशी ५ वा.च्या नाटकाला तो कुटुंबासह वाशीच्या नाट्यगृहाला निघाला.

शहरात कार ड्राईव्हींगचा त्याला फार अनुभव नव्हता..पण कधीतरी डेअरींग करायलाच हवं या निश्चयाने तो पनवेलहून निघाला.

मुलं खुश होती...गाणी म्हणत होती...त्याचे लक्ष फक्त रस्त्याकडे आणि त्याच्या पत्नीचं त्याच्या ड्राईव्हींगकडे....


अचानक एका चौकात सिग्नल लागला आणि त्याने ब्रेकवर पाय दिला...शहरात इंचाइचाच्या फरकाने ड्रायव्हींग केली जाते हे नॉलेज त्याला तेव्हाच मिळाले..त्याच्या मनात आपला ड्रायव्हींग बाबतीत आत्मविश्वास कमी झालाय की काय अशी हळूच पाल चुकचुकली...

कारच्या काचा लावलेल्या होत्या...तो सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता..इतक्यात एक भिकारी काचेजवळ आला..पैसे मागू लागला..
गयावया करु लागला...कपडे मळकट, फाटलेले होते...पण काही व्यंग नव्हते दिसत...

श्रीधर मनाशीच म्हणाला की हा तर धडधाकट आहे...याला कशाला भिक देऊ...यांना काम करता येत नाही का??

तो भिकारी खुणेने उपाशी असल्याचे सांगून गयावया करत होता. श्रीधर मात्र सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता.

सिग्नल सुटला. श्रीधर त्या भिका-याला भिक न देताच निघाला...पण त्याचा चेहरा मात्र पडला होता. थोड्याच वेळात तो नाट्यगृहात पोहोचला. अडीच तास छान गेले.
पावणेआठच्या दरम्यान पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला. नाटक पाहील्याने मूड फ्रेश झाला होता सर्वांचा.

रात्र झाल्याने श्रीधर मात्र ड्रायव्हींग नीट जमेल की नाही या संभ्रमात होता..आणि नेमके व्हायचे तेच झाले. मघाच्याच सिग्नलपाशी येऊन गाडी बंद पडली. भर चौकात मध्येच...आणि सिग्नलही हिरवा..!!!

गाडीमुळे मागेपुढे सर्वांच्या गाड्या अडकल्या..प्रयत्न करुनही कार काही स्टार्ट होईना..श्रीधर बावरला, घाबरला. काय करावे हे त्याला सुचेना.

कार भर रस्त्यातून साईडला घेण्यासाठी सर्वजण ओरडत होते पण मदतीला मात्र कुणीच पुढे येत नव्हतं...

त्याच क्षणी एक अकल्पित घडलं..त्याने भिक न दिलेला मघाचा भिकारी तातडीने त्याच्या गाडीजवळ आला...

"साहेब, मी धक्का मारतो..तुम्ही घ्या गाडी बाजूला..." तो म्हणाला आणि लगेचच धक्का मारु लागला. श्रीधरने गाडी साईडला घेतली.
कारमधून उतरला आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागला...

...त्याचे पोट आत गेले होते. श्रीधरला खुप वाईट वाटले. जिवंत माणूसकीचे दर्शन त्याला तेथे झाले होते. माणूस म्हणून तो हरला होता...आणि भिकारी मात्र माणूसकीच्या वरदानाने जिंकला होता. करोडो रुपयांच्या गाड्या फिरवणाऱ्या माणसांत जे दिसले नाही ती माणूसकीची चमक त्याच्यात दिसत होती..

त्याने दाखवलेल्या माणूसकीला "थँक्यू " हा शब्द पुरणारा नव्हता...किंवा त्याला पैसे देऊनही त्या गोष्टीची परतफेड होणार नव्हती...

श्रीधरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
काय बोलावे शब्द सूचेनात...

त्या ठिकाणी त्याला फक्त एकच शब्द सूचला......................

"सॉरी....!!!"

माणूसकीच्या एका नव्या पैलूचे दर्शन त्याला आज घडले होते...
___________________________________
 लेखन-प्रविण निकम

वर्तमानपत्रांचा असाही प्रवास

बहुतेक वेळी लांबचा प्रवास म्हणजे एस.टी. ला पर्याय नसतो. हल्ली प्रवासात बरेचजण आपापल्या मोबाईलवर गाणी ऐकण्यात दंग असतात. माझा फोन मात्र प्रवासात नेमकीच मान टाकतो...अर्थात निघण्याच्या गडबडीत चार्जिंग करायचाच राहून जातो. आणि याचा मला पूर्वानुभव असल्याने बॅकअप प्लॅन म्हणून मी किमान २/3 वर्तमानपत्रे सोबत ठेवतोच.

पण हल्ली मला प्रवासात जरा वेगळाच अनुभव आला-

बसमध्ये बसल्यावर.."ओ जरा पेपर बघू.." असा आवाज कानी पडला. मग काय, नाईलाज का होईना पण पेपर द्यावेच लागले.

या वर्तमानपत्र उर्फ पेपरचे बरेच किस्से मी अनुभवले आहेत. काहीजण पेपर वाचायला तर घेतात पण वाचता वाचता झोपूनही जातात..आणि पेपर मात्र परत द्यायचं काहीे नाव काढत नाहीत...!!

काहीजण वाचायला तर घेतात पण जणू काही तो पेपर आपलाच आहे अशा डौलात त्यातलं बक्षिसाचं कोडं सोडवायला घेतात...


काहीजण तर पंख्यासारखा पेपरचा उपयोग करतात तेव्हा मात्र माझाही जीव गरमीने वरखाली होतो...

दिलेली वस्तू लगेच हक्काने परत मागून घेणाऱ्यातला मी नव्हे. आपली सवय म्हणजे मुकाट्याने संयमाने वाट पाहणे...

एकदा तर एकजण माझ्या समोरुन माझ्याच पेपरसह उतरुन गेला आणि मी नुसताच 'आ' वासून त्याच्याकडे पाहत राहीलो होतो..

कधीकधी तर आख्या ४ तासांच्या प्रवासात मला माझाच पेपर वाचायला मिळत नाही.

परंतू आता मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही. मुळात स्मार्टफोनच्या जमान्यात कागदी पेपर वाचणाऱ्यांची संख्या तशी कमीच झाली आहे हल्ली...

पूर्वी ओळन्ओळ बारकाईने वाचणारे वाचक होते. आता पेपर वाचायला आमच्याकडे वेळच नसतो. आणि योगायोगाने वाचलाच तर वरवरच्या फक्त ठळक घडामोडी ! अर्थात याला काहीजण अपवाद असतीलही...

तर मंडळी दिवसभर मोबाईलचा फक्त मनोरंजन म्हणून वापर करणारे आपण खरंच वाचनापासून, ज्ञानापासून दूर चाललो आहोत का??

माझ्या मते लिहीणाऱ्यांची संख्या जशी कमी होत चाललेय तशी वाचणाऱ्यांचीही संख्या घटत चाललेय हे नक्की.

आता एक गोष्ट मात्र मी नक्की पण जाणीवपूर्वक करतोच...
लांबच्या प्रवासाला निघाल्यावर किमान दहा-बारा रुपये खर्चून पेपर विकत घेतो.....

माझ्यासाठी नाही तर (न मागताच) इतरांना वाचायला देण्यासाठी !

माझा मोबाईल तेव्हा फुल्ल चार्ज असतो बरं का !!

●●●●●●※※※※※※※●●●●●●●※※※※※※※※

♡●प्रेमाची विस्कटली घडी●♡

आज नदी संथ वाहत होती. तो नकळत एकेक दगड नदीत फेकत होता. थोडा नाराज, उदास अशा अवस्थेत नदीकिनारी बसलेला अन् त्याची नजर पाण्याकडे खिळलेली...वाहतं पाणी जणू हातातून निसटून पुढे जात आहे आणि पुन्हा कधीच परत फिरुन मागे येणार नाही या भावनेने तो अस्वस्थ झाला होता. कारण त्याच्या बाबतीतही अगदी तस्संच घडलं होतं. पाण्यात फेकत असलेल्या प्रत्येक दगडाबरोबर तो आठवणींच्या फ्लॅशबॅक मध्ये जात होता...

ज्याप्रमाणे हिऱ्याची चमक कधीही लपून राहत नाही. तो दृष्टीस पडतोच. तश्शीच योगायोगाने ती भेटली होती त्याला. जणू काही लाखात एक असलेला हिरा ! तिच्यात एक सच्चा माणूस होता. तिचे एकंदर व्यक्तिमत्त्व पाहून तो भारावून गेला होता. अशी व्यक्ती या अगोदर कधीच पाहीली नव्हती त्याने. एवढी ओतप्रोत भरलेली माणूसकी ! तो भाषेतला संयमीपणा ! तो फुलांसारखा नाजूकपणा...

त्याच्या जणू मंतरलेल्या मनाने शेवटी तिला मैत्रीबद्दल विचारलेच. आणि तिनेही त्याचा मिळताजुळता आणि चांगला स्वभाव पाहून त्याच्या मैत्रीला होकार दिला.

हळूहळू त्यांच्यातली मैत्री नावारुपाला येऊ लागली. तिच्या आयुष्यातील मैत्रीत फक्त तो होता. आणि त्याच्या?

होय ! त्याच्याही मैत्रीचा जणू ती श्वास होती. तिची आठवण काढण्याचा प्रश्नच नव्हता. इतकी घट्ट मैत्री होती त्यांची..त्यांच्या मैत्रीत प्रेम होतं की प्रेमात मैत्री होती ते न कळण्याइतकं घट्ट नातं बनलं होतं त्यांचं.

बस्स...त्याने तिच्यासोबत पुढील जीवन जगायचं ठरवलं. ती त्याचा जणू प्राण होती. पण त्याचा स्वभाव थोडा वेगळा होता. खडतर परिस्थितीची त्याला जाणीव होती. संघर्षातून धडपड करण्याचा अनुभव होता. एखाद्या दिवशी खायला नसेल तर पोटभर जेवल्यासारखं हसू चेहऱ्यावर ठेवण्याचा त्याचा स्वभाव. तिच्यासमोर वावरताना आपण खरंच खुप खुश, आनंदी आहोत, आपण खुप मजेत जगतोय असा खोटा आव सतत आणायचा...
रात्री झोपताना मात्र अस्वस्थ व्हायचा. कधी कधी समोर पूर्ण अंधार असल्यासारखं वाटायचं त्याला..पुढे काही चांगलं भविष्य असेल याबाबत थोडा साशंक असायचा !

तिला हे कळाले. तिने धीर दिला. या जगात आजपर्यंत कुणी कुणाला दिला नसेल असा मदतीचा हात तिने पुढे केला. एवढं निस्वार्थ नातं संपूर्ण आयुष्यात त्याने फक्त एकदाच पाहीलं होतं ते फक्त तिच्या रुपाने.

त्याला आता आयुष्याची भीती वाटत नव्हती. तिच्यारुपी जणू एखादी शक्ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे हे त्याला जाणवत होतं. तेव्हाचे काही दिवस त्याच्या आयुष्यातील खुप अडचणींचे होते. एका पाठोपाठ एक संकटं येत राहीली. तो मात्र त्यातही आनंदी असल्याचा खोटा आव आणायचा. तिला सतत म्हणायचा की मी जीवनाचा खुप आस्वाद घेतो आहे... हे जीवन खुप सुंदर आहे. life is really very beautiful...!!!

पण प्रत्यक्षात तसे नव्हतेच. life is beautiful म्हणताना जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढूनच त्याला पुढे जावे लागत होते.
पण तो आता घाबरत नव्हता कारण त्याच्या साथीला खंबीरपणे उभी होती ती...!!! फक्त त्याची...

होय, ती फक्त त्याची होती. हक्काची. तिला कुणी वाईट म्हणू नये, तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये. तिला कुणाचा त्रास होऊ नये यासाठी तो झटायचा. कारण ती फुलासारखी नाजूक होती. तिच्या चेहऱ्यावरील फुलांसारखी टवटवी कमी व्हायला नको असे त्याला सतत वाटायचे. सतत तिचा विचार. त्याच्या आयुष्याची कल्पना  तिला वगळून त्याला करताच यायची नाही इतका तो तिच्यात गुंतला होता.


आयुष्यात कधीही न पाहीलेलं प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी सारं काही तिच्यारुपी त्याला मिळालं होतं. त्याला त्याच्या आयुष्यात आजपर्यंत कधीच कुणाकडे रुसता नव्हतं आलं, हक्काने भांडता नव्हतं आलं. पण आता तो तिच्याकडे रुसायचा..भांडायचा..अगदी छोट्या छोट्या कारणांनी चिडायचा..कधी रागवायचाही...खुप मोठ्या हक्काने, आपलं हक्काचं माणूस.. म्हणून !! असा पूर्ण विश्वास त्याने तिच्यावर टाकला होता...

कधी कधी तो तिच्याशी न बोलता अबोल राहायचा. त्याला वाटायचे ती समजावेल मग तो बोलू लागेल पुन्हा. कधी कधी तो तिला लटकेच दूर लोटायचा कारण त्याला विश्वास होता ती तेवढ्याच प्रेमाने येऊन बिलगेल. असे रुसवे-फुगवे या गोष्टी सुरु होत्या. त्यातून प्रेम अधिक वाढेल असा त्याचा समज. पण सगळेच बिघडले ! तिचा गैरसमज होऊ लागला. त्याचे आपल्यावर अजिबात प्रेम नाहीय असे चित्रविचित्र विचार तिच्या मनात येऊ लागले...

खरंतर त्याच्या मागे संकटांचा ढीग होता...पण तरीही तो जगातला सर्वात सुखी माणूस असल्यासारखा वागायचा त्यामुळे तिचा आणखी गैरसमज होत गेला. तिला वाटायचं की तो तिच्या बाबतीत गंभीर नाहीय, त्याला तिची गरज नाहीय. त्याचं तिच्याकडे लक्ष नाहीय.

पण खरी परिस्थिती वेगळी होती. तो तिच्याशिवाय जगूच शकत नव्हता. पण तसे त्याने तिला आजपर्यंत कळू दिले नव्हते. त्याला वाटायचे तिने ते समजून घ्यावे. प्रत्येक श्वासाबरोबर त्याला येणारी तिची आठवण श्वास थांबल्यावरच संपणार होती...याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.

अचानक त्याच्यावर एक मोठं अस्मानी संकट कोसळलं. आता मात्र तो पुरता हलून गेला. त्याला आनंदी, सुखी असल्याचा खोटा आव आणताच येईना. घाबरुन गेला. रडवेला झाला. या संकटातून बाहेर पडणं शक्यच वाटत नव्हतं. पण एक आशेचा किरण होता......ती  !!! तिच्याकडे सारे उपाय आहेत इतका त्याचा ठाम विश्वास.

पण ती गैरसमजाच्या टोकावर उभी होती. त्याला तिच्यातलं अंतर स्पष्ट दिसत होतं. तिने यावेळी मदतीचा हात दिला पण खुप दूर राहून.
त्याला कळेना काय झालंय, कुठे चुकलंय.
इतके दिवस त्याने तिच्यावर असलेले प्रेम सांगीतले नव्हते तिला पण आता त्याला खरे सांगितल्याशिवाय राहवेना.

तो तिला म्हणाला-"मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. नाही राहू शकत."

आज कुठलाही खोटा आव नव्हता त्याच्या बोलण्यात. तो जे म्हणाला ते हृदयाच्या कप्प्यातून आलेल्या भावना होत्या.

"विसरुन जा मला..." ती म्हणाली.

त्याचा श्वास क्षणभर अडखळला. तिने निर्णय घेतला होता एकतर्फी !

आता मनातले सारे काही सांगायलाच हवे असा त्याने निर्णय घेतला. ती म्हणजे त्याचा जणू जीव होती. तो तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगू लागला. पण आता खुप उशीर झाला होता. ती निर्वीकार होती. ती त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या बेतात होती.

आणि ती निघूनही गेली !

त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती त्याला सोडून गेली होती पण येणारा प्रत्येक क्षण कसा जगावा हे एक मोठे प्रश्नचिन्ह त्याच्यासाठी ठेऊन गेली होती.

प्रेम असलेल्या माणसाला विसरुन जाणं ही आजवरची जीवनातली अशक्यप्राय गोष्ट. मग त्याला तरी कशी शक्य होणार? त्याच्या प्रेमात सच्चेपणा होता म्हणूनच त्याला ते अशक्य वाटत होतं सारं.

नदीचं पाणी वेगानं धावत होतं. त्याच्याकडील दगड संपले होते...life is beautiful म्हणणारा तो अतिशय नाराज, निस्तेज अवस्थेत ऊठला आणि कुठलंही ध्येय नसलेल्या वाटेवरुन चालू लागला....

------------------------------------------------

टर्निंग पॉईंट

श्रेयस इयत्ता पाचवी पास होऊन सहावीला गेला त्यावेळची गोष्ट आहे....तो पर्यंत त्याला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता ...!!
परंतू मराठी भाषेची मात्र प्रचंड ओढ होती. तो वारसा त्याला त्याच्या आईकडून मिळाला असावा कारण त्याच्या आईलाही वाचनाची भयंकर आवड असायची...कदाचित वेळ घालविण्यापायी निवडलेला तो ऑप्शन तिचा फेवरिट झाला असावा...

एके दिवशी श्रेयसचा छोटा भाऊ निखील तापाने खुप आजारी पडला..एडमिट करावे लागले...त्यांचे आई, बाबा रोज हॉस्पीटलला दिवसभर असायचे. त्यांच्या सोबत श्रेयससुद्धा असायचा.

निखीलला किमान सात दिवस ठेवावे लागेल असे डॉक्टरांचे फर्मान...मुलासाठी आईबाबांची धावपळ, तगमग श्रेयस पाहत होता..त्याला क्षणात वाटले...भाऊ आजारी आहे...आई बाबांप्रमाणे आपल्यालाही काही करायला हवे..

तेवढ्यात त्याचे लक्ष पँटच्या खिशाकडे गेले..हायस्कूलच्या निबंध स्पर्धेत पहिल्यांदाच पटकावलेले ११ रुपयांचे बक्षिस पाकीटात जपून ठेवलेले तस्सेच ठेवले होत त्यानेे.

निखील बरा असताना त्यातले २ रुपये खाऊसाठी मागत होता...पण श्रेयसने तेव्हा दिले नव्हते त्याबद्दल आता त्याला थोडे वाईट वाटले..तो तस्साच बाहेर पळाला एका पुस्तकाच्या दुकानाजवळ...

एखादे गोष्टीचे पुस्तक घ्यावे निखीलसाठी म्हणजे त्याला बरे वाटेल असा विचार श्रेयसच्या मनात आला. बरीच पुस्तके चाळल्यावर एक पुस्तक त्याच्या हाताला लागले-'ठकठक्'.

पुस्तकाची किंमत सात रुपये होती..त्याने ते विकत घेऊन निखीलला दाखवले...तिसरीत होता तो. निखीलने त्यातली चित्रे पाहीली अन् हसू लागला..लहान मुलांच्या विनोदांनी खचाखच भरलेले त्याकाळी ते एकमेव पाक्षिक असावे...

श्रेयसने त्यातले भन्नाट विनोद निखीलला वाचून दाखवले. त्यालाच नाही तर त्याच्या आई बाबांना सुद्धा हसायला आले. सात दिवसांत एकाच पुस्तकाचा बऱ्याच वेळा वाचून फडशा पाडला गेला.

या पुस्तकात इतर मुलांची नावे आहेत, त्यांचे लेखन आहे....माझेही असावे हा हट्ट त्या लहान वयातही श्रेयसला स्वस्थ बसू देईना !

आणि अचानक त्याला एक कोरा करकरीत विनोद सुचला.


दुकानातून त्याने एक पोष्ट पाकीट आणले. कागदावर सूचलेला विनोद लिहीला आणि पुस्तकात दिलेल्या पत्त्यावर दिला पाठवून...
 
पुढचे काही दिवस आतुरतेने वाट पाहण्यात गेले. एक दिवस अचानक बाबांचा एक मित्र पुस्तक घेऊन घरी आला. चक्क श्रेयसचा विनोद त्यात छापून आला होता !

बस्स...श्रेयसला मिळाला टर्निंग पॉईंट !!

श्रेयसचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या दिवसापासून त्याला लेखनाची गोडी लागली. पुढे त्याने बरेच लेखन केले. तो विचार करुन नवनविन कल्पना शोधू लागला, पुढे लिहीत गेला. लिहीलेले प्रकाशित व्हावे हे त्याचे ध्येय नाही. पण लिहीण्यातून त्याला मनमुराद आनंद मिळविणे हे मात्र त्याने मनोमन ठरविले होते.

निखील आजारी असताना गरज म्हणून आणलेलं पुस्तक श्रेयसच्या आयुष्याला एक छान टर्निंग पॉईंट देऊन गेलं एवढं मात्र नक्की....

[लेखन- प्रविण निकम]

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

शेजारधर्म

समीरचे बाबा रोज कामातून सुटले की दारु पिऊन घरी यायचे. त्याची आईसुद्धा त्यांच्या पिण्याबद्दल त्यांना कधी अडवायची नाही. समीर तसा आई-वडीलांचा लाडावलेला मुलगा परंतु थोडा आगावू स्वभावाचा बनला होता. तशी त्यांची आर्थिक स्थिती मध्यम होती पण खाऊन पिऊन मजा करणे हा स्वभाव मात्र होता त्यांचा. त्यांना भविष्यकाळाची जराही फिकीर नव्हती. उद्याचे उद्या बघू अशा मानसिकतेत ते आजचा दिवस मात्र अतिशय मजेत आणि उधळपट्टीत घालवत होते.

त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. आई आणि मुलगा शंतनू...तो सुद्धा आईचा लाडका होता. शंतनूचे वडील देवाघरी गेले होते. त्यांची परिस्थिती आता तेवढी चांगली नव्हती. परंतू ते असलेला पैसा मात्र जपून वापरत असत. समीरचे आई बाबा मात्र या शंतनूचा खूप तिरस्कार करत. कारण शाळेत शंतनू अभ्यासात खूप हुशार होता पण समीर मात्र सरासरी होता.

समीरची आई शंतनूच्या आईसमोर आपला मुलगा कसा मजेत राहतो हे दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करायची. त्यासाठी त्याचे भारीतले कपडे, बेल्ट, शूज वैगेरे साऱ्या नवनविन गोष्टी मुद्दामच शंतनू आणि त्याच्या आईला दिसतील अशाप्रकारे समीरला घालून दाखवायची. परंतू शंतनू आणि त्याच्या आईला या गोष्टीचे कधीही अप्रूप आणि वाईटही नाही वाटले. कारण शंतनूचे वडील जरी हयात नव्हते तरी आईच्या कष्टांची त्याला खुप जाण होती. कमीत कमी गोष्टींत कसे समाधान मानायचे हे तो त्याच्या आई वडीलांकडूनच शिकला होता. म्हणूनच त्याला अशा गोष्टींत काही रस नव्हता.

त्या दिवशी संध्याकाळी समीरचे बाबा खूप दारु पिऊन घरी आले होते. नकळत त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांचे डोके एका दगडावर आपटल्याने ते बेशुद्ध पडले. समीर आणि त्याच्या आईला कळेना काय करावे ते. ते दोघेही मोठमोठ्याने रडू लागले. समीरच्या आईने गाठीला एकही पैसा शिल्लक ठेवला नव्हता. समीरच्या बाबांना रिक्षातून डॉक्टरांकडे न्यायलाही पैसे नव्हते.


इतक्यात त्यांच्या रडण्याओरडण्याचा आवाज शंतनू व त्याच्या आईने ऐकला. ते दोघेही धावत आले. शंतनूने एकंदर स्थितीचा अंदाज घेतला व तो धावतच घरी गेला. त्याने आजपर्यंत थोडे थोडे साठवलेल्या पैशांचा डबा घेऊन आला. ते पैसे समीरच्या आईच्या हातात देऊन तो ताबडतोब शेजारीच राहणाऱ्या रिक्षावाल्या काकांकडे धावत गेला. शंतनूचे शेजारीपाजारी राहणाऱ्या लोकांशी चांगले माणुसकीचे संबंध असल्यामुळे रिक्षावाले काकाही लगेचच रिक्षा घेऊन आले. समीरच्या बाबांना त्यांनी मग दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषधोपचार केले. वेळीच नेल्याने पुढील धोका टळला होता. डॉक्टरांची फी भागेल एवढे पैसे शंतनूने साठवलेल्या पैशांच्या डब्यात होते. बाकीच्या औषधांना शंतनूच्या आईने पैसे दिले.

या एका प्रसंगाने खूप काही साधले गेले. समीरच्या बाबांना जणू नवा जन्म मिळाल्यासारखे वाटल्याने त्यांनी दारु पिणे कायमस्वरुपी बंद केले. त्याचप्रमाणे त्याच्या आईने पैशांची उधळपट्टी बंद करुन भविष्याच्या सुरक्षेकरिता काही पैसे बचत करणे सुरु केले. त्या तिघांनाही शेजारधर्म काय असतो ते चांगलेच कळाले आणि तेव्हापासून ते सर्व शेजाऱ्यांशी अगदी माणुसकीने वागू लागले. समीर आणि शंतनू एकमेकांचे चांगले मित्र बनले. आणि चांगली संगत मिळाल्याने समीरही अभ्यासात चांगली प्रगती करु लागला....

आणि हो, समीरनेही आता पैसे साठवायला डबा आणला होता !

_____________****________________

शशीची गोष्ट

सगुणा आणि बाबूराव हे एक गरीब दांपत्य. शशिकांत हा त्यांचा एकूलता एक मुलगा. दोघेही त्याला लाडाने शशी म्हणत. दिवसभर काबाडकष्ट, मोलमजूरी करुन त्यांनी शशीला वाढवलं होतं. शशी आता इयत्ता ५ वीत शिकत होता. परंतु शशीचा स्वभाव आईवडीलांच्या एकूणच विरोधात होता. आई वडीलांच्या कष्टाची त्याला तेवढी जाण नव्हती. आपला मुलगा शिकून मोठा व्हावा असे त्याच्या आईबाबाला सतत वाटायचे. पण शशीचे काही अभ्यासात, शाळेत लक्ष नसायचे.

मजूरी करुन मिळालेल्या पैशांतून सगुणा त्याला रोज प्रेमाने भाकरतुकडा खाऊ घालायची...पण शशीला अन्नाचेही तेवढे महत्त्व नव्हते. बऱ्याच वेळा अर्धे अन्न तसेच सोडून ऊठायचा. कधीकधी बाबूराव त्याच्याकरिता फळं आणायचा तेव्हा खाण्याचे नाटक करुन तो ती गुपचूप फेकून द्यायचा. त्याला कुठल्याच गोष्टीचे फारसे महत्त्व वाटत नव्हते. तो घरीही कुठल्याच कामाला हात लावत नव्हता. त्याच्या या अशा बेफिकीरी वागण्याने मुलगा वाया जातो की काय अशी चिंता त्याच्या आईबाबाला सतावत होती.


एके दिवशी अचानक सगुणा आणि बाबूराव आजारी पडले. त्यांच्या भागात डेंग्यूचा आजार फैलावला होता. गावात बरेचजण तापाने फणफणले. गावातल्या काही चांगल्या लोकांनी  सगुणा व बाबूरावला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती गरीबीची असल्याने इतर मोठ्या हॉस्पीटलला नेणे अशक्य होते. आणि त्यांना त्याबाबतीत मदत करणारे कुणी जवळचे नातेवाईकही नव्हते.

आता मात्र सर्व जबाबदारी शशीवर येऊन पडली. आई वडील काबाडकष्ट करायचे तेव्हा त्याला तितकेसे महत्त्व वाटायचे नाही पण आता त्याचे डोळे खाडकन उघडले होते. कारण आई वडीलांना दवाखान्यात जेवण घेऊन जायला घरात तर अन्नाचा कणही नव्हता. पैसेही नव्हते.काहीच नव्हतं. त्याला स्वत:लाही उपासमार सहन करावी लागली.

आता मात्र शशिला मागचे दिवस आठवले. तेव्हा तो अन्न सर्रास फेकून द्यायचा हे आठवल्यावर त्याला रडू आले. तेव्हा जर अन्न वाचवलं असतं, जपलं असतं तर आज घरी काही ना काही असतं...निदान आईबाबासाठी भाताची पेज करुन नेली असती असं त्याला वाटलं... आई बाबा कष्ट, मोलमजूरीला जायचे तेव्हा त्यांना घराकडे पहायला वेळ कमी मिळायचा...तेव्हा घराची आवराआवर, परिसराची स्वच्छता करायला थोडा हातभार लावला असता तर डासांचा फैलाव होऊन आई बाबाला डेंग्यू नसता झाला...असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्याला पश्चात्ताप झाला. अन्नाचा रोज कण जरी वाया गेला तर त्यामागची खुप मोठी मेहनत वाया गेल्यासारखेच आहे. आई वडील मी मोठा होऊन कुणी चांगला बनेन अशी स्वप्नं पाहतायत, त्यासाठीच एवढे कष्ट करतायत आणि मी मात्र शाळेकडे दुर्लक्ष करुन त्यांचं स्वप्न धुळीला मिळवत आहे...हे सर्व आठवून तो हुंदके देऊन रडू लागला.

तेवढ्यात शेजारीच राहणाऱ्या काकू त्याच्याजवळ आल्या. त्यांनी शशीच्या पाठीवर हात ठेवला. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
"काळजी करु नकोस शशी. मी आहे ना. हा बघ डबा बनवलाय तुझ्या आई बाबासाठी. चल आपण दवाखान्यात जाऊ."

काकूंनी शेजारधर्म पाळला. पण मी मुलगा असून आईबाबांच्या मनासारखं वागत नाही....शशीने क्षणात डोळे पुसले...

"काकू, मी आजपासून आईबाबाचं ऐकीन. चांगला वागेन..." शशी काकूला म्हणाला...

दोघेही दवाखान्यात गेले. शशीबद्दल काकूंनी सगूणा बाबूरावला सांगताच दोघांनाही खुप आनंद झाला. त्या आनंदाच्या भारात त्यांची प्रकृती लवकर सुधारु लागली...

लवकरच ते बरे होऊन घरी आले...आता त्यांच्या घरी अजिबात अन्न वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीचे महत्त्व राखले जाते. शशी रोज शाळेत जाऊन चांगला अभ्यास करतोय. एका आईबाबासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असणार ना....

------------------------------------------------------
-लेखन:प्रविणसर

आई

आज  छोटा पाचवीतला आकाश झोपेतून लवकर ऊठला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. आईचा तो लाडका होता. ती आई आकाशचा डबा बनविण्याच्या घाईत होती. आकाश मात्र अाज अस्वस्थ वाटत होता. सारखाच बसण्याची ठिकाणं बदलत होता. किचनमध्ये आणि बाहेर चकरा मारत होता. काहीतरी भानगड असावी अशी त्याच्या आईला जाणीव झाली.

"आकाश अरे आंघोळ घेतोयस ना? शाळेला ऊशीर होईल."

"मी नाही जात शाळेत आई."

"म्हणजे?"

आकाश आईला बिलगला. मोठमोठ्याने रडू लागला.

"आकाश ! बाळा काय झालं?" आईने काळजीने विचारलं.

"आई, तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?"

आकाशच्या प्रश्नाने आई जणू हादरलीच. काहीतरी भानगड आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले होते.

आकाशच्या शाळेतील त्याच्या वर्गातील दिलीप नवाचा मुलगा भलताच आगाऊ होता. त्याला नुसत्या शिव्या वैगेरे देण्यात खुप मजा वाटायची. इतरांच्या खोड्या करण्यात आनंद वाटायचा. वर्गातील इतर मुलांनाही कधीकधी त्याचा त्रास व्हायचा मात्र सध्याचे सात-आठ दिवस त्याच्या कचाट्यात आकाश सापडला होता. आकाशला तो चिडवायचा, बोलताना शिव्यागाळी करायचा. कधी ऊगाच खोडी काढून मारायचा सुद्धा ! आकाशचा आत्मविश्वास पुरता ढासळून जायचा. आणि तो भलताच नाराज व्हायचा. असे सातआठ दिवस सुरु होते. शिक्षकांकडे तक्रार केली तर तो आकाशनेच आम्हाला शिव्या दिल्या असे खोटेच सांगायचा. मग शिक्षकांकडूनही आकाशलाच ओरडा मिळायचा.

एवढ्याशा कोवळ्या वयातल्या आकाशला काय करावे तेच कळेना. विचित्र कात्रीत सापडला होता तो. आईला त्रास नको म्हणून ही गोष्ट आजपर्यंत त्याने तिला सांगीतली नव्हती.

त्याला आता शाळेत जायची भितीच वाटू लागली. म्हणूनच आज सकाळीच तो अस्वस्थ दिसत होता.

"अरे पण तू त्याला काहीच कसा बोलला नाहीस?"

"आई तू मला एवढं चांगलं का वागायला शिकवलंस?? तो मुलगा मला शिव्या देतो तेव्हा मला उलटून काहीच बोलता येत नाही. मला काही सूचतच नाही. आई तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?? मला जर शिव्या येत असत्या तर मी सुद्धा त्याचा प्रतिकार करु शकलो असतो ना. तू मला मारामारी शिकवली असतीस तर मी त्याला मारलहीे असते. आई तू साफ चुकली आहेस !"

आकाशच्या या प्रश्नावर आई निरुत्तर झाली. काय उत्तर द्यावे हेच तिला कळेला. आकाशचे म्हणणे त्याच्या दृष्टीने योग्यच वाटत होते तिला. कारण आकाशला कुठल्याच स्वरुपात त्या मुलाला प्रतिकार करता येत नव्हता. कारण तो त्या मुलासारखा ऊनाड नव्हता. शिवाय आता आईला आकाशचा कॉन्फिडन्स ढासळू द्यायचा नव्हता.

लहान मुले कधीच एकट्याने परिस्थितीचा सामना करु शकत नाहीत. त्यांना आई वडिलांचा आधार लागतोच. आकाशला वडील नव्हते. त्याची आई आकाशला घेऊन त्याच्या शाळेत गेली. शिक्षकांना सारा प्रकार पटवून सांगीतला. शिक्षकांनीही त्यांची चूक मान्य करुन आकाशची बाजू घेतली. पुन्हा असे घडणार नाही असे आश्वासन त्याच्या आईला दिले. आणि आकाशचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

वाईटाला वाईटाने नव्हे तर चांगल्याने जिंकायचे असते हेच शिक्षकांनी आजवर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले होते. परंतू दिलीप मात्र त्याच्या पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडत चालला होता. दिलीपच्या पालकांनाही यापूर्वी खुप वेळा समज देऊन झाली होती. काय करावे हे शिक्षकांनाही कळेना.

दुसऱ्या दिवशी आकाश शाळेत आला. दिलीपही आला होता. सकाळी परिपाठ झाला. मुले आपापल्या वर्गात गेली. मराठीचा पहिला तास होता. वर्गशिक्षकांनी सर्व मुलांना एक निबंध लिहायला सांगीतला. निबंधाचा विषय होता- 'माझा आवडता मित्र'

वर्गातील सर्व मुले खाली माना घालून निबंध लिहू लागली.

निबंध लिहून झाल्यावर शिक्षकांनी प्रत्येक मुलाला पुढे येऊन आपापला निबंध वाचायला सांगितला. प्रत्येक मुलगा समोर येऊन आपापला निबंध वाचू लागला. सर्वात शेवटी दोनच मुले राहीली होती. आता पुढे यायचे होते दिलीपला. तो त्याने लिहीलेला कागद घेऊन पुढे आला. आणि रडू लागला. त्याचा कागद कोराच होता. त्याच्या वर्गातील वाईट वागण्यामुळे त्याचा कुणीच मित्र नव्हता आणि म्हणूनच तो निबंधात काहीच लिहू शकला नव्हता. त्याला सर्वांसमोर खुप कमीपणा वाटला. हुंदके देऊन रडू लागला. 'माझे चुकले. मी शाळेत असे वागायला नको होते.' असे रडत रडत म्हणू लागला. आणि रडतच जागेवर जाऊन बसला.

आता शेवटचा नंबर होता आकाशचा. आकाश आपला निबंध घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिला. आणि त्याने निबंध वाचायला सुरुवात केली-

'माझ्या वर्गातील माझ्या सर्वात आवडत्या मित्राचे नाव आहे.....दिलीप !'

सर्व मुले कान टवकारुन ऐकू लागली. सर्वांना थोडे विचित्र वाटले. दिलीपही रडता रडता आश्चर्याने पाहू लागला. निबंध ऐकू लागला-

'दिलीप हा खुप चांगला मुलगा आहे. तो माझ्याशीच नव्हे तर शाळेतील सर्वच मुलांशी खुप प्रेमाने वागतो. आम्हा सर्वांना तो खुप आवडतो. लवकरच दिलीप शाळेचा आदर्श विद्यार्थी बनून दाखवेल. आणि लवकरच त्याच्या आईबाबांचे त्याच्या बाबतीतले स्वप्न नक्कीच पूर्ण करुन दाखवेल अशी माझी खात्री आहे.'

आकाशचा निबंध दिलीपवर परिणाम करुन गेला. मधली सुटी झाली. प्रत्येकजण आपापला डबा खाऊ लागला. आकाशसुद्धा डब्यातली पोळीभाजी खाऊ लागला. इतक्यात त्याच्या पुढ्यात कुणीतरी आपला डबा सरकवला.

"आकाश...घे ना, तुला भेंडीची भाजी आवडते ना?"

आकाशने खाता खाता वर पाहिले. रडवेल्या चेहऱ्याने दिलीप उभा होता पुढ्यात.

"माझे चुकले मला माफ कर आकाश."

दिलीपच्या या वाक्यावर आकाशला काय बोलावे तेच कळेना. त्याने हसतच दिलीपचा डबा घेतला आणि त्यातली भेंडीची भाजी खाऊ लागला. मैत्री जुळली होती.

संध्याकाळी शाळा सुटली. आकाश घरी गेला. काल अस्वस्थ वाटणारा आकाश आज आनंदी दिसत होता.

"काय रे काय झालं, आज एवढा खुश?"

"आई तू खुप चांगली आहेस. तू मला शिव्या नाही शिकवल्या तेच योग्य होतं."

"बाळा, जगातल्या कुठल्याच आईचं आपल्या मुलाला वाईट गोष्टी शिकवण्याइतकं दगडाचं काळीज नसतं रे...."

आकाशच्या कोवळ्या मनातलं आईचं नातं आज नव्याने उलगडलं होतं...

_______________________________________

जंगली वाघ आणि दहा माणसे

उदयपूर गाव घनदाट जंगलाला जणू टेकलेलेच होते. या जंगलात वेगवेगळे प्राणी राहत असल्याने गावातील बऱ्याच हौशानवशांना शिकारीचा छंद जडला होता. लांब पल्ल्याचा फोकस साधणाऱ्या बॅटऱ्या, शिकारीच्या विनापरवान्याच्या बंदूका आणि इतर वेगवेगळी हत्यारे घेऊन रोज रात्री या हौशी लोकांची जंगल स्वारी असायची. जंगलातले सर्वच प्राणी तर अगदी वैतागून गेले होते.

शिकारी लोक आठवड्यातून एक सुटी घ्यायचे आराम करायला. तोच आज सुटीचा दिवस होता. कसल्यातरी विषयावर गावची मंडळी एकनाथ सरपंचाच्या ओट्यावर गप्पा मारत बसली होती. गावातली छोटी मुले अंगणात सूचेल तो खेळ खेळण्यात मग्न होती.

...आणि अचानक भयानक प्रसंग घडला. गप्पा मारत बसलेल्या लोकांपुढे कुठूनतरी पाच जंगली वाघ आले. डरकाळी फोडू लागले. सर्व लोक सैरावैरा पळू लागलो. सर्वांची एकच धांदल उडाली. मुले घाबरुन गेली. काहीजणांनी दारे खिडक्या लावून त्यांच्या फटीतून काय घडतंय ते पाहू लागले. पाचही वाघांनी पळण्याच्या तयारीत असणाऱ्या काही माणसांना झपकन आपल्या जबड्यात पकडले आणि गेले जंगलाच्या दिशेला निघून ! गावातील लोक आक्रोश करु लागले. काय करावे ते त्यांना कळेना. ज्यांना नेले त्यांच्या बायका धाय मोकलून रडू लागल्या. पोरांनी टाहो फोडला. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. काय करावे कुणालाच काही कळेना...आख्खा गाव शांततेत बुडाला जणू काही गावात कर्फ्यू लागला होता असेच वातावरण होते...

तो दिवस निघून गेला. सकाळ झाली. रडारड थांबली होती आता...पण सर्वजण सुन्न झाल्यासारखे वाटत होते. आणि सुरु झाला पुन्हा कालचाच खेळ...जंगलाच्या दिशेकडून कालचेच चार पाच वाघ गावाच्या दिशेने येताना दिसले. आणि पुन्हा झडप घालून चार पाच जणांना जंगलाच्या दिशेने घेऊन गेले.

आता मात्र कहर झाला. लोक बिथरले..त्यातल्या काहींनी शिकारीच्या बंदूका काढल्या, काहींनी सुरे, तलवारी, भाले, फरशा वैगेरे जे हाती लागले ते हत्यार घेतले. आणि निडरतेचा आव आणून सारी पुरुष मंडळी निघाली जंगलाच्या दिशेने...बायका आणि मुले मात्र भेदरलेल्या अवस्थेत आपापल्या घरांतच कडी लावून बसल्या होत्या.

लोक झुंडीने जंगलात शोध घेत होते. वाघांनी पळवलेल्या आपल्या दहा माणसांची निदान मृत शरीरे तरी आपल्या हाती सापडतील या आशेने...

आणि चालता चालता अचानक डरकाळीचा आवाज झाला...लोकांनी शस्त्रे सज्ज केली.


"थांबा, आपापली हत्यारे खाली फेका नाहीतर तुमच्यातला एकही जिवंत राहणार नाही !"- एक म्होरक्या वाघ म्हणाला. त्याच्या दोन्ही बाजूने इतरही विसेक वाघ होते.

"पण आमची दहा माणसे तुम्ही मारलीत. तरीही आम्ही गप्पच राहायचे काय?" एकनाथ सरपंच कसाबसा बोलला.

"काय फरक पडणार आहे तुम्हाला हजारातली दहा आम्ही मारली तर?" वाघांतला एकजण पुढे येऊन म्हणाला.

"असं कसं म्हणताय...ज्यांना तुम्ही मारलंत त्यांची बायका पोरे रडतायत..बिच्चाऱ्यांचा आधार तुटला" माणसांच्यातला कुणीतरी बोलला.

"आधार तुटला तरी जगतीलच ना...!! आम्ही नाही का जगत आमचा आधार तुटल्यावर?" एक वाघ हमरीतुमरीवर आला.

पण या वाघाचा प्रश्न नीट न कळल्याने दगडू न्हाव्याने विचारलेच, " तुमचा आधार कुणी तोडला? आमचा त्याच्याशी काय संबंध?"

सगळेच वाघ आता डरकाळी फोडू लागले. जणू काही दगडू न्हाव्याच्या उलट बोलण्याने त्यांना चिथावणी दिली होती.

"तुमचाच संबंध आहे....!!!" सर्व वाघ मोठ्याने म्हणाले.

"आम्ही आमच्या जंगलात खुप मजेत असायचो. जसे तुम्ही तुमच्या गावात असायचात अगदी तस्सेच...पण तुमची माणसे आमच्या जंगलांवर आक्रमण करु लागली. आमचे संरक्षण, संवर्धन करणे तर दूरच पण आमची जी उरलीसुरली संख्या आहे ती सुद्धा तुम्ही नामशेष करण्याच्या मागे लागलात !! आम्ही नष्ट व्हायला निसर्ग कारणीभूत नसून तुम्ही माणसेच आहात...अरे, सर्व प्राण्यांत सर्वात बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या माणसांनो, आमच्यावर बंदूका झाडताना थोडासा विचार करा रे...आमचंही कुटुंब असतं, आम्हालाही छोटी पिल्ले असतात !!!"

डरकाळी फोडणारे वाघ थोडे रडवेले झाले होते. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून हत्यारबंद लोकांच्या हातातील शस्त्रेही आपोआपच गळून पडली होती...

"आम्हाला माफ करा...आमचे चुकले !!!" सर्व माणसे हात जोडून माफीची अपेक्षा करु लागली. आणि उदास भावनेने मागे फिरुन घरांच्या दिशेने चालू लागली. चालत असतानाच मागून कुणीतरी हाका मारण्याचा आवाज ऐकू आला. सर्वांनी वळून पाहीले आणि काय आश्चर्य !!! त्या वाघांच्या बाजूला त्यांनी पळवून नेलेली तीच दहा माणसे अगदी सुखरुप उभी होती...रडवेले चेहरे केलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य पसरले.

सर्वजण एकमेकांना आनंदाने मिठी मारु लागले.

"आमची संख्या हळूहळू कमी होत चाललेय. आमची शिकार तुम्ही करता म्हणून आम्हीही तेच करणे योग्य नाही. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये ! आम्ही फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी हा माणसे पळविण्याचा प्लॅन केला होता !!"

माणसांच्या नाहीत पण वाघांच्या म्हणी पाठ आहेत आणि ते आचरणातही आणतात हे पाहून माणसे हरखून गेली. त्यांना स्वत:ची लाज वाटली. कमीपणाची भावना निर्माण झाली. त्या सर्वांनी वाघांना यापुढे शिकार न करण्याचे मनोमन वचन दिले...आणि एक विलक्षण प्रेरणा घेऊन सगळेजण आपल्या गावची वाट चालू लागले...

___________________________________लेखन- प्रविणसर

बाॅम्बची बोंब


रात्री मस्तपैकी आरामखुर्चीवर हेलकावे खात होतो. एका हाताने रिमोटची बटणे दाबत असताना आणि दुसऱ्या हाताने मात्र चहाचा आस्वाद घेत असतानाच अचानक एका टिव्ही चॅनेलच्या हेडलाईनने लक्ष वेधून घेतले.

एके ठिकाणी म्हणे बेवारस वस्तू सापडली. आणि बाँबशोध पथकाने तपासणी केल्यानंतर त्यात चक्क बाँब सापडला..व तो निकामी करण्यात आला...

माझ्या हातातल्या पेल्यातील चहा गरगर फिरु लागली...हे काय नविनच..!!! अतिरेकी तर घुसले नसावेत आपल्या देशात? असे चित्रविचित्र विचार डोक्यात घोळू लागले.

याअगोदर अशा बऱ्याच घटना आपल्या देशात घडल्या होत्या. मध्यंतरी सारं काही शांत वाटत असताना मध्येच ही बातमी थडकली...!!

या एका बातमीने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. आपल्या सोबत असलेल्या वस्तूंविषयीसुद्धा शंका यावी इतकी घबराट पसरली होती. पण करणार काय...भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात ना...तसेच काही तरी...

माझा आत्मविश्वास तसा दांडगा...मला परिस्थितीची जाणीव होती परंतू भीती मात्र वाटत नव्हती. दुसऱ्या दिवशी मला मुंबईला काही कामानिमित्त जायचे होते.

"या असल्या वातावरणात कशाला जाताय...नंतर नाही का जाता येणार?"- पत्नीने सवाल टाकला.

"नाही गं, महत्त्वाचे काम आहे, जावेच लागेल..!"- मी

'एक बार अगर मैने कमिटमेंट कर दी तो फिर मै अपने आप की भी नहीं सुनता' हा माझ्या तोंडी नेहमीच असलेला सलमान खानचा डायलॉग आठवल्याने पत्नीनेही मग पुढे 'ब्र' काढला नाही.

मी जायची सर्व तयारी केली. बॅग रेडी केली. सकाळी ५ वाजता ऊठायचे असल्याने झी सिनेमाला लागलेला 'आशिकी २' बंद करुन टाकला आणि झोपी गेलो.

झोपेतही रात्रभर त्या टिव्हीतील बातमीच्याच अनुषंगाने स्वप्न पडले.. सकाळी अक्षरश: भयभीत होऊन ऊठलो. कशीबशी आंघोळ उरकली. कपडे घातले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो.

झपझप पावले टाकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. आज विचार साथ देत नव्हते. आशिकी २ आठवायच्या ऐवजी ती टिव्हीवरची बातमी काही पिच्छा पुरवत नव्हती. स्टेशनला गेल्यावर कळाले की ट्रेन १ तास ऊशिराने येणार आहे.

'माझ्या बाबतीत हे नेहमी अस्संच होतं.' असा विचार करुन तिथेच प्लॅटफॉर्मवर जरासा टेकलो. पण थोडासा कावराबावरा झालो होतो. आज मात्र भीती वाटतच होती. अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी कसाबसारखा प्लॅटफॉर्मवर बेछूट गोळीबार केला तर??
आपण गेलोच मग बाराच्या भावात...!!!

मला घाम फुटला. घाबरुन घरी गेलो तर बायकोसमोर सलमान खानच्या डायलॉगमधील हवाच निघून जायची...!!! आणि इथे थांबलो तर....!!!

मग मी तिथेच राहून जरा alert राहण्याचे ठरवले. तिरक्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागलो....आणि माझी बोबडीच वळली...!!!

मी ज्या बाकड्यावर बसलो होतो...त्याच बाकड्याखाली २ बेवारस पिशव्या दिसल्या.

"बॉम्ब...!!!बॉम्ब...!!!! वाचवा वाचवा...."

नकळत मी कधी मोठ्याने ओरडलो ते मलाच कळले नाही. लोकांची गर्दी जमली. आजूबाजूचे पोलिस धावत आले. काय झाले ते मला विचारु लागले. माझी बोबडी वळल्याने मी बोटानेच बाकड्याखाली इशारा करु लागलो...

आता मात्र घाबरुन गर्दी पांगली. ताबडतोब बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
आता मी जरा भानावर आलो होतो...पण मनातून मात्र घाबरलो होतो. हे सारे खोटे ठरले तर??
सगळीकडे माझी फुकट बदनामी व्हायची...!!!
इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली.

बाँबशोधपथकाने दोन पिशव्यांपैकी १ पिशवी मोठ्या प्रयासाने उघडली. आणि उपस्थित सर्वांनीच तोंडात बोटे घातली. जो तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मी एखादा मोठा गुन्हेगार असल्यासारखे मला झाले. कारण त्या पिशवीत 'बाकरवड्या' होत्या.
मी आता मात्र तेथून पळण्याच्याच बेतात होतो. नाहीतर पोलिस मला सोडणार नव्हते. मला पुन्हा घाम फुटला.

मी पळण्याच्या बेतात असतानाच पथकाने दुसरी पिशवी उघडली आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा तोंडात बोटे घातली. नक्कीच त्यातही 'चकल्या' वैगेरेंसारखाच एखादा पदार्थ असणार असा माझा पक्का समज झाल्याने बदनामीच्या भीतीने मी सुसाट पळत सुटलो...पण मागे वळून पाहतो तर काय..!!! जो तो बॉम्ब-बॉम्ब ओरडत सैरावैरा धावत होता. बापरे...!!! दुसऱ्या पिशवीत चक्क खरोखरचाच बॉम्ब सापडला होता...!!!

"वाचलो बुवा...!!! बॉम्बच्या कचाट्यातूनही आणि पोलिसांच्याही..." असे म्हणून धरणीला पाय लावून पळालो आणि कसेबसे घर गाठले.

दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली-
'एका अज्ञात इसमाच्या प्रसंगावधानामुळे बॉम्बच्या स्फोटातून शहर बचावले. परंतू तो अज्ञात इसम कोण आहे ते समजू शकले नाही.'

मी थोडक्यात वाचलो होतो. नाहीतर माझ्या नावाचा ऊगाचच प्रचार आणि प्रसार व्हायला वेळ लागला नसता. हकनाक अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर मी आलो असतो.
मुकाट्याने टिव्ही लावला....योगायोगाने कालचाच 'आशिकी २' लागला होता....मस्त एन्जॉय केला मग सिनेमा....!!!!

_____________________________________

लेखन-प्रविणसर