बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

अपहरण

संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या तयारीत होता. १२ वर्षांचा बंटी बंगल्याच्या आवारातच त्याच्या लहान भावासोबत क्रिकेट खेळण्यात मग्न होता. त्याची मम्मी डिनरच्या तयारीत गुंतली होती. पप्पा मिस्टर साठे अजून ऑफीसमधून घरी आले नव्हते. बंटीने बॉल फुलटॉस टाकला. साहूने छोट्या बॅटने तडाखा दिल्याबरोबर बॉल दूर गेला. बंटी बॉलमागे पळाला. इतक्यात अचानक कुणीतरी छोट्या साहूवर झडप घातली..साहू ओरडू लागला. बंटीने ते पाहील्यावर त्याला तर धक्काच बसला.

कुणीतरी साहूला चार चाकांच्या गाडीत कोंबले होते. आणि गाडी बंटीच्या नजरेसमोरुन दिसेनाशी झाली होती. बंटी रडवेला होऊन धावतच घरात आला.

"मम्मीsSS....पप्पाsSS...!"

बंटी काय बोलतोय हेच त्याच्या मम्मीला कळेना...

"मम्मी साहूला कुणीतरी नेले..."

बंटीचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच त्याच्या मम्मीने बंगल्याच्या बाहेर धाव घेतली. साहू तिथे कुठेच नव्हता. आईने इकडे तिकडे शोधाशोध केली पण साहू सापडला नाही तेव्हा मात्र तिने हंबरडा फोडला. पण तरीही धीर सोडला नाही. ताबडतोब तिने साहूच्या पप्पांना फोन केला. ते सुद्धा लगबगीने कंपनीतून घरी दाखल झाले. योगायोगाने बंगल्याचे सिक्यूरिटी गार्डही आज सुटीवर होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठले. तक्रार नोंदविली गेली. आणि पोलिस तपास सुरु झाला.

रात्र झाली. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरत होती पण अद्यापी प्रकरणाचा काहीच मागमूस लागत नव्हता. अखेर पोलिसांनी काहीही करुन साहूला परत आणण्याचे ठोेस वचन दिल्यावर नाईलाजाने का होईना पण त्याचे मम्मी पप्पा घरी परतले.

बंटी, त्याची मम्मी, पप्पा मिस्टर साठे आणि त्यांच्या मालकीच्या कंपनीतील काही विश्वासू स्टाफ मेंबर असे सगळेच घरी काळजीत बसले होते. सर्वांचे लक्ष फोनकडे होते. पोलिसांचा फोन येईल आणि साहू सापडल्याची बातमी कळेल या भोळ्या आशेवर सर्वजण रात्रीचे १२ वाजले तरी बसून होते. काय करावे कुणाला काहीच कळत नव्हते.

आणि अचानक फोन खणखणला !

"बऱ्या बोलाने उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ५० लाख रुपये आम्ही सांगतोय त्या ठिकाणी आणून द्या...आणि हो, पोलिसांत गेलात तर याद राखा, परिणाम वाईट होतील."

फोनवरचे हे वाक्य ऐकून सारे हबकलेच ! आता काय करायचे अशा विचारांत सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

"पण पण...साहू.." मि. साठेंचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच पलिकडून फोन ठेवला गेला.
आणि मग सुरु झाली पन्नास लाख गोळा करण्याची केविलवाणी धडपड. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँकेतील थोडीफार रक्कमही काढता येणे शक्य नव्हते. घरात तर तुटपूंजी रक्कम होती. पण प्रश्न होता पन्नास लाखांचा !

दुसरा दिवस उजाडला. मि. आणि मिसेस साठेंना रात्रभर झोप लागली नव्हती. सकाळी पहाटेच दोघेही आपल्या कारमधून कंपनीत गेले. मग त्यांच्या सर्व कामगारांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले. तोवर बातमी कामगारांपर्यंत पोहोचली होती.

"कृपया आपल्या जवळ किंवा घरी जेवढी काही रोख रक्कम असेल तेवढी मला ताबडतोब आणून द्या मी त्याची दुप्पट तुम्हाला देईन !" वेळ कमी असल्याने मि. साठेंनी कामगारांपुढे हात जोडले. आणि मग कामगारही मशीनसारखे कामाला लागले. कुणी खिशातल्या दहाच्या नोटा काढल्या, कुणी पाकीटात बरेच दिवस जपून ठेवलेली पाचशेची नोट साठेंच्या हातावर ठेवली. कुणी घरी धावत जाऊन हजार-दोनहजार आणून दिले. कंपनीतील दोनशे कामगारांनी आपापल्या परीने रक्कम आणून दिली.

सकाळचे दहा वाजले. पण रक्कम जमली होती जवळजवळ फक्त ५ लाख रुपये. आता काय करावे काहीच कळत नव्हते. मि. साठे काळजीत पडले. थोडासा अवधी मिळाला असता तर त्यांनी पैशांचा डोंगर उभा केला असता परंतू आता तर फक्त १ तास उरला होता. आणि अजून रक्कम हवी होती ४५ लाख रुपये !

आणि अचानक मि. साठेंचा चेहरा खुलला. त्यांना काहीतरी आठवल्यासारखे झाले. ते पत्नीला कारमध्ये बसवून तडक बंगल्यावर गेले. बंगल्याच्या मागच्या भागात त्यांनी दहा दिवसांपूर्वी लपवलेला 'ब्लॅक मनी' त्यांना आठवला. इन्कमटॅक्सवाल्यांची घरी धाड पडणार अशी कुणकुण लागल्याने त्यांनी पाचशेच्या नोटांचे बरेचसे बंडल्स जमिनीतील लॉकरमध्ये दडवून ठेवले होते. त्यांनी कुदळ घेतला. आणि ते लॉकरपर्यंत खणू लागले. बायकोला या गोष्टीचा थांगपत्ताही नव्हता ! ती रडवेल्या चेहऱ्याने नुसतीच पाहत होती.

थोडे खणून झाल्यावर मि. साठेंनी लॉकर उघडला. आणि नोटांची पुडकी बाहेर काढली. परंतू पुढ्यातले दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळाली. जवळजवळ सर्वच नोटांना वाळवीने खाऊन टाकले होते. त्यांचा मातीत लपवलेला हा काळा पैसा जणू मातीमोल झाला होता. आता मात्र त्यांना रडू कोसळले. पैसे न दिल्याने किडनॅपर साहूचे काही बरेवाईट करतील या काळजीने त्यांना रडायला आले. ११ वाजायला पाच मिनिटे बाकी होती आणि घरातला फोन खणखणला...

दोघे पती पत्नी फोनकडे धावले. मि. साठेंनी फोन उचलला.

"पैसे घेऊन मुकाट्याने मी सांगतोय त्या ठिकाणी या.." पलिकडून सूचना आली.

"पण..पण...मी पन्नास लाख नाही आणू शकत." मि. साठें थरथरत म्हणाले.

"जेवढे असतील तेवढे आणा"

"बरं...पत्ता सांगा ना..." थरथरल्या आवाजाने ते म्हणाले.

पलिकडून पत्ता दिला गेला. पत्ता एका चाळीतल्या खोलीचा होता. मि. साठे पत्नीसह गोळा केलेले पाच लाख रुपये घेऊन कारमध्ये बसले. साहू सुरक्षित परतून यावा म्हणून त्यांनी किडनॅपरच्या फोनची कल्पना पोलिसांना अजिबात दिली नाही. आता ते स्वत:च पैसे घेऊन निघाले होते.

सांगीतलेल्या पत्त्यावर साठेंच्या गाडीला ब्रेक लागले. चाळीतली घरे साधीसुधी वाटत होती. माणसेही साधी मध्यमवर्गीय होती.

'अपहरणकर्ते इथे का लपून बसले असावेत?' असा शंका वजा प्रश्न साठेंना पडला. सांगीतलेली खोली समोरच होती. मि. साठेंनी दार ढकलले. आतमधले दृश्य पाहून दोघेही हबकून गेले. एका दहा वर्षांच्या अपंग मुलासोबत साहू चक्क खेळत होता. आईचे डोळे भरुन आले. ती धावतच गेली आणि साहूला करकचून मिठी मारुन ढसाढसा रडू लागली. त्याच्या बाबांनाही अश्रू अनावर झाले होते. पण साहूला कुणी किडनॅप केले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून ते आतल्या खोलीत गेले. तिथे आतल्या खोलीत एका हार घातलेल्या स्त्रीचा फोटो लावलेला होता. आणि फोटोसमोर कुणीतरी एक माणूस बसला होता. थोडा अंधार असल्याने त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

"आणले का पैसे?" त्या माणसाने विचारले.

"हो आणलेत. पण तू आहेस तरी कोण रे?"

"जरा ते लाईटचे बटन दाबा मग कळेल."

मिस्टर साठेंनी तत्परतेने बटनावर हात नेला. लाईट लागला. समोर पाहतात तर काय ! तो त्यांच्याच कंपनीतील तो उदय घाडगे होता ज्याला मि. साठेंनी एकदा कंपनीतून हाकलून दिले होते.

"हो साहेब, मीच तो ज्याने तुमच्या मुलाला किडनॅप केले आणि फोन करुन तुम्हाला पैसे आणायला सांगीतले.."

"पण तू असे का केलेस?" मि. साठेंचा आवाज आता चढला होता.

"मी असे का केले? आठवा तो दिवस साहेब मी तुमच्याकडे कामाला असताना एकदा पाच लाख रुपये मागायला आलो होतो. रडून रडून विनवण्या केल्या, हातीपाया पडलो पण बॉस म्हणून तुम्हाला जराही दया नाही आली. तुम्ही मला ते दिले नाहीतच उलट माझं काही एक ऐकून न घेता उलट तुम्ही मला कामावरुन काढून टाकलंत !"

"अरे पण मी का म्हणून द्यायचे पाच लाख विनाकारण..." मि. साठे चढ्या आवाजातच बोलले.

"मग आज हे पाच लाख का घेऊन आला आहात माझ्या घरी?" उदय घाडगेच्या या प्रश्नावर साठे निशब्द झाले.

इतक्यात उदय घाडगेचा दहा वर्षे वयाचा पायांनी अपंग असलेला मुलगा जमिनीवर खुरडत बाहेरील खोलीतून आत आला.

"साहेब पाहीलंत याच्याकडे? तुम्ही मला जेव्हा कामावरुन काढलंत ना तेव्हाच हा अपंग झाला. माझ्या या वारसदाराची काय अवस्था झालीय पहा ना...!" उदयच्या बोलण्यात आर्तपणा होता. तो समोरच्याच हार घातलेल्या पत्नीच्या फोटो जवळ गेला आणि हुंदके देत म्हणाला,

"साहेब पाहीलंत हिला? ही माझी अर्धांगीनी ! पण आज नाहीय हो जगात !! जेव्हा गावाला जाताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला ना तेव्हा हीला तातडीने हॉस्पीटलला नेले होते. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायचे म्हणून २ लाख जमा करायला सांगीतले. पोराच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याचेही ताबडतोब ऑपरेशन करायचे होते....गरज होती ती फक्त पैशांची आणि तीही अगदी वेळेवर ! मी तुमचा विश्वासू कामगार म्हणून आशेने तुमच्याकडे धावलो. पाच लाखांसाठी दया याचना केली पण तुमचे हृदय नाही पाझरले. मी एवढे पैसे मागीतले म्हणून तुम्ही मला चक्क कामावरुनच काढून टाकलेत. त्याचक्षणी माझ्यावर आभाळ कोसळले. मी हारलो होतो. बहुतेक माझ्या अर्धांगिनीनेही ते ओळखले असावे. सोडला जीव तिने...गेली बिच्चारी !! आणि हा माझा बच्चू, बघा जरा याच्याकडे साहेब. हा जेव्हा असा खुरडत चालताना आजही माझ्याकडे आशेने बघतो ना तेव्हा मला मेल्याहून मेल्यासारखे होते. म्हणूनच काल त्याला मोठ्या आशेने डॉक्टरांकडे नेला होता मी. डॉक्टर म्हणाले अजूनही मेंदूचे ऑपरेशन केले तर पाय नीट होऊ शकतात. माझी परिस्थिती नाही साहेब एवढा खर्च करण्याची...आणि मग मी विचार केला. आपले काही का होईना पण पोराला पायांवर उभा करायचाच. या सगळ्याला तुम्ही कारणीभूत होतात म्हणून मी हा मार्ग तुमच्यावरच वापरायचे ठरवले. पण नाही...हा चुकीचा मार्ग माझ्या रक्तातच नाहीय. साहेब तुम्ही मला पोलिसांत द्या पण काहीही करुन माझ्या एकूलत्या एक पोराला त्याच्या पायावर उभा करा..."


उदय हात जोडून विनवणी करत होता. मि. साठेही भावनाविवश झाले होते. ते पुढे झाले आणि त्यांनी उदयच्या पायांना हात लावला.

"मी चुकलो. मी हिमालयाएवढी चुक केलीय. मला माफ कर उदय !" मि. साठे आर्जव करु लागले....

"पोटच्या पोराचे दु:ख काय असते ते मलाही तुझ्यामुळेच कळालेय आज उदय. खरंच मी चुकलो."

उदयच्या डोळ्यांतून पाणी आले. तो मिस्टर साठेंकडेकडे अश्रू पुसत पाहू लागला. त्याला आता काय बोलावे तेच समजत नव्हते.

"उदय, तुझ्या मुलाच्या ऑपरेशनचा सगळा खर्च मी करेन. आता मी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे. तू नको काळजी करुस. तुझ्या मुलाला आपण चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ..." असे म्हणून ५ लाख रुपयांची बॅग त्यांनी उदयकडे सुपूर्त केली...

इतक्यात बाहेरुन साहू त्याच्या आईसोबत आत आला....

"बाबा, मला इथे या दादासोबत खेळायला खुप मज्जा आली. हा दादा आणि काका खुप चांगले आहेत."

मि. साठेंना आता खुपच अपराध्यासारखं वाटू लागलं. ते उदयचा निरोप घेऊन बाहेर पडले. आणि इथून पुढे आपल्या कमाईतला मोठा हिस्सा गरीब, गरजूंसाठी द्यायचा असा त्यांनी मनोमन विचार केला आणि ते घरी निघाले.

※—※—※—※—※—※—※—※—※—※

लेखक- श्री. प्रविण निकम


मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

वनिता जागीर

दर पाच दहा मिनिटांनी छनछन असा आवाज होत होता. आवाज झाला की तिची नजर भांड्याकडे वळत होती...पुन्हा डोके वर करुन छोट्याशा नजरेने ती वरच्या दिशेला पाहायची आणि थोडं स्मितहास्य करुन मग पुन्हा पुढच्या 'छनछन'ची वाट पाहायची. खाली जमीन आणि वर तळपणारा सूर्य...पायात चप्पल नाही अन् अंगातील कपड्यांना ठिगळं लावलेली.

छोटी वनिताला आज मात्र पायाला बसणाऱ्या चटक्यांची तमा नव्हती. तिला कसेही करुन दुपारपर्यंत दीडशे रुपये गोळा करायचे होते. आतापर्यंत शंभर जमले होते. अजून पन्नासाची गरज होती. त्या शहरातल्या नगरपालिका शाळेने शाळाबाह्य मुलांचा सर्वे केला त्यात त्यांना वनिताचा शोध लागला होता. मग वनिता दुपार सत्रांत शाळेत जायला लागली. शिक्षकांनी तिचं नाव वयानुरुप प्रवेश देत डायरेक्ट सहावीच्या इयत्तेत घातलं होतं. ती मराठी गणितात तशी बऱ्यापैकी होती पण पैशांचे मोजमाप तिला अचूक करता यायचे कारण चौकातल्या बस स्टँडजवळ उन्हातान्हात उभे राहून भिक मागून खाण्याची वेळ तिच्यावर आली होती. ती वयाने लहान असली तरी घरची जणू कर्ती मुलगी होती. तिची आई तिच्या लहानपणीच अपघातात वारली होती आणि बाप तर असूनही नसल्यासारखाच होता. दिवसभर भिक मागून मिळवलेल्या पैशाची दारु प्यायची आणि कुठेतरी काहीतरी खाऊन दिवस घालवायचा हा त्याचा दिनक्रम.

शेवटी कसाही असला तरी तो आपला बाप आहे ही जाणीव वनिताला होती. आज तिला दीडशे रुपये मिळवायचे होते कारण चाळीस रुपयांचे चार वडापाव आणि दहा रुपयांच्या तापाच्या गोळ्या तिला तिच्या बापासाठी न्यायच्या होत्या. उरलेले शंभर रुपये तिला चौकात बोर्ड लावलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी भरायचे होते. स्पर्धा उद्याच्याच दिवशी होणार होती.

वनिताला शाळेकडून एक शाळेचा ड्रेस मोफत भेटला होता. सारखा तोच धुवायचा आणि सुकवून घालायचा असा तिचा दिनक्रम चालू होता. शाळेत जायला लागल्यापासून ती स्वच्छ आणि साफसुधरी राहू लागली. पण तिचा बाप मात्र अजागळ होता. दारुमुळे त्याची हालत खराब झाली होती.

एक माणूस चालत वनिताजवळ आला. त्याने खिशातून काही काढून भांड्यात टाकले आणि तो निघून गेला. नाण्यांचा छनछन आवाज का झाला नाही म्हणून वनिताने खाली भांड्यात पाहीले आणि तिला आश्चर्य वाटले. तो माणूस चक्क पन्नास रुपये भांड्यात टाकून पुढे निघून गेला होता.

वनिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती भांडं घेऊन पटकन उठली. सगळे पैसे थैलीत टाकले आणि ती औषधाच्या दुकानाकडे झपझप पावले टाकू लागली. रात्री बापाचं अंग तापलं होतं हे तिच्या लक्षात होतं.

"दादा तापाच्या गोल्या द्याल का ह्याच्या.." वनिता दहाची नोट सरकवत म्हणाली.

मेडीकलच्या मालकाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि चार गोळ्या दिल्या. गोळ्या थैलीत टाकून वनिता आता वडापवच्या हातगाडीकडे निघाली..

"भाऊ गरम वडापाव दे की रं...बापाला पायजेल.."

गिऱ्हाईकांची गर्दी असल्याने वडापाववाल्याला बोलायला वेळ नव्हता. त्याने पेपराच्या कागदात चार वडे, चार पाव आणि दोन मिरच्या बांधून दिल्या.

आता मात्र जिंकल्याचा अविर्भाव तिच्या डोळ्यांत दिसत होता. ती घरी गेली. घर कसले कापडं बांधून बनवलेला छोटा तंबूच होता तो. बाप हातभट्टी पिऊन नशेत काहीबाही बरळत होता.

"बापा उठ रं..बघ खाऊन घे आनि ह्या गोल्या खा...बघ आंग थंडगार पडल."

तिच्या बापालाही वनिताची काळजी होती पण दारुपुढं त्याची मति गेली होती. चांगलं वाईटाची जाण हरपली होती. त्याला खुप वाटायचं की पोरीला मोठ्ठं कुणीतरी बनवायचं पण दारुने त्याला हतबल बनवलं होतं...

तो उठला. पेपराची पुडी सोडून त्यातल्या वडापावच्या दोन वाटण्या केल्या. पण वनिताने लगेचच आपल्यातला एक वडापाव बापाच्या पुढ्यात ठेवला.

"आगं खा की..."

"नको ...मी खाल्लंय रं मगाशीच...तुजं दोनानी काय व्हतंय बापा...तापात तू जरा खाशील तर दमनार नाहीस...होशील बरा लवकर...खा नि मग औषध खा..."

"वने तू जातेय न्हवं शालेला?"

"व्हय..."

एक वडापाव आणि दोन ग्लास पाणी पिऊन वनिताचं पोट फुल्ल भरलं. रस्सीवरचे शाळेचे कपडे तिने हाताने काढले. केसांना फणी लावली मग पायांच्या गाडीने निघाली शाळेला.

शाळा एक किलोमीटर अंतरावर होती. शाळेतील शिक्षक तिच्याशी खुप चांगले वागायचे मात्र इतर मुले तिला सहसा जवळ घ्यायची नाहीत. कारण होते फक्त एकच...ती चौकात भिक मागायची म्हणून ! पण करणार तरी काय....देव काहींना खुपच खडतर आयुष्य देतो. पण वनिता सारे काही तक्रार न करता सहन करायची...देवाने आयुष्य खडतर दिले असले तरी ते सहन करण्याची शक्ती आणि समज मात्र या छोट्याशा वयात तिला दिली होती.

संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली. वनिता संध्याकाळीही भिक मागूनच रात्रीच्या खाण्याची सोय करायची. कारण दारुमुळे बाप काम करत नव्हता आणि बालकामगारांना बंदी असल्याने वनिताला कुणी कामावरही ठेवत नव्हते...नाईलाजाने तिला तो मार्ग पत्करावा लागला होता. रात्री सुद्धा वडापाव खाऊनच ते छोट्याशा तंबूत झोपी गेले.

सकाळ झाली. आज रविवार होता. वनिताची ऊठून तयार होण्याची घाई चालली होती. तिने बापाच्या कपाळावर हात ठेऊन पाहीले. अंग गार होतं. मग तिने त्याला हलवलं...

"बापा ऊठ रं..."

"का गं..आज सुट्टी हाय न्हवं?"

"हो रं...माजं काम हाय यक...मी जातेय."

"बर्र जा.." बाप अर्ध्या झोपेच्या तंद्रीत बोलला.

चौकाच्या बाजूलाच असलेल्या हॉलमध्ये आज कुठल्यातरी संस्थेने चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्याचा चौकातला बोर्ड वनिताची नजर वेधून घेत होता. प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते पाच हजार रोख...!

वनिता हॉलमध्ये पोहोचली. अंगात तोच शाळेचा ड्रेस होता. तिने फ्रॉकच्या खिशातून पन्नासची एक नोट आणि बाकीची चिल्लर नाणी बाहेर काढली...समोरच नाव नोंदणी करणारा माणूस बसला होता. वनिताची नजर त्याच्याकडे गेल्यावर तिला मोठे नवल वाटले. तो माणूस तोच होता ज्याने तिच्या भांड्यात पन्नासची नोट टाकली होती...

वनिताने न राहवून त्याबद्दल त्या माणसाला विचारलेच...

"हो गं बाळा...तू चौकात असताना मधून मधून पाच ते सहा वेळा स्पर्धेच्या बोर्डजवळ येऊन गेलीस. तो बोर्ड तू सारखाच निरखून पाहत होतीस. मी ते सारे इथून पाहीले. तुला यात भाग घ्यायचाय हे मी ओळखले...पण तुझी पैशांची अडचण असावी असे वाटले म्हणून मी ते पैसे टाकले..."

स्पर्धा सुरु झाली. कागद, पेन्सील, कलर, पट्टी, रबर सारे काही तिथे स्पर्धकांना फी च्या शंभर रुपयांत पुरवले गेले. वनिताच्या वयाचेच बरेचसे स्पर्धक होते साधारण दहा ते बारा वर्षांचे..

एक तास पूर्ण झाला. स्पर्धा संपली. प्रत्येकाची चित्रे गोळा केली गेली. एक तासाने निकाल जाहीर होणार होता. प्रथम क्रमांकाच्या  विजेत्याला नगरसेवकांकडून पाच हजाराचे बक्षीस दिले जाणार होते...सर्व स्पर्धकांच्या मनाची घालमेल सुरु होती. कोण विजेता ठरेल कुणाला काहीही अंदाज लावता येत नव्हता.

बक्षीस वितरणासाठी नगरसेवकांची गाडी आली. मागे दोन सुरक्षारक्षक होते. रांगेत शेवटी बसलेली वनिता हे सर्व भोळ्या नजरेने पाहत होती...बक्षीस वितरणाला सुरुवात झाली.

"तृतीय क्रमांक मिळाला आहे...." नगरसेवक असे म्हणताच सर्वांचे कान टवकारले गेले...

".....कुमार रोशन वानखेडे शाळा जॉन्सन इंग्लिश मिडीयम स्कूल याला...."

सर्वांनी टाळ्यांनी अभिनंदन केले.

नगरसेवक पुढे बोलू लागले....

"द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेय.....कुमारी श्वेता सिंग, सुभेदार हायस्कूल...."

पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला...

आता मात्र सर्वांचीच ऊत्सूकता ताणली गेली होती. नव्हे शिगेलाच पोहोचली होती !

हॉलमध्ये एकदम शांतता ! टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल इतकी...
आणि नगरसेवकांच्या तोंडून शब्द निघाले.....

"होय...तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचे नाव आहे वनिता जागीर नगरपालिका शाळा...$$$"

वनिता भारावल्यासारखी शेवटच्या रांगेतून ऊठली. पण रोज चौकात भिक मागणाऱ्या मुलीला पहिला नंबर मिळाला असल्याने टाळ्यांचा गजर होईना....सगळे सुन्न आणि स्तब्ध झाले होते.

..इतक्यात हॉलच्या दरवाज्या बाहेर कुणीतरी टाळ्या वाजवत आत आलं ! वनिताने कोण म्हणून बाहेर पाहीलं...तिचा बाप होता तो. पोरीला पाहायला सहज चौकात आला होता पण माईकवर पुकारलेले तिचे नाव ऐकताच तो हॉलकडे धावला होता. वनिता भारावून गेली. होती. दरवाजात जाऊन तिने बापाला स्टेजवर आणले. नगरसेवकांनी प्रशस्तीपत्रक आणि पाच हजार रोख बक्षिस तिच्या हातावर ठेवले...आणि अजून एक माणूस आनंदाने टाळ्या वाजवू लागला...

होय...तोच माणूस ज्याने पन्नास रुपये तिच्या भांड्यात टाकले होते...मग जेव्हा स्वत: नगरसेवकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. एखादी गोष्ट लगेच पचनी पडत नाही याचे याची देही याची डोळा जिवंत उदाहरण होते ते !

नगरसेवक मात्र त्या पोरीचे कौतुक करताना थकत नव्हते. त्यांना तिचा अभिमान वाटत होता...त्यांनी लगेचच तिला दत्तक घेऊन तिच्या पुढील सर्व शिक्षणाचा सगळा खर्च करीत असल्याचे उपस्थितांसमोर जाहीर केले. दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रांत वनिता झळकली होती. मदतीचे हात पुढे आले. त्या माणसाच्या पन्नास रुपयांनी जणू कमाल केली होती.

राजकारणी फक्त आश्वासने देतात ही सर्वसामान्यांची समजूत पण आज ही मुलगी M.B.B.S च्या दुसऱ्या वर्षाला आहे हे पाहीले तर खात्री पटते की सगळी माणसे सारखी नसतात...माणसांमध्येही काही देवमाणसे असतातच...

आज तिचा बाप छोटेसे दुकान चालवतोय. पोरीची प्रगती पाहून बापही सुधारला होता.

काळ खडतर आयुष्याचेही सोने करु शकतो हेच खरे !
________________________________________
कथा लेखक- श्री. प्रविण निकम


रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आत्मविश्वासाचा मंत्र

रायपूरचा राजा चंद्रदेव सध्या खुपच चिंतेत होता. त्याचे राज्य खुपच लहान. जेमतेम एक हजाराच्या आसपास सैन्य होतं त्याच्याकडे. त्यामुळेच आसपासचे बलाढ्य राजे रायपूरवर आक्रमण करण्याचा नेहमीच मनसुबा करीत.

एकदा शेजारील ब्रम्हपूरचा बलाढ्य राजा बलदेव हा रायपूरवर आक्रमण करुन ते राज्य जिंकण्याचा विचार करत आहे अशी वार्ता एक गुप्तहेर घेऊन आला. राजा चंद्रदेव काळजीत पडला. कारण राजा बलदेवकडे जवळजवळ २०००० सैन्य होतं आणि राजा चंद्रदेवकडे फक्त १०००.

चंद्रदेव राजाची चिंता वाढू लागली. राजाने अन्नपाणी सोडले. प्रजाही भयभीत झाली. सैन्यही पूरते घाबरुन गेले. संपूर्ण रायपूर नगरीवर जणू भीतीचेच साम्राज्य पसरले होते.

राजा मात्र आता दरबारातील बुद्धीवंतांचा सल्ला घेऊ लागला. दरबारात तशी खुप विद्वान मंडळी होती परंतु बलदेवाचे आक्रमण कसे परतून लावायचे यावर कुणाकडेच काही उपाय नव्हता.

शरणागती पूर्वी शेवटचा उपाय म्हणून राजाने राज्यात दवंडी पिटवली. आक्रमणाविषयी प्रजेला माहीती देण्यात आली. कुणाकडे काही जालीम उपाय असेल तर दरबारात यावे...राजा त्याला सुवर्ण मुद्रांनी मढवून टाकेल असेही सांगण्यात आले...

नेहमीप्रमाणे दरबार भरला. दरबारातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचाच लवलेश होता. राजा, सेनापती अस्वस्थ दिसत होते. इतक्यातच दरबारात एका साधूने प्रवेश केला. लांब दाढी, कपाळाला टिळा लावलेल्या साधूला सेवकांनी राजापुढे हजर केले.

"महाराजांचा जयजयकार असो."

"या साधू महाराज, तुमचे दरबारात स्वागत आहे. युद्धाविषयी,आक्रमणाविषयी आपल्याला काही सांगावयाचे आहे का?"- राजाने चौकशी केली

"होय महाराज, आपण सगळे घाबरुन गेले आहात. कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे म्हणून."

दरबीरातील सर्व साधूच्या बोलण्याकडे टक लावून पाहू लागले.

"महाराज, निव्वळ सैन्य कमी आहे म्हणून घाबरणे योग्य नाही. सैन्य कमी आहेच परंतु आपण आपला आत्मविश्वासही गमावला आहे.
युद्ध हे सैन्याच्या बळावर लढले जाते हे खरे आहे पण त्याही पेक्षा ते आत्मविश्वासाच्या बळावर जास्त लढले जाते."- साधू.

साधू महाराज आता पुढे काय बोलणार याबाबत राजासह सर्वांचीच ऊत्सुकता वाढली.

"महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. बोलण्यास क्षमा असावी. परंतु आपण मला परवानगी दिलीत तर आपल्या फक्त एक हजार सैन्याच्या बळावरच मी हे युद्ध जिंकून दाखवेन...!!!"

साधूच्या या बोलण्यावर दरबार अवाक् होऊन स्तब्ध झाला. आता पर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त पराभवाचेच शब्द होते...पहील्यांदाच कुणीतरी युद्ध जिंकण्याची भाषा बोलले होते. ती व्यक्ती सुद्धा कुणी युद्धातील तरबेज व्यक्ती नव्हती तर ते होते साधू महाराज...

सततच्या जप आणि ध्यानामुळे साधू महाराजांचा आत्मविश्वास खुप मोठा होता.
राजालाही आश्चर्य वाटले. एक साधू युद्ध जिंकण्याची भाषा बोलतोय आणि आपण मात्र ऊगाचच घाबरतोय हे त्याच्या लक्षात आले. आपण घाबरल्याने दरबारातील सर्वांचाच आत्मविश्वास ढळून गेलाय, सैनिकही घाबरुन गेलेत हे राजाच्या चांगलेच लक्षात आले.

कितीही कठीण परिस्थिती असली तरी घाबरुन जायचे नाही, त्या परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करायचा हा मंत्र राजाला नव्याने मिळाला होता...

राजाचा आत्मविश्वास वाढला. दरबारातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढला. सैनिकही जोमाने युद्धास तत्पर झाले. प्रजाही आत्मविश्वासाने तळपली.

साधूमहाराजांनी दरबारात येऊन प्रत्येकात आत्मविश्वास फुंकण्याचे महत्त्वाचे काम केले होते. राजाने देऊ केलेल्या सुवर्ण मुद्रा न स्विकारताच साधूंनी दरबारातून प्रस्थान केले.

पुढे घनघोर लढाई झाली. राजा चंद्रदेवकडे जरी १००० सैन्य होते तरी ते शत्रूच्या २०००० पेक्षाही जास्त होते कारण त्या एक हजार सैन्याकडे जो आत्मविश्वास होता तो वीसहजार  सैन्यांची तुलना करेल इतका होता.

आत्मविश्वासाच्या बळावर सैन्य तुटपुंजे असूनही राजा चंद्रदेवने युद्ध जिंकले...राज्यात सगळीकडे गोड पक्वाने वाटून आनंद साजरा करण्यात आला....एक नवा मंत्र सगळ्यांना मिळाल्याने आता कुणाच्याच चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता....

लेखन-प्रविण निकम
(जून्या ऐकीव कथेवर आधारीत)


________________________________________

बाप बेटीचं नातं...

लेखन- श्री. प्रविण निकम

श्री. सारंगे ज्यूनीअर कॉलेजवर प्रिंसिपल या पदावर कार्यरत होते. त्यांची शिस्त आणि दरारा आख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्यांनी बोलायचं आणि इतरांनी त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानूनच झेलायचा..असे जणू समीकरणच बनले होते.

सारंगे सरांनी कॉलेजमधील कडक शिस्त घरीही आणली होती. त्यांच्या घरीही जणू सर्व काही शिस्तबद्ध असायचे. सारंगे सरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की तो जणू अंतिमच अशीच घरातील सर्वांची धारणा झाली होती. त्यांची बायकोही त्यांना 'सर' म्हणायची आणि स्वत:ची मुलेसुद्धा सरच म्हणायची..! 

सरांनी स्वत:च्या घराचंही जणू शिस्तबद्ध कॉलेजच बनवून टाकलं होतं...जे कॉलेजमध्ये तेच घरी. माणसाचं वागणं सर्व ठिकाणी सारखंच असावं अशा मताचे ते होते...

आज त्यांनी घरातील सर्वांची मिटिंग बोलावली. होय..संवाद नव्हे चक्क मिटिंगच म्हणा !त्यांच्याकडे भावनांचा अभाव होता म्हणा किंवा त्यांनी स्वत:ला तसे बनवले होते म्हणा... ते घरातसुद्धा ते अगदी मशीनसारखेच वागायचे...

"या घरात मी बोलेन तेच फायनल...बाकी कुणाच्या मताला काडीचीही किंमत नाही." सरांनी हुकूम सोडला.

"अहो पण..." बायको बिच्चारी साधी होती.

"तुम्ही तर एकही शब्द बोलायचा नाही आमच्यापुढे.." घरगूती मिटिंगमध्ये जणू फतवा निघाला.

मुलं बिच्चारी अगदीच गप्प होती. त्यांची तेवढी समजही नव्हती. ती नुसतीच धाक म्हणून तिथे बसायची....तोफेच्या तोंडी फक्त त्यांच्या आईलाच जावे लागायचे. ती सुद्धा पोरांसाठी मुग गिळून गप्प राहायची....

त्यांच्या घरात जणू हुकूमशाही होती...प्रेम, आपुलकी, आपलेपणा या गोष्टी कित्येक मैल दूर होत्या...

मुलांनाही पप्पा हवे होते..पण तशी सोय नव्हती...वातावरण नव्हते. मुलांची आईसुद्धा हतबल झाली होती. काहीतरी चमत्कार होईल अन् यांचे वागणे बदलेल या एकाच आशेवर बिच्चारी तग धरुन होती...

सरांच्या अशा वागण्याचे एक कारण मात्र मुलांनी शोधून काढले होते. सरांना कॉलेजात कामाचा खुपच लोड असतो. म्हणून ते घरी अशी चिडचिड करतात हे मुलांनी पुरते ओळखलेले होते.

औपचारीक मिटिंग संपली होती. सर्वजण जेवणाच्या निमित्ताने पंक्तीला बसले होते.
सरांना दोन मुलं होती. मुलगी मानसी आणि मुलगा दिनेश...मानसी पाचवीत होती आणि दिनेश सातवीत.

आज रात्री जेवताना मुलांच्या आईने सर्वांना जेवण वाढलं होतं...प्रत्येकाच्या पुढ्यात मेथीची भाजी, चपाती, आमटी आणि भात वाढला होता. वाढल्यानंतर लगेच काहीही न बोलता खायला सुरुवात करायची ही सरांची शिस्त होती. दिनू आणि सरांनी सुरुवात केली होती पण मानसी मात्र शांत होती.

"तुझ्या घशाखाली घास जात नाहीय का? गिळवत नाहीय वाटतं.." सरांच्या मशीनमधून शब्द बाहेर पडले.

"मानसी, राणी खा गं...सर सांगताहेत ना.." आई म्हणाली.

"आई मला भूक नाहीय गं.." मानसीचे निर्वीकार उत्तर.

सरांनी मानसीकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
मानसीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण नाराजी दिसत होती. पण सरांना त्याची काहीच पर्वा नव्हती. रात्री सर्वजण झोपी गेले.

सकाळ झाली. सर शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. दिनेशही ऊठला होता. आईची टिफीन तयार करण्यासाठीची लगबग सुरु होती. परंतू रोज लवकर उठणारी मानसी मात्र आज उठली नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले. आई काळजीने मानसीजवळ आली आणि तिला हलवून उठवू लागली.

"राणी, अगं उठतेस ना...उशिर झालाय शाळेला जायला. उठ पटकन..."

"आई, अगं मला जावंसं वाटत नाही गं आज शाळेला.." छोटीशी मानसी म्हणाली.

मानसीचं हे वाक्य सरांच्या कानी गेलं. तणतणतच सर बेडरुममध्ये आले.

"काय झालंय तुला? काय धाड भरलीय शाळेत जायला....?"

मानसी गप्प होती.

"मी काय म्हणतोय, कान बहिरे झाले आहेत काय तुझे.....मुकाट्याने उठायचं आणि शाळेत निघायचं. मला बाकी काही माहीत नाही."

"अहो तिला नाही जायचं आज तर राहूद्या...कशाला सक्ती करायची..." मानसीची आई बोलली.

"फुकटचं मिळतय ना...म्हणून हे सूचतंय तुम्हाला...कशी नाही शाळेत जात तेच बघतो.."

सरांच्या शरीरात जणू हुकूमशहा शिरला होता. त्यांनी मांजरांना हाकलायची काठी उचलली आणि झोपलेल्या मानसीवर एकच फटका ओढला....

"उठ....उठ म्हणतोय ना....जातेस की नाही शाळेत...."

मानसीला बसलेल्या फटक्याने ती तळमळली....सहन न होण्याइतपत तो फटका तिने कसाबसा सहन केला..डोळ्यांतून पाणी घळाघळा बाहेर पडलं पण तोंडातून रडण्याचा आवाज जराही बाहेर पडला नाही...
मुलांनी आपली सहनशक्ती जणू वाढवली होती.

"या घरात मी सांगेन तस्सच झालं पाहीजे. कुणीही आपला शहाणपणा चालवायचा नाही." सरांनी हिटलरी फर्मान सोडलं.

पण मानसी काही सरांच्या फर्मानाला जूमानली नाही. ती अंथरुणावर ऊठून बसली पण शाळेत जायला काही राजी होत नव्हती.

आता मात्र सरांच्या इगोचा कडेलोट झाला. 'आपली मुलगी आपलं ऐकत नाही म्हणजे काय'...या एकाच विचाराने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. 

त्यांनी मानसीचा हात धरला आणि तिला फरफटत आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेऊ लागले. पोरांना याची सवय होती...पण आज सरांना मात्र थोडे विचित्र वाटले. मानसीला ओढताना त्यांचा हात गरम झाला होता. मानसीचं अंग तापाने फणफणलय याची त्यांना पुसटशी जाणीव झाली. मानसीच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. ती जणू अर्धवट शुद्धीत होती. काय घडले म्हणून किचनमधून तिची धावतच आली. पाहते तर मानसीची शुद्ध हरपलेली होती. 

मानसीची आई ते दृश्य पाहून ओक्साबोक्शी रडू लागली. राणी तिचा जणू जीव की प्राण होती. काय करावे हे तिला कळेना...

"अहो...का एवढे निष्ठूर होताय, उचला की राणीला, चला न्या की पटकन दवाखान्यात...!"

सरांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुठेतरी माणूसकी शिल्लक होती. त्यांनी लगबगीने मानसीला दोन्ही हातांवर उचललं आणि ते बाहेर धावले. त्यांच्या हाताला चटके बसतील इतका ताप मानसीच्या अंगात होता. बाहेर आल्यावर तिची आई रिक्षाला हात करुन थाबण्यासाठी आर्जव करु लागली. अखेर एक रिक्षा थांबली आणि ते रिक्षात बसून जवळच्याच दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी करुन लगेचच सलाईन लावली. दोन तासांच्या औषधोपचारानंतर मानसी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली.

मानसीने डोळे उघडले. समोर तिची आई उभी होती.

"आई, सर कुठे आहेत?" मानसीने प्रश्न केला.

" ते बाहेर बसलेत.."

"आई, माझं एक काम करशील?"

"बोल राणी....नक्की करेन..."

"आई तू बाहेर जा, आणि सरांना पाठवून दे आत..."

मानसीची आईला काही कळायला मार्ग नव्हता. ती थोडी गोंधळली...पण आपल्या आजारी मुलीची इच्छा म्हणून ती बाहेर आली...

"तुम्हाला राणीने आत बोलावले आहे...."

"बरं..." सर गंभीर होते. ते आत गेले. त्यांनी मानसीकडे एक हलका कटाक्ष टाकला. पण मानसी मात्र त्यांच्याकडे अगदीच रोखून बघत असलेली त्यांना दिसली.

"बोल..." सर उद्गारले.

"पप्पा...इकडे या ना..."

सरांना काही कळत नव्हतं...ते तिच्या जवळ गेले. मानसी हलकेच उठून बसली. सरांचा हात तिने आपल्या छोट्याशा हातांत घेतला आणि म्हणाली...

"पप्पा...सकाळपासून उपाशी आहात ना...तुमचे हात किती गरम लागताहेत...ताप तर नाही ना तुम्हाला...थांबा..."

असे म्हणून मानसी धडपडत उठली...रात्री तिने जेवण करावं म्हणून तिचा भाऊ दिनेशने आमिष म्हणून तिला एक कॉफी चॉकलेट दिले होते ते तस्सेच तिच्या फ्रॉकच्या खिशात होते....तिने ते चॉकलेट गुपचूप बाहेर काढले...

"पप्पा 'आ' करा ना...प्लीज.."

मानसीच्या या बोलण्याने दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फुटला. सरांनी काही कळायच्या आतच नकळत 'आ' करुन तोंड उघडले आणि मानसीने पटकन त्यांना ते चॉकलेट भरवले...

"पप्पा आता बघा तुमच्यात शक्ती येईल..." मानसीचे भाबडे बोल बाहेर पडले आणि...

सर हुंदके देऊन ढसाढसा रडू लागले....
त्यांच्याकडे आता शब्दच नव्हते. होत्या फक्त भावना....त्यांनी रडता रडता मानसीला आपल्या छातीशी धरले....तिलाही तेच हवे होते...

"मी खूप वाईट आहे गं राणी...."

आज पहिल्यांदाच ते आपल्या मुलीला राणी म्हणाले होते....

"रात्री तुला ताप आला होता म्हणून जेवली नाहीस ना...मग मी ओरडल्यावर सांगीतले का नाहीस.?"

"पप्पा तुम्ही आमच्यासाठी किती काम करता..तुम्ही दमून घरी येता...तुम्हाला आणखी त्रास नको म्हणून नाही सांगीतलं..."

"सकाळीही मी मारलं तरी तू मुकाट्यानं मार खाल्लास बेटा....तू रात्रीपासून उपाशी होतीस, तुला ताप आला होता...तरीही मी तुला मारलं...मी निष्ठूर आहे..."

"पप्पा तुमचा हात मला कधीच लागत नाही.." मानसीच्या डोळ्यांतूनही पाणी आले.

सरांच्या मनाची घालमेल झाली...त्यांनी डोळे पुसले आणि ते तडक बाहेर पडले. मानसीची आई आत आली...तिला तर काही कळायलाच मार्ग नव्हता...

तासाभरात सर परत आले...सोबत मुलगा दिनेश होता. त्याला शाळेत जाऊन त्यांनी आणले होते. त्यांनी दवाखान्यातील त्या रुमच्या दाराला आतून कडी घातली. समोर मुलगा दिनेश, मानसी आणि तिची आई होती...
सरांना गहिवरुन आले. त्या तिघांसमोर त्यांनी सपशेल हात जोडले आणि ते ढसाढसा रडू लागले.

त्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं...

"मला माफ करा....मी चुकीचा वागलो...तुम्ही मला हवे आहात...!"

थोडावेळ वातावरणात गंभीरता पसरली...पण थोड्यावेळानंतर मात्र सगळं वातावरण छान, झक्कास झालं...सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य पसरलं होतं...

तेवढ्यात दारावरची बेल वाजली...

दिनेशने कडी काढली. डॉक्टर आत आले. त्यांनी मानसीला तपासले आणि डिस्चार्ज दिला. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर आले. 


सरांनी हातातल्या घड्याळात पाहीले. दुपारचे साडेबारा वाजले होते. सरांनी फर्मान सोडलं...
"आता आपण अजिबात घरी जायचं नाही.."

मग काय....पहिल्यांदा आईस्क्रीम..मग जेवण..नंतर सिनेमा...संध्याकाळी गार्डन...मग शॉपींग....

सर्वांनी सरांचं फर्मान अगदी आवर्जून डोक्यावर घेतलं होतं....

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

आदर्श माणसाचे मॉडेल

"विद्यार्थ्यांनो बरोब्बर तीन दिवसांनंतर तुम्ही तुमचे मॉडेल याठीकाणी सर्वांसमोर सादर करायचे आहे." आपले डोळे थोडेसे किलकिले करुन प्रोफेसर वांगी मुलांना सांगत होते.

अकरावी आर्ट्सच्या मुलांना थोडे नवलच वाटले. प्रोफेसर त्यांच्या टॅलेंटची परीक्षा घेऊ इच्छीत होते. पण मॉडेलचा विषय ऐकून जवळजवळ सर्वच विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.

"सर, विषय चेंज करुन दिलात तर बरे होईल." प्रियाने आपले मत व्यक्त केले परंतू प्रोफेसरांनी नकारार्थी मान हलवली आणि आता आपल्याला दिलेल्या विषयावरील मॉडेलचेच सादरीकरण करणे अनिवार्य आहे हे सर्व विद्यार्थी ओळखून गेले.

आणि मॉडेलचा विषयही तसा जरा आगळा वेगळाच होता..."आदर्श माणूस !"

या विषयावर काय डोकेफोडी करायची याचाच ज्याच्या त्याच्या मनात विचार सुरु होता. कँटीनमध्येही वडापाव खाताखाता हीच चर्चा रंगली होती. काहीजणांना आज वडापावही घशाखाली उतरत नव्हता. याला कारणही तसेच होते. जो उत्कृष्ट मॉडेल बनवेल त्याला त्या ज्यूनिअर कॉलेजचा जीएस म्हणून नेमले जाणार होते. आणि योग्य जीएस निवडला जावा म्हणून आता मुलांच्यातही चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातूनच स्वभावधर्मानुसार गट पडू लागले. आणि बघता बघता दोन गट पडले.

प्रोफेसर वांगी तसे शांत स्वभावाचे. आदर्श व्यक्ती खरेतर त्यांच्यातच दडली होती. पण आज त्यांनीच हा विषय दिला होता त्यामुळे त्यांना नक्की काय अपेक्षीत होते हेच मुलांच्या लक्षात येईना....

मुलांचा पहिला दिवस फक्त विचार करण्यातच गेला. कुणालाच काही सूचत नव्हते. मॉडेल नक्की कसे बनवायचे, सादरीकरण काय अन् कसे करायचे याबाबतीत प्रोफेसरांनी मुलांना पूर्णपणे सूट दिली होती. फक्त मॉडेल मधून सर्वात आदर्श माणूस व्यक्त व्हावा एवढीच काय ती त्यांची माफक अपेक्षा होती...

खरेतर प्रोफेसर वांगी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असत पण आताचा विषय जरा वेगळाच होता. मॉडेल कसे करायचे याची मुलांना चिंता होती. त्यांना जीएस होण्याची हाव अथवा आवड नव्हती पण आपल्या आवडत्या प्राध्यापकांना आपले मॉडेल कसे वाटेल, किती आवडेल याची थोडी भीती आणि उत्सुकताही होती. 

मुळात प्राध्यापकांना मुलांचं भविष्य आणि  कुमार वयातल्या जाणीवा समजून द्यायच्या होत्या आणि त्या दृष्टीने मुलेही विचार करीत होती. वांगी सरांना आपलं मॉडेल आवडावं म्हणून जणू विद्यार्थ्यांत स्पर्धाच लागली होती आणि कॉलेज हे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे जणू एक केंद्रच बनून गेले होते.

आधीच कॉलेजमध्ये दोन ग्रुप झाले होते म्हणजे आता दोन गटात उत्कृष्ट मॉडेल बनविण्याची जणू स्पर्धाच सर्वांना दिसत होती. हे दोन्ही ग्रुप प्रोफेसर वांगीसरांना आपले मॉडेल कसे आवडेल व ते कसे खुश होतील हा विचार करण्यातच गुंतले होते.

आता कॉलेज कॅन्टीनचं रुपांतर जणू कॉन्फरन्स हॉल मध्ये झालं होतं आणि सर्वांच्या विचारांची चक्र फिरु लागली होती की नेमकं करायचं काय...!

प्रियालाही अगदी काही सुचेनासं झालं होतं, कारण आदर्श माणूस हे मॉडेल म्हणून घ्यावं की जीवनशैली म्हणून काही कळतच नव्हतं.

शेवटी खुप विचार केल्यावर रुळलेल्या वाटेनं न जाता अगदी वेगळ्या वाटेनं जावं आणि समाजातल्या माणसांच्या गर्दीत माणुसकी जपणारी माणसं शोधावी आणि त्यांना एक  मॉडेल म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून बघावं हे ठरलंच. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाठ बांधली होती ती म्हणजे आदर्श माणूस शोधून काढण्याची.

...ठरल्याप्रमाणे मुलांनी तो शोध सुरु केला. खरंतर हा शोध खुप कठीण होता परंतू या मुलांसाठी तो सोपा बनला होता कारण 'पुस्तकात आदर्श शोधण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून समाजात बघावं' ही वांगी सरांची शिकवण त्यांच्या चांगलीच लक्षात होती. 

आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली होती. प्रत्येक विद्यार्थी आता आदर्श माणसाचा शोध घेऊ लागला. तसं पाहता मुलांकडे वेळ कमीच होता. या कमी वेळातच त्यांना आदर्श माणूस शोधून त्याचा अभ्यास करुन मॉडेलही ठरवायचं होतं. 

आदर्शाच्या प्रवासात मुले खुप ठिकाणी फिरली. लहान मोठ्या वाड्या-वस्त्यांना त्यांनी भेटीही दिल्या आणि तिथल्या लोकांच्या समस्या व त्या समस्या सोडवणारी माणसं ती शोधू लागली. पण हजारो मैलांचा प्रवास करुन हवं तसं यश मुलांना मिळत नव्हतं. 

ही सर्व मुलं अगदी त्यांच्या लहानपणापासूनच ज्यूनिअर कॉलेजच्या समोरील खासगी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती. ज्यूनिअर कॉलेजवर प्राध्यापक असलेले वांगी सरच ते अनाथाश्रम देणग्या गोळा करुन चालवत होते. आई-बापाविना असलेल्या या पोरांना त्यांनी कधीही आईवडीलांची कमतरता भासू दिली नव्हती इतकी प्रेमाने ते या मुलांची काळजी घेत असायचे. आता मोठी झालेली ही मुले कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती.

अशा प्रकारे लहानपणापासूनच वांगी सरांच्या विचारांत वाढलेली ही मुलं आज 'आदर्श माणूस' या मॉडेलच्या शोधात कितीतरी ठिकाणी फिरत होती. 

शेवटी आदर्श माणूस न मिळाल्यानं हताश झालेली ही मुलं परत आली आणि निशब्द झाल्यासारखी हॉस्टेलच्या पायरीवरच बसली.
वातावरणात जणू स्मशान शांतता पसरली होती. कुणाच्या तोंडून साधा 'ब्र' ही निघत नव्हता. बोलण्याची इच्छा जरी असली तरी मुलांमध्ये आता शक्ती उरली नव्हती.

मॉडेल शिवाय आपल्या लाडक्या प्राध्यापकांच्या पुढे कसं उभं राहावं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. या विचारांत सगळी मुले मग्न असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समोरच्या चिंचेच्या झाडावरच्या घरट्यातून एका पक्ष्याचं पिल्लू खाली पडलं. प्रियाने ते पाहीलं आणि ती झटकन ऊठली. तिने पिल्लाला उचललं आणि गोंजारु लागली. सचिनने त्याबद्दल प्रियाला हटकलं आणि पिल्लाला परत घरट्यात ठेऊन दिलं.

विद्यार्थ्यांचे दोन्ही गट त्या हॉस्टेलच्या पायरीवरुनच घरट्याकडे कुतूहलाच्या नजरेने पाहत होते. थोड्या वेळानं दोनचार पाखरं त्या ठिकाणी आली आणि त्या पिल्लाला चोचीने मारु लागली. सारेजण त्या दृश्याकडे अगतिकतेने व हताशपणे पाहू लागले.

इतक्यातच प्रविणच्या डोळ्यांत एक वेगळीच तगमग दिसू लागली आणि त्याने त्या सर्वांनाच वरच्या दिशेला लक्ष देण्यास सांगीतले. आकाशात विजेचा लपंडाव चालू होता. आणि एक घार चित्कारत वरुन घिरट्या घालत होती. पापणी लवते ना लवते तोच घारीने वाऱ्याच्या वेगाने खाली येत घरट्यातील पिल्लाला चोचीत पकडले आणि ती उडून गेली आकाशात !

क्षणात घडलेले हे दृश्य पाहून सर्व मुलांचे मन हेलावले. त्यांचे डोळे ओले झाले होते. एक जीव क्षणात मारला गेला होता ज्याला अजून नीटसे जग कळले नव्हते. 

सर्वांचे चेहरे पडले होते.
आणि हे दृश्य पाहता पाहता त्या सर्वांची नजर गेली समोरच्याच अनाथाश्रमाकडे ज्यावर मोठ्या अक्षरांत लिहीलं होतं 'आपलं घर !'
जिथे एवढे कोवळे जीव आजपर्यंत फुलांसारखे जपले गेले होते. सर्वांच्या नजरा आता एकटक त्या अनाश्रमाकडे होत्या....

....कारण त्या अनाथाश्रमात बसला होता एक महान असा 'आदर्श माणूस'....तो म्हणजेच प्रोफेसर वांगी सर !!!

_________________________________
कथालेखक:- Pravin Nikam & Sachin Rana
__________________________________________
टिप:- सदर कथेचा पूर्वार्ध मी लिहीला असून उत्तरार्ध श्री. सचिन राणा सर यांनी लिहीला आहे.


___________________________________________

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

तो आणि वृक्षारोपण !

कालचीच गोष्ट. वृक्षारोपण करायचे म्हणून दहा झाडे आणली नर्सरीतून. त्यात आंब्याची, चिंचेची, आणि नारळाची झाडे होती. आदल्या दिवशीच गावातल्या एका माणसाला हाताशी घेऊन खड्डे खणून ठेवले होते. 

कालची सकाळही अगदी धावपळीचीच. झोपेतून ऊठलो तोच स्वप्नातून खडबडून जागा होत.



त्याचं झालं असं...रात्री घरात मी एकटाच होतो. घरातले सगळे मामाकडे पाहूणे गेले होते. टिव्हीसमोर रिमोटने एकेक चॅनेल उगाचच पुढे पुढे सरकवत होतो.

...आणि माझ्या हॉलचा दरवाजा धाडधाड वाजू लागला. मी एकटाच असल्याने पुरता घाबरुन गेलो. 'कोण असेल?' याची कल्पनाही करवत नव्हती. कारण आमच्या खेडेगावात आजवर मी खुप विचित्र कथा ऐकल्या होत्या. तरीही घाबरत घाबरत मी दरवाज्यापाशी गेलो.

"कोण?" मी घाबऱ्या आवाजातच विचारले.

"आधी दार उघड मग सांगतो !"

आता तर मी पुरताच घाबरुन गेलो होतो...

मी भूतबीत मानत नाही. पण रात्री बाराच्या दरम्यान असा आवाज ऐकल्याने मी माझी सद्-विवेकबुद्धी जणू हरवून बसलो होतो.

कोंढाणा किल्ला लढवताना जसा मावळ्यांच्या 'लढा नाहीतर मरा' असा आवाज कानी पडला तस्साच आवाज माझ्याही कानात दुमदुमल्यासारखे झाले.

मी डेअरिंग करुन पुढे झालो आणि दरवाजाला हात घातला. सटकन कडी उघडली आणि तो झपकन आत आला.

उलटे पाय...दोन दात बाहेर...अगदी विचित्रच !
हा भूतांच्याच जातीतला आहे हे मी पुरते ओळखले होते.

"बाबारे काय पायजे तुला, तू इथे कशाला आलास?" मी डेअरिंग केली.

"खामोश !" त्याने आवाज टाकला....

मी अजूनच घाबरलो. पण हा काय अमरिशपूरीचा पिक्चर बिक्चर बघतो की काय अशी पुसटशी शंकाही आली.

"मी तुझ्याकडे काही मागायला आलोय..." त्याच्या पुढच्या दोन दातांच्या फटींतून शब्द बाहेर पडले.

"ए बाबा, पैसेबियसे नाहीत हं माझ्याकडे..."

"शट अप !! मला पैसे नको आहेत..."

हा भूत असला तरी सुशिक्षीत वाटत होता. तो चक्क इंग्रजी झाडत होता माझ्या अंगावर...

आता मलासुद्धा इंग्रजी झाडण्याचा मोह झाला आणि मी तशी सुरुवात करणार तोच त्याने माझ्यापुढे लोटांगण घातले आणि 'प्लीज इंग्रजीत नको' अशी मला विनंती करु लागला.

"अरे पण मग तुला हवे तरी काय?" मी मराठीत विचारले.

"दिवसेंदिवस तुम्ही भरमसाट वृक्षतोड करताय...ती थांबवा अगोदर.." त्याने माझ्याकडे हेतू स्पष्ट केला.

मी थोडा बावरलो....मला नक्की काय ते कळेना. तो पुढे म्हणाला, "अरे आंबा, चिंच, वड...ही आमची राहण्याची ठिकाणं ...आमची घरं...आणि तीच तुम्ही नष्ट करत चालला आहात...आमचे संसार उघड्यावर पडत चाललेत तुम्हा माणसांमुळे !!"

च्यामारी....हे तर आखरीतच म्हणायचे ! मी यादृष्टीने कधी विचारच केला नव्हता.

"एकवेळ आमचंही जाऊद्या..." तो पुढे सांगू लागला..
"आम्ही काय घेऊ जुळवून कसंतरी पण जंगलं नष्ट झाल्याने त्या बिच्चाऱ्या पशूपक्ष्यांचे किती हाल चाललेत कधी विचार केलाय??"

त्याने माझ्यासमोर अगदी इमोशनल प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला.

"हे ग्लोबल वार्मिंग होतंय, पाऊस पडत नाहीय, निसर्गचक्र बिघडलंय..." एकेक करता त्याने सगळेच विषय माझ्यापुढे ठेवले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू टपकू लागले...तोही भावनाविवश झाला होता...तो उलट्या पायांनी घराबाहेर जायला निघाला परंतू जाताना त्याने माझ्याकडून अगदी ठास्सून वचन घेतले...

वचन असे होते....."मी आजपासून झाडे तोडणार नाही...आणि खुप झाडे लावण्याचा प्रयत्न करीन."

मी त्याला मनापासून वचन दिले आणि तो घराबाहेर निघून गेला....बहुतेक प्रत्येकाच्या घरी जाऊन जनजागृती करण्याचा त्याने विडाच उचलला होता...

या स्वप्नाने माझी झोपच उडवली होती. लवकर ऊठलो. नर्सरीत जाऊन दहा झाडे आणली. खड्डे आदल्या दिवशीच मारले होते. गावातल्या माणसाला हाताशी घेऊन मी दहा झाडे लावली....

आणि हो...मी एवढ्यावरच थांबणार नाहीय. आता 'झाडे लावा, झाडे जगवा' हि माझी नित्याची जबाबदारी असणार आहे...
___________________________

लेखन:- प्रविण निकम

बुक माय शो अर्थात रविवारचे प्लॅनिंग !!



नमस्कार मंडळी....
आपण सर्वांनी 'द थलाईवा' अर्थात रजनीकांतचा रोबोट सिनेमा पाहीला असेलच. एका प्रसंगात गरज म्हणून रोबोटच्या पायाची चाके बाहेर येतात आणि तो रेल्वे ट्रॅकवरुन धूम स्टाईलने धावू लागतो...

तर सांगण्याचा मुद्दा असा की सोमवार ते शनिवार माझ्याही पायांना जणू चाके लावलेली असतात. आणि मग शनिवार हाफ डे झाला की मग जरा हायसे वाटते.

दर शनिवारी मी न चुकता रविवारचा प्लॅन बनवलेला असतो. पण यावेळेला प्लॅनमधून कुटूंबाला डच्चू दिला होता आणि रविवार आपण मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायचा असं मनोमन ठरवलं....

विचारांची शृखंला संपते न संपते तोच तनिषा आणि प्रतिक दोघेही जणू काही प्लॅन केल्यासारखे जवळ आले आणि उद्या रविवारी बाहेर कुठेतरी फिरायला नेण्याचा आग्रह करु लागले.

मी तत्परतेने मोबाईलमध्ये उघडलेलं 'बुक माय शो' अॅप क्लोज केलं आणि मुलांशी बोलू लागलो...

"अरे पण दर रविवारी आपण जातोच ना मग या वेळेला जरा आराम करा ना घरी..."

"नको, आराम हराम है !" पोरांनी शाळेच्या भिंतीवरचं वाक्य माझ्यापुढे फेकलं.

"पण आपण जाणार तरी कुठे ? तुम्हाला सिनेमा तर आवडत नाही आणि बाहेर हॉटेलात खाणंही आवडत नाही...." मी मुद्दामच नकारार्थी सूर लावू लागलो...

"आज आम्ही म्हणू तसं तुम्ही करुन दाखवायचं !"

मुलांच्या या वाक्यावर मी गोंधळलो. रोज घरी मुलांसाठी घोडा बनतो...आणि आज घोड्यावर बसून फिरायला जाण्याचा मुलांनी हट्ट नाही केला म्हणजे मिळवली !

"अरे पण नक्की काय ते नीट सांगा" मी दबकतच विचारलं.

"पप्पा, आम्हाला आज बाहेरचं जग मनसोक्त बघायचंय.." प्रतिक मोठा झाल्याचा आव आणत म्हणाला.

"हं...!"- तनूने मान डोलावली.

"बाहेरचं जग?" मी साशंक.

"हो...आम्हाला बाहेरच्या जगातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात बघायच्या आहेत."

"कोणत्या?"

"आनंद, दु:ख, दुष्टता आणि प्रेम..."- प्रतिक बहुतेक शाळेत शिकवल्याप्रमाणे मुद्दे मांडत होता.

आता मात्र मलाही चॅलेंजींग वाटलं. माझ्या प्लॅनपेक्षा आज मुलांचा काही वेगळाच प्लॅन आहे हे मी हेरले. मुलांना या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष प्रसंगांतून जाणून घ्यायचा होता हे एव्हाना माझ्या डोक्यात शिरले होते. आणि मी सुद्धा मग मुलांपुढे होकारार्थी मान डोलावली आणि मग मुलांना तयार व्हायला सांगीतले.

माझी अल्टो बाहेर काढली. दोन्ही मुले मागच्या सीटवर बसली आणि मी ड्रायव्हींग करत होतो.
मला कळत नव्हते नक्की गाडीला ब्रेक केव्हा लावायचे. मुलांनी जणू मला एक अनोखे चॅलेंज केले होते.

विचारांत गढून गेलो असताना अचानक ब्रेकवर पाय गेला आणि गाडी थांबली....
समोर रस्त्याच्या कडेला काही उघडी नागडी पोरं दिसली. साधारण सहा-सात वर्षांची असतील. दोघांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या डब्यांना बांधून कल्पकतेने तयार केलेले दोन ढोल होते. आणि बाकीची पोरं त्यावर बेधूंद नाचत होती. त्यांना कसलेच भान नव्हते. चेहऱ्यावरचं त्यांचं हास्य आणि आनंद जणू ओसंडून वाहताना दिसत होता. मी ते दृश्य मुलांना दाखवलं.

"मुलांनो तुम्हाला आनंद पाहायचा होता ना..."

माझी दोन्ही मुलं पाहतंच राहीली. आनंद कुठल्याही भौतिक सुखांत नसून तो आपल्या मनावर अवलंबून असतो हे मी मुलांना पटवून देण्यात यशस्वी झालो.

गाडी आता पुढे निघाली....साधारण एक किलोमीटर अंतर पार केलं आणि मुलांनी आवाज दिला....

"पप्पा थांबा..."

मी समोर पाहीलं. रस्त्याच्या कडेने एक माणूस खुरडत चालला होता. बिच्चाऱ्याचे दोन्ही पाय नव्हते. तो कसा चालतोय याकडे मुलं पाहू लागली...तो माणूस चालण्यासाठी जणू संघर्ष करीत होता...त्याचा चेहरा केविलवाणा दिसत होता. जणू या जगात देवाने आपल्याला त्रास आणि दु:ख भोगण्यासाठीच पाठवले आहे अशी भावना त्याच्या नजरेतून व्यक्त होत होती.

ते विदारक चित्र पाहून मुलं खट्टू झाली. पण जगात दु:ख आहे. त्याचा स्विकार केला की त्याची तीव्रता कमी होते हे मी मुलांना पटवून सांगीतलं....

मुले शांत झाली. पण जगात दु:खही असतं हे शाश्वत सत्य त्यांनी स्विकारलं होतं ही फार मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी.

आम्ही पुढे निघालो. आणि अचानक एका ठिकाणी एक महिला मोठ्याने "चोर, चोर ss पकडा पकडा sss..." अशी ओरडू लागली आणि चार-पाच तरुण त्या चोराच्या मागे पाठलाग करीत होती.

गाडी थांबवून चौकशी केल्यावर कळाले की त्या महिलेचं अंदाजे पाच तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्याने खेचलं होतं आणि ते घेऊन तो पळून गेला होता. जवळजवळ दीडेक लाखांचा तो दागिना क्षणात चोरट्याने लांबविला होता. किती दुष्टपणा केला त्याने...मी मुलांना सांगू लागलो.

'दुष्टता' मुलांना सांगण्यासाठी ही घटना कामी आली होती. हा जणू योगायोगच होता. अन्यथा दुष्टतेचे अन्य एखादा भयानक प्रसंग मुलांच्या कोवळ्या मनाला सहनही झाला नसता. थोडक्यात या विषयाचा निपटारा मुलांपुढे झाला होता. तेवढ्यात त्या चारपाच तरुणांनी चोराला पकडून ते मंगळसूत्रही परत आणले होते हे नशिब !!

आता शेवटा मुद्दा बाकी राहिला होता तो म्हणजे 'प्रेम.' पण हा मुद्दा मुलांसाठीही तसा नविन नव्हता. ज्यांच्या घरात टिव्ही आहे त्या घरांतील मुलांना 'प्रेम' हा शब्द भलत्याच प्रकारे माहीत झालेला असतो. कारण कितीही बंदी केली तरी टिव्हीवरच्या मालिका आणि चित्रपट मुले पाहत असतातच. प्रेमाचे खुप बिभत्स चित्रण हल्ली त्यांत दाखविले जाते.

'प्रेम' हा शब्दच मुळी हल्ली वादग्रस्त झालाय.
आजपर्यंत प्रेमाला किळसवाण्या स्वरुपात मिडीयाने प्रस्तूत केल्यामुळेच 'प्रेम हा शब्द जणू गैरसमजाच्या खाईत लोटला गेला आहे.

मग आता मुलांना प्रेम कसे समजावून सांगायचे या विचारात मी गढलो. हल्ली बागांमध्ये प्रेमी युगूल प्रेमाचे किळसवाणे जाहीर प्रदर्शन करीत असतात. जवळच बाग होती. तिथे मुले खेळलीही असती पण प्रेमाचा चुकीचा अर्थ त्यांना मला सांगायचा नव्हता. मी गाडी वळवली...आणि मुलांसह तडक घर गाठले...

मुले थोडी शंकेच्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. पण गप्प होती.

तेवढ्यात मुलांची मम्मी आली. पोरांना जवळ घेतलं...मग किचनमध्ये जाऊन तिने मुलांच्या आवडीची खीर आणली. आणि मायेनं दोघांनाही भरवली...खाल्ल्यानंतर दोघंही माझ्याजवळ आली. मी नेहमीप्रमाणे घोडा झालो. मुलं पाठीवर बसली...मी त्यांना घरभर फिरवू लागलो. मग मुलांना दोघांनाही पेंग येऊ लागला. माझ्या मांडीवर दोघेही झोपायला आली. मी त्यांना थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगू लागलो...गोष्ट सांगता सांगता मीही झोपी गेलो....



संध्याकाळी ऊठलो. तोपर्यंत मुले फ्रेश झाली होती. प्रतिक माझ्या मोबाईलवर गेम खेळत होता. मला पाहील्यावर जवळ येऊन मला मोबाईल दाखवत हसतच म्हणाला, "पप्पा, बुक माय शो !"

मी सुद्धा हसू लागलो आणि पुढच्या रविवारचा प्लॅन आम्ही आजच तयार केला !

मुलांना एव्हाना प्रेमाचा अर्थ न सांगताच कळू लागला होता....

___________〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰_____________

हिप हिप हुर्रे !!

सौरभ...इयत्ता ८ वी चा विद्यार्थी. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता. हे नमुद करण्याचं कारण म्हणजे तो कबड्डीचा जणू चॅम्पियन होता !

कबड्डीचा खेळ उत्तम सरावाने त्याने खुप चांगला बनवला होता. आपण आभ्यासात हुशार नाही ती कसर आपणाला इतर एखाद्या गोष्टीने भरुन काढावीच लागेल या जाणीवेतून तो कबड्डीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला होता. त्याची महती तालुक्याच्या शालेय क्रिडास्पर्धांत कायमस्वरुपी पसरलेली होती.

यंदा पावसाळी क्रिडास्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. सौरभ त्याचीच आतुरतेने वाट पाहत होता. कारण त्याला तिथे स्वत:ची चुणूक दाखवण्याची संधी मिळत होती.


महीनाभर आधीच रोज संध्याकाळी मुलांचा कबड्डीचा सराव सुरु झाला. सौरभ कर्णधार होता. तो असला की इतर खेळाडू चार्ज केल्यासारखे मैदानावर खेळतात. तो इतरांसाठी खेळातला आधारस्तंभ व प्रेरणादायी सुद्धा होता.

यंदा पावसाचा जोर अजिबात कमी नव्हता. संततधार तर कधी जोरदार पण बारिश सुरुच...

आज संध्याकाळ झाल्यावर सौरभने शिक्षकांकडून सरावाची परवानगी घेतली. झक्कास सराव सुरु होता. सालाबाद प्रमाणे यावेळीसुद्धा आपलाच संघ फायनल मारुन पहीला येणार असा दांडगा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यात दिसून येत होता. पावसाने मैदान निसरडे झाले होते तरीही प्रॅक्टीस सुरु होती. जिंकण्यासाठी वाट्टेल ते या उक्तीप्रमाणे जीव ओतून सराव चालू असतानाच विपरीत घडले. ओल्या निसरड्या जमिनीवरुन प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात चढाई करताना नेमका सौरभचा पाय घसरला आणि तो पोटावर पडला. पोटाखाली त्याचा डावा हात आला होता. सगळेजण सौरभकडे धावले. सौरभ वेदनेने विव्हळत होता. बहुतेक त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं....

शिक्षकांनी सौरभला उचलले. जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेण्यास सांगितले. तिथे नेल्यावर एक्सरे काढले गेले. त्यात हाड तुटल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर तेथून त्याला हाडांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याच्या हाताला प्लास्टर घालण्यात आले. या सर्व धावपळीतही सौरभच्या डोक्यांत फक्त कबड्डीची स्पर्धा होती. तो नाराज दिसत होता. पण त्याचे कारण त्याला स्पर्धेत खेळता येणार नव्हते हेच होते. प्लास्टर केल्यावर दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. घरी किमान पंधरा दिवस घालवल्यानंतर सौरभ प्लास्टर असूनही आज सकाळीच शाळेत आला होता. कारण आज संघ तालुक्याला कबड्डी खेळण्यास जाणार होता.

शाळेत आल्यानंतर सर्व मुले त्याच्याभोवती गोळा झाली. त्याच्या तब्येतीची विचारपूस करु लागली. सौरभच्या डोळ्यांतून पाणी आले. ते पाहताच एक मुलगा पुढे आला.

"नको चिंता करुस, यावेळीही आपणच जिंकणार..."

मग दुसरा एकजण म्हणाला ,"सौरभ...तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आम्ही नक्कीच जीव ओतून खेळू बघच तू..."

सौरभने सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर मनोमन शुभेच्छाही दिल्या. खेळणारा संघ आपल्या शिक्षकांसोबत तालुक्याला रवाना झाला. सौरभ त्या दिवशी शाळेतच थांबला..

संध्याकाळी मुले जिंकून परत शाळेत येतील तेव्हाच घरी जायचं असा सौरभने विचार केला होता. 

दुपार झाली. 'खेळात काय झाले असेल, आपला संघ कसा खेळला असेल, जिंकले असतील की....' या विचारांनी सौरभ थोडा अस्वस्थ वाटत होता. संध्याकाळचे ४ वाजले तरी मुलांचा पत्ता नव्हता. सौरभसोबत शाळेतले इतर शिक्षकही काळजी करत होते. फोन लागत नव्हते. काहीच कळायला मार्ग नसल्याने काळजीने चर्चा करीत होते.

आणि गाडीचा आवाज आला. टमटम रिक्षा शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली. त्यातून एकेक खेळाडू मुलगा उतरत होता. सौरभ शाळेच्या आवारातून एकेकाचे चेहरे न्याहळत होता. सगळेजण शाळेच्या वर्गाकडे येऊ लागले. त्यांच्या हातात ट्रॉफी होती. पण सगळे शांत होते.

मुले सौरभजवळ आली. त्याच्या हातात ट्रॉफी दिली. सौरभने ट्रॉफी पाहीली. ती प्रथम क्रमांकाची होती !

"अरे व्वा !! मस्तच..." काय बोलावे ते सौरभला कळेना.

"अरे पण मग तुम्ही प्रथम क्रमांक मिळवूनही एवढे शांत का?" सौरभने न राहवून विचारले.

"होय, आम्ही प्रथम क्रमांक मिळवलाय. पण तो मिळवताना तुझी कमतरता आम्हाला पदोपदी जाणवत होती. आम्हाला खुप अटीतटीची झुंज द्यावी लागली. अखेर आम्ही १ गुणांची आघाडी घेऊनच फायनल जिंकली.."

"पण तरीही तुम्ही शांत का आहात?"

"सौरभ, तू खेळता आले नाही. तू सध्या वेदना सोसतो आहेस...तुला वाईट वाटेल म्हणून..." एका विद्यार्थ्याने खुलासा करत म्हटले.

"अरे सोडा ते सगळं....आपण जिंकलोय, पहिल्या नंबरने....! जल्लोष झालाच पाहीजे.."

सौरभचे हे शब्द ऐकताच मुलांनी मग एकच जल्लोष केला....

"हिप हिप हुर्रे...हिप हिप हुर्रे...ssS !!"

आता शाळेत एक वेगळंच विजयी आनंदाचं वातावरण पसरल होतंं ...

_________________________________________
लेखन:- श्री. प्रविण निकम

आगळी वेगळी आत्महत्या !

काल कामावरुन घरी येत होतो. सध्या कामाचा व्याप खुप असल्याने जरा ऊशीरच झाला होता. मी बाईकचे एक्सेलीटर वाढविले. आणि भर रस्त्यात मध्येच ब्रेकवर करकचून पाय द्यावा लागला....जोराने काच फुटावी तसा रस्त्यावर माझ्या पुढ्यातच आवाज झाला...

"खळ्ळळळ....!!!"

माझ्या शरीरातून जणू विज संचारुन आरपार गेल्याचा मला भास झाला.

मी मान जमिनीकडे वळवली आणि पाहतो तर काय !

...पुढ्यातच सगळ्या काचा दिसत होत्या. जणू एका बाटलीने चक्क आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याचे त्यातून व्यक्त होत होते.

अचानक काय घडले म्हणून रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. ट्रॅफिक जॅम झाली होती पण मग हळूहळू एकाबाजूने गाड्या बाहेर निघत होत्या. मी बाईकवरुन उतरलो आणि आश्चर्याने निरखून पाहू लागलो. त्या बाटलीच्या शरीराचे तुकडे सर्वत्र विखुरलेले दिसत होते. मला राहावले नाही म्हणून मी त्या तुकड्यांमध्ये शोधाशोध सुरु केली. आणि माझ्या हाती एक मोठा पुरावा सापडला.

बाटलीने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे संपूर्ण आत्मकथन असलेली ती चिठ्ठी मी मनातल्या मनात वाचू लागलो....

सुखापूर गावातली ती गोष्ट. नाव सुखापूर परंतू सुखाचा पूर येईल अशी कल्पना स्वप्नातही त्या गावात केली जात नव्हती. त्याचे कारणही साजेसे होते. गाव तसा आर्थिकदृष्ट्या बेताचा. मोलमजूरीवर गुजराण करणारी जोडपी. दिवसभर परक्या गावातील सावकाराच्या शेतांमधून राबराब राबणारी. श्रीमंती त्यांच्या  गावाकडे फिरकेल अशी आशाही संपूष्टात आलेली. सर्व बायका आणि पोरे नुसती चिंताग्रस्त असायची. त्याचे कारणही योग्य होते. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष दारुच्या आहारी गेलेला. प्रशासनाचे बाटली आडवी करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले. कारण जास्त दराने विक्री करणारे दलाल तयार झालेले....

दिवसभर राबराब राबायचे. जो काही थोडा पैसा मिळायचा तो ही पुरुष मंडळी दारुच्या आहारी घालवायची. कष्ट करुनही त्याचे चीज होत नव्हते. बायका पोरे प्रसंगी उपाशी राहत होती.

मोठमोठ्या व्यक्ती गावात व्याख्याने देऊन गेली. समुपदेशकांनी समुपदेशन केले. पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पण छे ! कुठलाच उपाय रामबाण ठरत नव्हता. आता स्त्रियांनीच बंडाचे निशाण फडकावले. जोडप्यांमध्ये रोज कडाक्याची भांडणे होऊ लागली. त्याचाच उलटा परिणाम म्हणजे पुरुष बायकांना मारहाण करु लागली...आणि मग मात्र कहर झाला. स्त्रियांनी आत्महत्येचा ईशारा दिला....दोघांच्या भांडणात मुलांची वाताहात झाली.

...या सर्व विनाशाला फक्त एकच कारण होते ती म्हणजे बाटली !!

आपल्यामुळेच कित्येकांच्या जीवनाची, संसाराची राखरांगोळी होतेय हे बाटलीला सहन झाले नाही. प्रशासन उभी असलेली बाटली आडवी करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. खरे तर बाटली आडवी नव्हे तर फोडून टाकण्याचीच नितांत गरज होती. आपल्यामुळे स्रिया आत्महत्या करणार या विचाराने स्वत: बाटलीच अस्वस्थ झाली आणि मग बाटलीनेच निर्णय घेतला.....'स्वत:च आत्महत्या करण्याचा !'

चिठ्ठी वाचून झाली होती. खुप वाईट वाटले. दारुच्या आहारी आजकाल पौढांसह तरुण पिढीही जात असल्याने मलाही अस्वस्थ व्हायला झाले. भारतात नव्हे अख्ख्या जगात अशी दारुने घात केलेली कितीतरी कुटुंबे सापडतील. सुखापूरसारखी कितीतरी गावे आजही आपल्या भारतात आहेत.

विचार केला...'लोक अजूनही दारुत सुख शोधतात. दु:ख झालं की ते दारुत विरघळवण्याचा प्रयत्न करतात. कुणी अगदी टाईमपास म्हणूनही पितात तर कुणी यातले कारण नसताना निव्वळ नशेसाठीही पितात.
पितात तेही देहभान विसरुन....आणि पुन्हा कधीही भानावर येत नाहीत.


"चला, यापुढे आपल्यामुळे एखादा जरी दारुच्या जंजाळातून बाहेर पडला तरी खुप होईल असा विचार करुन मी भर रस्त्यातील अस्ताव्यस्त बाटलीच्या काचा गोळा करुन कचराकुंडीत टाकून दिल्या आणि मगच घरचा प्रवास केला...

____________________________________________

लेखन:- श्री. प्रविण निकम

नारी विरोधी कृती समिती !!!




महत्त्वाची सूचना: सदर कथा ही संपूर्णपणे विनोदी व काल्पनिक असून तिचा वास्तवतेशी काडीमात्र संबंध नाही. तसा संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा !!!
______________________________________________

हात थोडेसे थरथर करत होते. शब्द तोंडातून बोबडे निघतील की काय अशी शंका येत होती...

...आणि मी केली सुरुवात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो...

सगळ्यांनी कान टवकारले कारण हॉलमध्ये कुणीच भगिनी नव्हत्या. माईक हाताने जाम पकडला होता. जणू काही माझा हात त्याला कुणीतरी बांधून ठेवला आहे की काय असेच मला झाले होते. कारण कधी एकदा माझे भाषण संपतेय आणि माझा माईकवरचा हात निघतोय इतकी मला घाई झाली होती. घनघोर लढाईत विना तलवार आणि विना ढाल मला लढायला उतरवले होते. साधे कबड्डी स्पर्धेपूर्वीही लोक भरपूर प्रॅक्टीस करतात पण माझे नाव मात्र अचानक पुकारले गेले...अगदी आयत्या वेळी आणि मी ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीचे पाय हलायला सुरुवात झाली होती.

पण करणार काय...ऊठलो आणि जड पावले उचलत माईकपाशी आलो खरा...पण बोलू काय? सवयीनुसार बंधू आणि भगिनींनो बोललो आणि लगेचच कुणीतरी माझ्या तोंडाला जाडजूड कुलूप लावल्यासारखे मला झाले.

बरं विषयही साधासुधा नव्हता. 'बायकांकडून नवऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक' हा भलामोठा अन् डेंजर विषय होता. विषय पाहूनच माझ्या तोंडातनं जीभ गायब झाली होती. शेवटी मी थोडी छाती पुढे काढून मनाशी ठरवलेच. विषय काही का असेना...आपण बोलायचेच ! नाही नीट जमले तरी फेकंफाक करायचीच !

असे ठरवल्यावर मग जरा हायसे वाटले. जीवात जीव आला. माझ्याच भाषेत म्हणायचे तर तोंडात जीभ आली अन् मी बोलू लागलो. भाषण ऐकायला सर्व पुरुषच होते. विषय गहन असल्यामुळे आणि पुरुषांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने तिथे बायकांना एन्ट्री नव्हती.

मग काय माझी बुलेट ट्रेन फास्ट सुटली. बायका आपल्या नवऱ्याला कशा अपमानास्पद वागवतात यावर दिले व्याख्यान ठोकून. नवरे बाहेर ऑफीसमध्ये काम करुनही बायका त्यांना घरातील कामांत जुंपतात यावरही ताशेरे ओढले. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असाही सूचक ईशारा दिला. असेच माझ्या तोंडातून एकेक जादुई मुद्दे बाहेर निघत होते. त्या हॉलमध्ये जर बायका असत्या तर एव्हाना माझी 'कोशिंबीर' बनली असती असा चटकन विचार आला अन् मी रुमालाने माझ्या तोंडावरील घाम पुसला...

शेवटी नारीविरोधी एकदोन घोषणा देऊन मी माझ्या सैराट सुटलेल्या जीभेला लगाम घातला म्हणून बरें नाहीतर अजून काही वादग्रस्त मुद्दे बाहेर निघाले असते.

"एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो, धन्यवाद.." असे शेवटाचे वाक्य बोलून मी मग माझ्या बुलेट ट्रेनला ब्रेक लावला.

स्टेजवरुन खाली उतरलो. सर्वांनी माझ्या भाषणाची तारीफ केली. माझे भाषण उपस्थित सर्वांच्या मनाला भिडल्यागत वाटत होते. आमच्या कंपनीतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील जवळजवळ पाचशे पुरुष अधिकारी व कर्मचारी त्या हॉलमध्ये उपस्थित होते.

भाषणाचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रमुख लोकांची बैठक बसली. कंपनीतील पुरुषांचा हा विकेंडचा सामाजिक उपक्रमच होता जणू. माझ्या भाषणाचा ईफेक्ट अजूनही कायम होता. कारण मोठमोठे कंपनीतील अधिकारीही आपल्या बायकांच्या कटकटीने आणि त्रासाने वैतागले होती. शेवटी 'नारी विरोधी कृती समिती' स्थापन करण्याचे उपस्थितांत ठरले आणि मग मघासारखा मलाच पुन्हा एकदा बळीचा बकरा करण्यात आले. मी नको नको म्हणत असतानाच माझा बळी दिला गेला. समितीचा मला 'अध्यक्ष' बनवले गेले. शेवटी चहानाष्ट्याने मिटिंगची सांगता झाली.

संध्याकाळी घरी पोहोचलो. मी आज दिवसभरात काय तीर मारले होते त्याचा माझ्या  बायकोला थांगपत्ताही नव्हता.

"आज रविवार असूनही कुठे गेला होतात तुम्ही?" बायकोने विषयाला हात घातला.

"थोडं ऑफीसचं काम बाकी होतं"

"आज रविवारीसुद्धा ?"

"हो ना...द्यावा लागतो कधीकधी एक्स्ट्रा टाईम" इथेही मी फेकू लागलो.

"मला वाटले आज तुम्ही मला कुठेतरी फिरायला न्याल.." बायको सवयीनुसार बोलली.

"अगं हो ना...नेणारच होतो...पण काय करणार अचानक जावे लागले गं.."

बायकोला माझे म्हणणे नेहमीच पटते. 

"बरं सांग आज मी तुझ्यासाठी काय करु?" मी समजूत काढत म्हणालो.

"काय कराल...?" बायको लाजतच म्हणाली.

"तू जे सांगशील ते करेन." मी म्हणालो.

"इश्श !" बायकोला लाजायला जणू कारणच मिळाले. ती लाजतच पुढे म्हणाली...
"तुमचे माझ्यावर खरंच प्रेम आहे ना हो?"

"हो तर्र !"

"मग मी सांगेन ते कराल?"

"नक्कीच करेन डार्लिंग."

"प्रॉमीस?"

"हो हो प्रॉमिस.."

"मग ऐका, आठवड्याचे सहा दिवस तुमची कामाची धावपळ असते. फक्त रविवारच मिळतो मोकळा आपल्याला..."

"बरं मग?" मी शंकेने विचारले.

"मी सुद्धा खुप कंटाळून जाते हो रोज रोज ही घरची कामे करुन..."

माझी विचारचक्रे फिरायला सुरुवात झालीच होती.

"नक्की काय म्हणायचेय तुला?" मी गोंधळल्यागत विचारले.

"अहो, तुम्हाला रविवारची सुट्टी तरी असते. पण माझ्या नशिबात कधीच सुट्टी नसते बघा."

"मग त्याला मी काय करणार?"

"तुम्ही आताच तर प्रॉमिस केलंत ना की मी जे सांगेन ते कराल म्हणून?"

"पण करायचेय काय?" प्रॉमिस सहजासहजी देऊन फसलो की काय असा मला भास झाला.

"रविवारची सुट्टी आपण दोघांनीही वाटून घ्यायची. रविवार असला की सकळी सगळी कामे मी करेन आणि संध्याकाळी सगळी कामे तुम्ही करायची, म्हणजे दोघांनाही सेमटूसेम आराम मिळेल !!" बायकोने प्रॉमिसचा पुरेपुर फायदा करुन घेतला होता.

मी ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीचे पाय सकाळसारखे पुन्हा हलू लागले. 'नारीविरोधी कृती समिती'चा अध्यक्ष होतो मी...पण बायकोवरच्या प्रेमामुळे माझ्या मनालाही पाझर फुटला होता. 'आपणही आपल्या बायकोला समजून घेतले पाहीजे' असा एक सुप्त विचार मनाला स्पर्श करुन गेला होता. 

खुर्चीचे पाय हलायचे थांबले. मी खुर्चीवरुन ऊठलो. बायकोकडे प्रेमाने पाहू लागलो. बायको लगेचच माझ्यापाशी आली अन् माझ्या हाती तिने झाडू दिला. मी सुद्धा ऑफीसवाले कपडे काढले अन् चड्डी बनियनवर घराची साफसफाई करु लागलो. प्रथम सर्व रुम झाडून काढल्या. मग किचनमध्ये गेलो. भांड्यांचा डिगारा घासला. काही कपडे धुवायचे होते. नळाखाली ते धुतले. माझी अवस्था जणू त्या पिळलेल्या कपड्यांसारखी झाली होती.

कामे झाली आता स्वयंपाकाचे मलाच पाहायचे होते. किचनमध्ये गेलो. फ्रिज उघडून बायकोने सकाळीच बाजारातून आणलेली मेथीची जुडी काढली. मिरच्या घेतल्या आणि हॉलमध्ये भाजी चिरत बसलो. 

बायको सोफ्यावर बसून 'कलर्स' वरील मालिका पाहत होती. त्या मालिकांतच असे काही बाही दाखवत असावेत अशी मला शंका आली म्हणून 'आज पासून कलर्स चॅनेल नको 'झी टिव्ही' लावत जाऊ असे बायकोला सांगणार इतक्यातच दारावरची बेल वाजली.

"टिंग टाँग.."

माझा अवतार सर्कशीतल्या विदुषकासारखा झाला होता म्हणून मी बायकोला दरवाजा उघडायला सांगीतला. तेवढ्यात टिव्हीला अॅड असल्याने बायकोने दरवाजा उघडला.

आणि समोरचे दृश्य पाहून मी हडबडलोच !
दरवाज्यात माझ्या कंपनीतले सकाळच्या भाषणाला उपस्थित असलेले जवळजवळ सातआठ पुरुष अधिकारी होते. त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ होता. ते मी 'नारी विरोधी कृती समिती'चा अध्यक्ष झाल्याने माझे अभिनंदन करण्यासाठी आले होते. आणि समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी आले होते.

मला भाजी चिरताना आणि कांदे कापताना पाहून समोरच्या सगळ्यांनीच तोंडात बोटे घातली !!!

मी त्यांचे स्वागत केले. सर्वांना बसायला सांगीतले. किचनमध्ये गेलो. सर्वांसाठी थंडगार पाणी मीच आणले. ते कुणीच काही बोलत नव्हते. बहुतेक माझी दशा पाहून त्यांची तोंडे अजिबात बंदच झाली होती. मग मात्र न राहवून माझ्या बायकोने तोंड उघडले. आता ही काहीबाही बोलेल म्हणून मी पाहुण्यांना चहा करण्याचे कारण सांगून किचनमध्ये पळालो.
आणि किचनच्या दरवाज्याच्या फटीतून बायको काय शाब्दीक बाण सोडतेय ते निरखून पाहू लागलो.

"आमचे साहेब खुप चांगल्या स्वभावाचे आहेत" 

बायकोने पहिला मुद्दा मांडला. आणि उपस्थित सगळे नुसते नंदीबैलासारखे माना डोलावू लागले.

"त्यांना माझी खुप काळजी असते. आज त्यांनी घरातली सगळी कामे केली. घर झाडले, भांडी घासली, कपडे धुतले...आणि आता जेवणाला लागले होते तेवढ्यातच तुम्ही आलात"

सगळ्यांनी पुन्हा माना डोलावल्या. मी मात्र खजिल झाल्याने तोंडाला बायकांसारखा रुमाल बांधूनच चहा नेऊन द्यावा असा क्षणभर विचार आला....

"आमची सोसायटीतल्या सर्व बायकांची सकाळीच मिटिंग झाली. त्यात 'द बेस्ट कपल' म्हणून आम्हा दोघांची निवड झालीय. आणि 'द बेस्ट हजबंड' म्हणून आमत्या ह्यांची निवड झालीय. खरंच खुपच चांगले आहेत आमचे हे..."

बायकोने आणि आख्ख्या सोसायटीने माझी वाहवा केल्याने माझी छाती गर्वाने फुलली. मी तोंडाला बांधलेला रुमाल काढला आणि चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये गेलो. सर्वात पहिला चहा माझ्या बायकोला दिला. आणि मग उपस्थित सर्वांना दिला.

उपस्थित सर्वजण माझ्याकडे 'आ' वासून पाहत होते. त्यांनी मघाशी तोंडात घातलेली बोटे तश्शीच होती. 

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्याच दिवशी 'नारी विरोधी कृती समिती' चा गाशा गुंडाळण्यात आला. सर्वांना आपापल्या बायका आपल्याशी अशा का वागतात याचे कोडे उलगडले होते. प्रत्येकजण बायकोला वेळ देऊ लागला. बायकोची कामे शेअर करु लागला. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतली जाऊ लागली....

त्यातूनच पुढे 'नारी सन्मान कृती समिती' ची स्थापना झाली आणि साहजिकच पुन्हा एकदा बळीचा बकरा मलाच करण्यात आले.

....आणि मी बनलो होतो पुन्हा एकदा 'अध्यक्ष'..!

_____________________________________________

रविवार, ५ जून, २०१६

सायलीचा निर्णय

सायली म्हणजे आई बाबांचा जीव की प्राण होती. लहानपणापासूनच त्यांनी तिचे अगदी लाडात पालनपोषण केले होते. प्रत्येक आईबाबांना आपली मुले लाडकी असतातच अगदी तस्संच टिपीकल नातं त्यांच्यात होतं.

अगदी शाळेत असल्यापासूनच सायली हुशार होती. वर्गात नेहमी पहिल्या तीनाच्या आतच नंबर काढायची. तिच्या मैत्रिणींना तिचा खुप हेवा वाटायचा. आईबाबांनाही लेकीचा अभिमान तर शिक्षकांना खुप कौतुक वाटायचे.

हळूहळू सायली मोठी होऊ लागली. आता ती बारावीत गेली होती. तिचे वागणेही हल्ली जबाबदारीचे वाटत होते. बारावीच्या वर्गात गेल्यावर जणू काही मुले शहाण्यासारखी वागू लागतात असं लॉजीक की एक सुप्त टेन्शन मुलांच्या मनात असतं ही सत्यता...पण मुलं थोडी दडपणाखाली वावरतातच.

तसा सायलीचा आभ्यास मस्तच चालला होता. बारावी विज्ञान शाखेतून तिने प्रवेश घेतला होता. आज सकाळी सकाळीच सायली थोडी नाराज दिसत होती. काम करता करता तिच्या आईचे लक्ष तिच्याकडे गेले.

"बाळ, काय झालं? आज नाराज का दिसत आहेस बेटा?"

"काही नाही आई..."

"कसलं टेन्शन वैगेरे आहे का गं? मला सांगायला हरकत नाही."

"आई, मी तुमचे स्वप्न पूर्ण नाही करु शकले तर??"

या प्रश्नावर आई दचकून गेली. आईचा चेहरा पडला. उसने हसू आणून ती म्हणाली, "बाळ अगं असं काय म्हणत आहेस आज?"

"असंच." सायलीचा चेहरा केविलवाणा दिसत होता.

सायली एक वाक्य बोलून गेली आणि आईच्या मनात जणू वादळ घोंगावू लागले. सायलीच्या बारावीच्या परिक्षेऐवजी तिच्या मनाच्या घालमेलीने आई अस्वस्थ झाली होती.

संध्याकाळी कामातून सायलीचे बाबा घरी आले. सायलीच्या आईकडून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. हातपाय धुऊन मग ते सायलीच्या आभ्यासाच्या खोलीत गेले.
सायली आभ्यासात मग्न होती. बाबांनी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.

"बेटा, घाबरायचे नाही...मी आहे ना." बाबांच्या डोळ्यांत पाणी आले.

बाबांनी दिलेला धीर पाहून सायली त्यांना बिलगली. एकूलती एक मुलगी अशी परीक्षेच्या टेन्शनमध्ये असणे बाबांना रुचले नाही. म्हणूनच ते सायलीला धीर देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू लागले.

आईबाबा खंबीरपणे पाठीशी असल्याने सायलीचे टेन्शन थोडे कमी झाले.

"आपल्यापरीने भरपूर प्रयत्न करायचा. अपयश आले तरी खचून जायचे नाही. पुन्हा प्रयत्न करायचा...यश मिळेपर्यंत हा सिलसिला सुरु ठेवायचा." हा अगदी मौल्यवान कानमंत्र बाबांनी सायलीला देऊन ठेवला होता.

पुढे दिवस निघून गेले. आणि परिक्षेचे दिवस सुरु झाले. सायलीचा आभ्यास जोर धरु लागला. पेपर सोपे जात होते. आज शेवटचा पेपर होता.

सायली निघून तयार झाली. आईबाबांच्या पाया पडली. देवालाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडली. पण आज सायलीचे शरीर तिला साथ देत नव्हते. शाळेत जाता जाता तिचे अंग तापाने फणफणले. पण इलाज नव्हता. पेपर वेळेत सुरु होणार असल्याने तिला डॉक्टरकडे जायला मिळाले नाही. तशाच अवस्थेत ती पेपर लिहीत होती. तिचे हात थरथर करत होते. अक्षरे नीटशी वळत नव्हती. लिखाणाचा स्पीड कमी झाला..त्यातच भर म्हणून वाचलेलेही विस्मरणात गेले की काय असे तिला वाटू लागले. या सर्वाचा एकत्रित परिणाम व्हायचा तोच झाला. सायलीला शेवटचा पेपर कठीण गेला.

पेपर सुटला. सायलीच्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेले. तेथून मग ती तिच्या घरी गेली. रात्रीपर्यंत ताप कमी झाला होता. पण आजच्या दिवसातील घडामोडी तिने घरी मात्र सांगीतल्या नाहीत.

परीक्षा संपल्याने आई बाबांचे टेन्शन साफ उतरले होते परंतू त्या दिवसापासून सायली मात्र अस्वस्थ वाटत होती.

'काय करावं? आई बाबांना कसं सांगावं? त्यांना वाईट तर वाटणार नाही?' हे विचारचक्र तिच्या मनात सुरु होते. त्यापुढचा जवळजवळ दीडेक महीना असाच गेला.

आज बारावीच्या निकालाचा दिवस होता. आईबाबा आणि इतर नातेवाईकांची सुद्घा सायलीच्या निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र निकाल काय असेल याची पूरेपूर जाणीव सायलीला होती. तिचा चेहराच जणू ते व्यक्त करीत होता.

सकाळी नेहमीप्रमाणे ऊठून ती तयार झाली. देवाला नमस्कार केला. आई बाबांच्या पाया पडली आणि रिझल्ट आणायला घराबाहेर पडली.

दुपार झाली. तिचे आईबाबा घरी तिची आतुरतेने वाट बघत होते. बघता बघता संध्याकाळही व्हायला आली. तरीही सायलीचा पत्ता नव्हता. आई बाबांची चिंता वाढू लागली. कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडे चौकशी करुन झाली. त्यांच्याकडून सायली नापास झाल्याचे कळताच ते दोघेही पुरते हादरुन गेले.

आता पोलिस स्टेशन गाठण्याशिवाय दुसरा मार्गच त्यांना सूचेना..'मुलीने जीवाचं काही बरंवाईट.....' असे चित्रविचित्र विचार मनात वादळासारखे घोंगावू लागले.

सायलीच्या आईबाबांना या विचारांनी जणू घामच फुटला होता. सायली म्हणजे त्या दोघांच्याही काळजाचा तुकडा होता. झपाझप पावले टाकत, धावत ते दोघेही पोलिस स्टेशनच्या दिशेन निघाले. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूधारा ओघळत होत्या.

कसेबसे ते पोलिस स्टेशनला पोहोचले. तिथे रडतच सर्व हकीकत उपस्थित पोलिसांना सांगितली.

'नुकताच कुठल्यातरी एका मुलीने नदीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केलाय. तिला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात अॅम्ब्यूलन्समधून आणले आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.' अशी वार्ता तेव्हा तिथल्या पोलिसांकडून त्यांना मिळाली आणि सायलीच्या आईने हंबरडाच फोडला. घाबरुन दोघांचीही मोठ्याने रडारड सुरु झाली. मग पोलिसांच्याच गाडीतून त्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आले.

पोलिसांच्या गाडीतून उतरल्या बरोबर पंचनामा करणारे दोन पोलिस जवळ येऊन म्हणाले, "सायली जाधव तुमचीच मुलगी का? तुम्ही तिचेच आईवडील का??"

या पोलिसांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे भान विसरुन दोघेही धाय मोकलून रडू लागले. त्यांचे जणू अवसानच गळाले. त्यांच्या दृष्टीने आता सारे काही संपले होते.

"अहो सायलीचे आई बाबा तुम्ही रडताय कशाला??"

रडता रडताच पोलिसाचे आश्चर्यकारक बोलणे त्यांच्या कानी पडले.

"अहो खरंच ! तुम्हाला तर आनंद वाटायला पाहजे. तुमच्या सायलीची कर्तबगारी महान आहे. तुम्हाला तिचा अभिमान वाटायला हवा." पोलिस हसऱ्या चेहऱ्यानेच म्हणाला.

सायलीचे आईबाबा चक्रावून गेले. नक्की काय झालंय कळेना. अश्रू पुसता पुसताच बाबांनी विचारलं, "म्हणजे? तुम्ही नक्की काय म्हणताय?"

"अहो तुमच्या सायलीने आज नदीत उडी मारलेल्या एका मुलीचा जीव वाचवलाय. नुसताच अभिमान नव्हे तर 'वीरता' पुरस्कार मिळायला हवाय तिला अशी कामगिरी केलेय तिने !"

हे वाक्य ऐकल्याबरोबर सायलीच्या आईबाबांचा चेहरा खुलला. त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना हायसे वाटले. तोच त्यांना रुग्णालयातून सायली बाहेर पडताना दिसली. तिचा चेहरा आनंदीत होता. आईने तिला जवळ घेतले.

"सायली बेटा...आम्ही खुप घाबरलो होतो. तुला घरी यायला ऊशीर झाल्याचं खरं कारण आता लक्षात येतंय आमच्या."

"हो बाबा...ती मुलगी नापास झाली होती. पण तिने चुकीचा मार्ग पत्करला होता. बाबा जीव दिल्याने प्रश्न सुटत नाहीच, उलट वाढतो. आयुष्यभर आपल्या जीवलगांना ते कडवं सत्य पचवताच येत नाही. आणि हो...जीव देणं म्हणजे शूरपणा नाहीच. असं मरण्यापेक्षा परिस्थितीशी प्रयत्नांनी लढून, सामना करुन जिंकलेलं कधीही चांगलं..."

"आपली पोर आता खरंच मोठी आणि हुश्शार झालीय हं." सायलीची आई हसतच म्हणाली.

"मग, मुलगी कुणाची आहे..." बाबाही हसतच म्हणाले.

"बाबा, मी सुद्धा नापास झालीय. पण मी हार मानणार नाही. पुन्हा जोमाने प्रयत्न करेन."

सायली भलेही नापास झाली होती...पण तरीही बाबांनी मोठ्या अभिमानाने लेकीचे कौतूक करीत सर्वच नातेवाईकांना पेढे वाटले.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 लेखन-श्री. प्रविण निकम



बुधवार, १ जून, २०१६

मैत्री

साधारण १९९० चा काळ. त्या संध्याकाळी ती थोडी निराश वाटत होती. तिचा मूड अजिबात चांगला नव्हता हे तिच्या अबोल ओठांनी आणि बोलक्या डोळ्यांनीच कळत होते. एक वेगळाच असा अस्वस्थपणा तिच्या डोळ्यांत जाणवत होता. पण त्याचे कारण मात्र उमगत नव्हते. आणि विचारण्यासाठी सुद्धा ती वेळ योग्य नव्हतीच. कारण विचारले असते तरी उत्तर मिळाले नसतेच. जणू काही त्या बागेतील फुललेली फुले सुद्धा कोमेजून गेलीत की काय असे वाटत होते.

महेश सकाळी अगदी लवकर उठला.
लालीच्या विचारांत त्याची आख्खी रात्र निघून गेली होती. नेहमी व्यक्त होणारी लाली अचानक गप्प आणि भावनाविवश अवस्थेत पाहून तो सुद्धा थोडा हबकलाच होता.
त्याने सायकलला पायंडल मारले आणि तडक लालीच्या घरी पोहोचला.

"मावशी लाली कुठंय?" महेशने विचारले.

"अरे ती तर मघाशीच निघून गेली घरातून."

"पण कुठे?"

"अरे ऑफीसला जाते एवढंच म्हणाली."

महेश आणि लाली चांगले फ्रेंड्स होते. अगदी त्या युगातली छान मैत्री जणू. पण महेशला ती मैत्रीच्याही पलिकडे कुणीतरी भासत होती. पण त्याने तसे तिला अजिबात जाणवू दिले नव्हते. खरं तर लाली हे तिचं घरचं लाडाचं नाव होतं परंतु खरं नाव लीला होतं. दिसायला रेखीव, सुंदर अशी लाली सर्वांना आवडेल अशीच होती.

महेशच्या मनात वेगळीच शंका येत होती. लाली आपल्याला टाळतेय की काय असा विचार पटकन त्याच्या मनात येऊन गेला परंतू त्याने लागलीच स्वत:ची समजूत घातली.

महेश लालीच्या घरुन तडक निघाला तो ऑफीसच्या दिशेने. ऑफीसला पोहचल्यावरही त्याला लाली तिथे आलीच नाही असे समजले. काय भानगड आहे काही कळायलाच मार्ग नव्हता. आता फक्त एकच ठिकाण महेशला माहीत होते जिथे लाली जाऊ शकत होती. त्याने पुन्हा सायकलवर टांग टाकली आणि तो निघाला.

गावाच्या बाहेर एक छोटे मंदिर होते. मंदिराच्या दारात सायकलला ब्रेक लागले. महेशने समोर पाहीले. लाली मंदिराच्या पायरीवर एकटीच बसली होती. महेश जवळ गेला. त्याने लालीच्या डोक्यावर आधाराचा हात ठेवला. तशी लाली ढसाढसा हुंदके देऊ लागली. महेशला काहीच कळायला मार्ग नव्हता.

"मला नाही सांगणार?" महेश म्हणाला.

"तुला नाही तर कुणाला सांगणार !" लालीचे डोळे अश्रूंनी भरुन गेले होते.

आणि लाली सांगू लागली....

तिच्या आत्याचा मुलगा जो उच्चशिक्षित होता तो लालीला खुप आवडायचा. जणू मनातच बसला होता. लालीचेही नशीब चांगले होते. म्हणून तर तिच्या आत्याने लालीच्या आईला 'आम्हाला मुलगी द्याल का' म्हणून विचारले.
त्या मुलाचे नाव विराज होते. विराजच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यानेही होकार दर्शविला होता. परंतू लग्न होईपर्यंत कुठेही गाजावाजा करायचा नाही असे दोन्हा कुटुंबांनी ठरविले होते. कारण लग्न एक वर्षानंतर करायचे अशी नवऱ्याकडील माणसांची अट होती.

आता एक वर्ष पूर्ण व्हायला आले होते परंतू विराजचे कुटुंब लग्नाचा विषय पुढे नेतच नव्हते. आणि लालीच्या घरच्यांनी चौकशी केल्यानंतर जी गोष्ट हाती लागली ती ऐकून लाली हादरलीच. विराजचे त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. आणि त्या मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नाची सक्ती करत होते अन्यथा मुलीची फसवणूक केल्यासंबंधी पोलिसांत जाऊ अशी धमकी देत होते.

लालीचे स्वप्न जणू धुळीस मिळाले होते. पहिल्यांदा आयुष्याचा जोडीदार निवडला पण साऱ्याच गोष्टी चुकल्या. ज्या मनाने संसाराची मोठी स्वप्ने पाहिली तेच मन कोलमडून पडले होते...


लालीचे हुंदके संपतच नव्हते. महेशही हे सारं ऐकून हबकूनच गेला होता. कारण तो सुद्धा लालीचीच स्वप्ने पाहत होता. पण इथे तर चित्र वेगळेच होते. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहेच जणू असे मनाशीच म्हणून महेशने थोडा स्वत:चा मूड सावरला. पण लाली मात्र निराश दिसत होती.

"माझं ऐकशील ?"

"हं..." लाली रडतच म्हणाली.

"जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर."

"पण कसं?"

"मन रमवण्याचा प्रयत्न कर इतर गोष्टींत."

"हं..."

"ती समोर चहाची टपरी दिसतेय ना..चल तिथे आपण थोडा चहा घेऊया." महेशने सुचवलं.

दोघे त्या टपरीच्या दिशेने चालू लागले. गरमागरम चहा घेतला. लालीचा मूड थोडा सुधारल्यासारखा वाटत होता.

"लाली..." महेश हळू आवाजात म्हणाला.

"काय?"

"माझ्याशी लग्न करशील?" आपले स्वप्नही भंग होऊ नये म्हणून उतावीळपणे महेशने प्रश्न विचारला.

"सॉरी हा विषय पुन्हा काढू नकोस महेश."
महेश आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय असा विचार लालीच्या मनात येऊन गेला.

"कृपया तू जा इथून, मला एकटीला राहू दे." लाली थोडी रागानेच बोलली.

"पण तू सायकलवर बस, मी तुला घरी सोडतो."

"अजिबात नको." मी जाईन एकटी.

महेशचा नाईलाज झाला. तो एकटाच सायकलने निघाला. दुसऱ्या दिवशी ऑफीसमध्येही दोघे एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत. रोज ऑफीसमध्ये एकत्र डबा खाणारे जीवलग दोन फ्रेंड्स आता डबाही आणत नव्हते. लालीचं स्वप्न कोलमडलं होतं तसंच महेशचंही स्वप्न भग्न झालं होतं. दोघांच्याही चेहऱ्यावर नाराजीचा सूर होता.
परंतू ऑफिसला येणे गरजेचे होते.

असे चार दिवस निघून गेले. पाचव्या दिवशी लालीचा मूड बऱ्यापैकी सावरला होता. तिने जण एकंदर परिस्थितीचा स्विकार केला होता.
पण आज तिची नजर ज्याला शोधत होती तो महेश मात्र ऑफिसला आला नव्हता. बोलत नसले तरी त्याच्याबद्दल मनातून लालीलाही आपुलकी काळजी होतीच. महेश का आला नसेल या विचाराने ती थोडी अस्वस्थ दिसत होती. तरीही तिने इतर कारकुनांना विचारले पण कुणालाच काही पत्ता नव्हता. आता मात्र काळजीने ती हैराण झाली. जेवणाच्या सुटीत तडक ऑफिसबाहेर पडली. आणि झपाझप पावले टाकत निघाली.

थोड्या वेळातच ती मंदिराजवळ पोहोचली. महेश सुन्नावस्थेत पायरीवर बसला होता. नजर शून्यात होती. अचानक त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरला. त्याने वळून पाहीले आणि तो स्तब्ध झाला.

"रागावलास माझ्यावर?"

"नाही गं, कशाला रागवेन."

"मग बोलत का नव्हतास?"

"तूच म्हणाली होतीस बोलू नकोस म्हणून."

थोडा वेळ दोघेही स्तब्ध झाले. दोघांचेही डोळे भरुन आले होते.

"मी सुद्धा माणूसच आहे ना रे !" हुंदके देत लाली म्हणाली.

"माहीत नाही का मला.." महेशचेही अश्रू टपकू लागले.

"पण आता मी सावरलीय चांगल्याप्रकारे."

"मलाही थोडा वेळ लागेल पण मी सुद्धा सावरेन गं..." महेशनेही तिला शब्द दिला.

मध्ये काही दिवस निघून गेले. महेशही बऱ्यापैकी सावरला. खरी परिस्थिती एकदा का मनाने स्विकारली की मग त्रास कमी होतो हे सत्य दोघांनीही आजमावले. त्यामुळेच तेथून पुढे त्यांची मैत्री कुठल्याही अपेक्षेविना बहरली. स्त्री आणि पुरुषामध्ये स्वार्थापलिकडचं आणि आणि अपेक्षांपलिकडचंही एक निखळ मैत्रीचं नातं असू शकतं हे त्यांनी जणू सिद्धच केलं होतं.

____________________________________

लेखन- श्री. प्रविण निकम©

गणपतराव आणि जादूचा दिवा

गणपतरावांचे घर म्हणजे जणू काही पूर्वीच्या काळातील (राज)वाडाच..!! घराची सर्व रचना पुरातन काळाला शोभेल अशी...

त्या दिवशी रविवार होता. गणपतरावांनी ठरवलं की आज जरा घराची साफसफाई करुन घ्यावी. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते मग कंटाळा करत नाहीत. मग ते जणू काही अभियानच राबवतायत की काय असा घरच्यांचा समज होतो. ते माळ्यावर चढले. हातात झाडू, खराटा घेतला. खुप दिवस माळ्याकडे दूर्लक्ष झाले होते. सर्व डेडस्टॉक मालमटरेल( मटेरियल) तिथे कोंबून कोंबून ठेवला होता. तो सर्व पसारा पाहून मग त्यांना भलतेच स्फुरण चढले. जणू काही तलवारच हाती घेतल्याप्रमाणे त्यांनी झाडू हाती घेतला. आणि लढाईत तलवार चालवतात तशी माळ्यावर तलवार चालवू लागले. आणि जाळी जळमटांमध्ये अडकून पडलेल्या आठ पायांच्या कोळ्यांना शत्रू समजून त्यांच्यावर तुटून पडले...

.........मध्येच चुकून "हर हर महादेव" ओरडले आणि गणपतरावांची बायको धावत आली. तेव्हा कुठे ते भानावर आले. आपण लढाई नव्हे तर साफसफाई करतोय हे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ७/८ कोळी, ५ झुरळे धारातीर्थी पडली होती.

साफसफाई करता करता गणपतरावांचे एका वस्तूकडे लक्ष गेले आणि ते थोडे चकीतच झाले. कोपऱ्यात चक्क एक दिवा होता. थोडा चमकत होता. ते त्वरेने दिव्याकडे झुकले. दिवा हातात घेतला. आणि गणपतरावांना गोष्टीतल्या त्या 'अल्लादिन आणि जादूच्या दिव्या'ची आठवण झाली. लहानपणी गोष्टींतून त्याबाबत अगदी भरभरुन वाचले होते. 'हा दिवा सुद्धा त्याच पठडीतला तर नाही ना...' असे त्यांना वाटून गेले.

गणपतरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी वरचेवर दिवा हाताने घासून बघीतला. तर त्यातून राक्षस बाहेर आलाच नाही. उलट त्यांचेच हात काळे झाले. ते वैतागले. परंतु त्यात नक्कीच काहीतरी जादू असावी असा त्यांचा ठाम समज होता. पण दिवा घासला तरी राक्षस कसा बाहेर येत नाही...या विचाराने ते हैराण झाले.

हॅत्तेच्या...! त्यांचे चुकले होते. त्या दिव्यात तर सेल होते. त्यांनी लगोलग त्यांच्याकडील विजेरीतील nippo चे दोन सेल काढले आणि दिव्यात टाकले....आणि अहो आश्चर्यम्....!!!!

दिव्यातून चक्क राक्षस बाहेर पडला...हा राक्षस आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना असा विचार करतात न करतात तोच त्या राक्षसाने गणपतरावांच्या पायांवर लोळण घेतली. तो त्यांचे आभार मानू लागला.

"अरे पण झालेय काय, पाया का पडतोस?"

"काय करणार साहेब, मला जायचे होते अल्लादिनच्या दिव्यात पण मागील १२ वर्षांपासून भूलचुकीने या तुमच्या दिव्यात आलो नी अडकून पडलो. थँक्स तुम्ही मला शोधून काढल्याबद्दल.."-राक्षस गयावया करत म्हणाला.

हा राक्षस इंग्लिश कुठे शिकला हे विचारण्याचा गणपतरावांना अतोनात मोह झाला होता...पण जाऊदे म्हणून त्यांनी टाळलं...

"साहेब, मला मुक्त करा...."-राक्षस

"अरे पण कसं?"-गणपतरावांची शंका

"साहेब, दर बारा वर्षांनी मला दिव्यातून कायमस्वरुपी मुक्त होण्याची संधी असते. बारा वर्षांनंतर कुठलीही ३ कामे करुन देण्यात मी यशस्वी झालो तर कायमस्वरुपी माझी मुक्तता होईल. पण ती कामे मी सूचवू शकत नाही हेच माझे दुर्दैव...! तुम्ही माझ्याकडून कुठलीही ३ कामे करुन घेऊ शकताय..."

"पण अल्लादिनच्या गोष्टीत तर तू खुप काही करायचास...आणि माझी फक्त तीनच कामे?"- गणपतरावांनी नाराजी व्यक्त केली.

"हो साहेब, आता माझीही शक्ती संपत आलेय. माझ्या खात्यात फक्त शेवटची ३ कामे उरलीत. ती करुन दिली की मी मुक्त होईन त्यातले एखादे काम जरी मी करु शकलो नाही तर पुन्हा मी त्या दिव्यात अडकून पडेन, मग मात्र माझी सुटका पुढच्या बारा वर्षांनंतरच...!!!"

गणपतरावांनाही मग त्या राक्षसाची दया आली. चला तीन तर तीन..काही हरकत नाही...

"सांगा काय करु साहेब?"-राक्षसाला मुक्त होण्याची घाई झाली होती.

"पण सांगताना अगोदर एक दोन साडेमाडे तीन असं म्हणून मगच पुढे काम सांगायचं...!!!"-राक्षसाने नियम सांगीतला.

'च्यामारी....भलत्याच अटी आहेत याच्या ' असं मनातल्या मनात म्हणून काय मागावं हा गणपतराव विचार करु लागले.

"एक दोन साडे माडे तीन...जा मला पंचपक्वानाचं भरलेलं ताट आण..."

गणपतराव खादाड आहते हे त्याच्या लक्षात आलं...त्याने झपकन हवेत हात फिरवून पंचपक्वानांनी भरलेलं ताट त्यांच्यापुढे सादर केलं...

"साहेब, दुसरं काम सांगा..."

"एक दोन साडे माडे तीन...जा माझ्यासाठी उंचीतले कपडे आण....!!!"

त्यांच्या मागण्या किती संकुचित आहेत हे राक्षसाने ओळखलं असावं बहुतेक. त्याने हवेत हात फिरवला आणि काय आश्चर्य...भारीतले कपडे हजर...!!!

गणपतराव भलतेच खुश झाले.


"आता शेवटचे काम सांगा साहेब, म्हणजे मी मुक्त होऊ शकेन..."-आता राक्षसाच्या चेहऱ्यावरही टवटवी आली होती.

आता शेवटची मागणी मात्र संकुचित करायची नाही. आता काही तरी मोठ्ठं मागायचं असं गणपतरावांनी ठरवलं....आणि केली सुरुवात....

"एक दोन साडे माडे तीन...मला जगातला सर्वात यशस्वी पुरुष बनव....!!!"

आणि काय आश्चर्य....!!!!! दिव्यातून धूर बाहेर पडला...आणि पाहतात तर काय...राक्षस पुन्हा दिव्यात...!!!!

गणपतराव गोंधळून गेले. पाहतात तर काय...दिव्यातून राक्षस मोठमोठ्याने रडत होता.

"अरे पण झाले तरी काय नक्की...?"

"साहेब...तुम्ही पंचपक्वानांचं ताट मागीतलंत. ते मला शक्य होतं. एका मोठ्या सेव्हन स्टार हॉटेलमधून ते मी आणून दिलं...तुम्ही भारीतली कपडे मागीतलेत...ते सुद्धा एका महागड्या मॉलमधून मी आणून दिले..."

"मग?????"- गणपतरावांनी आश्चर्याने विचारले.

"अहो, पण यशस्वी असे सहजासहजी नाही होता येत...जीवनात यशस्वी व्हायला कुठलाच शॉर्टकट नाहीय या विश्वात. त्यासाठी अतोनात प्रयत्न, मेहनत, चिकाटी, हिम्मत..याच गोष्टी कराव्या लागतात. आयतेच कुणीही यशस्वी झालेले मला तरी आठवत नाही. आणि तुम्हाला यशस्वी बनवणं मला शक्य नसल्यामुळेच मी पुन्हा बारा वर्षांसाठी दिव्यात अडकून पडलो..."

गणपतरावांनी केवढी मोठी चूक केली होती ती त्यांच्या लक्षात आली. त्यांच्यामुळेच राक्षस पुन्हा दिव्यात अडकून पडला हे पाहून गणपतरावांना वाईट वाटले...

पण पुढील बारा वर्षांनी मात्र मी तुझी अवश्य सुटका करीन असे त्याला आश्वासन देऊन गणपतराव माळ्यावरुन खाली उतरले.

आणि इथून पुढे यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घ्यायची, प्रयत्नांची पराकाष्टा करायची असे गणपतरावांनी मनोमन ठरवले.....


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 लेखन-प्रविणसर

स्वर्गाची (रिटर्न) वारी !

आमच्या गावातले गोपीचंद मास्तर १० वेळा स्वर्गात जाऊन आलेत अशी गावभर चर्चा होती. पण ते स्वर्गात गेले कसे आणि कुठून हे मात्र कळायला अजिबात मार्ग नव्हता. चांगलं वागलं की माणूस स्वर्गात जातो आणि वाईट वागलं की नरकात एवढंच काय ते आम्हाला माहीत होतं. पण हे मास्तर चक्क १० वेळा स्वर्गात जाऊन आले म्हणजे कम्मालच होती. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. शेवटी ठरले या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.

एके दिवशी गोपीचंद मास्तर आपल्या जावयाकडे वस्तीचे राहायला गेल्याची संधी साधून इकडे गावाने मिटींग बसवली.

"मास्तर गावात राहूनही स्वर्गात जाण्याचा आम्हाला पत्ता लागून देत नाहीत म्हणजे काय...!!! आम्हाला पण जायचंय स्वर्गात..."
-नामदेव पवार बरळला.

"आरं पण त्यासाठी मरावं लागतं. तू हायेस का मरायला तयार बोल?" धोंडोबाने फिरकी घेतली.

"आरं मास्तर पण जीतं हायेत न्हवं, मं ते कसं काय गेलं स्वर्गास्नी??"

या पांडूच्या प्रश्नावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. उद्या मास्तर आले की त्यांना जाब विचारायलाच हवा असा निर्णय ठरला...

"जायचं तर सगळ्यांनीच जायचं स्वर्गात, नाहीतर कुणीच नाही, मास्तरानी पण नाही..!!!"- गावच्या प्रमुखानं निर्णय दिला.

कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि आम्ही मास्तरांना विचारतोय असा विचार करुन जो तो झोपी गेला.

दुसरा दिवस उजाडला. सगळे ऊठले. मास्तर नुकतेच आले होते घरी. एकेक करता सारा गाव मास्तरांच्या घरी जमला...गावाच्या समोर मास्तरांना बसवले...

"मास्तर, आता नाय म्हणू नका...पण तुमी स्वर्गात जाऊन आलाय बऱ्याच वेळा हे आम्हास्नी ठाऊक झालंय...!!!"

मास्तरांच्या जीवात जीव आला...नाहीतर आख्खा गाव कशासाठी घरी जमलाय या विचाराने त्यांची पाचावर धारण बसली होती.

"अच्छा अच्छा ते होय...!!! मला आला कंटाळा की जातो स्वर्गात...आणि परत यावंस वाटलं की येतो परत..." मास्तरांनी पुडी सोडली...

"मास्तर माझा बा भेटला काय हो तिकडं? हीथं नुसता दारु ढोसायचा..."- सदा घोडकेने विचारलं.

"अरे बाबा, तुम्हाला माहीत आहे ना वाईट गोष्टी केल्या की माणूस नरकात जातो...मग तुझा बाप स्वर्गात कसा भेटणार....!!!"
-मास्तर.

"म्हणजे आम्हाला स्वर्गात जायचं तर कायतरी चांगलं काम करावं लागणार की काय?"- शेवंतानं डेअरिंग करुन विचारलं...

"हो तर, त्या शिवाय का जाता येणार आहे?...तुम्ही सगळ्यांनी चांगलं वागायला सुरुवात करा...एका महीन्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना जरुर स्वर्गात घेऊन जाईन..."- मास्तरांनी आश्वासन दिलं.

गावकऱ्यांनी कसं चांगलं वागायचं, कोणत्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या मास्तरांकडून समजावून घेतल्या.

त्या दिवसापासून गावात, आणि गावातील माणसांच्यात अमुलाग्र बदल झाला. नेहमी खोटं बोलणारे अगदी खरं बोलू लागले. शाळेत न जाणारी ऊनाड मुले शाळेत जाऊ लागली. दारु आणि व्यसनं करणाऱ्यांनी सारी व्यसनं सोडली. प्रत्येकाची अगणं स्वच्छ झाली. रंगरंगोटी झाली. वैयक्तीक स्वच्छता वाढली. लोक एकमेकांशी प्रेमभावनेने बोलू लागले, एकमेकांना मदत करु लागले. प्रत्येकाने अतिशय सभ्यपणा स्विकारला होता. कारण स्वर्गात प्रत्येकालाच जायचे होते.

महीना संपला. १ तारखेला ठरल्याप्रमाणे गावकरी मास्तरांच्या घरी जमा झाले. मास्तरांनीही होकार दिला. आणि सुरु झाली स्वर्गाची वारी...!!!

'आपल्याला स्वर्गात बसने जायचं आहे' असं मास्तरांनी सांगताच सस्पेन्स वाढला. सगळे बसस्टॉपवर ऊभे होते.

'स्वर्गात जाणारी बस कुठली?'
'ड्रायव्हर कोण असतो'
नुसती चर्चा.

शेवटी एक रिकामी बस आलीच आणि मास्तरांनी सगळ्यांना बसमध्ये बसण्याची सूचना केली. ड्रायव्हर आपल्यासारखाच साधा माणूस बघून सारे अवाक् झाले.

आणि गाडीचा स्वर्गाच्या दिशेने प्रवास सूरु झाला. सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती.
 काही अंतर प्रवास केल्यावर अचानक गाडीला ब्रेक लागले...!!! उत्सुकतेने प्रत्येकजण खाली उतरला...समोर होती एक मस्त मोठी इमारत...प्रवेशद्वारावर भली मोठी पाटी- 'स्वर्ग'...!!!

प्रत्येकाने स्वर्गात प्रवेश केला. वाह..! लई भारी. रंगरंगोटी जिकडेतिकडे, गार हवा, थंड पाणी, सरबते, पंचपक्वाने...!!! गावकरी भारावून गेले. पक्वानं वाढायला सुंदर अशा अप्सराही होत्या. सर्वांनी खाण्याची मजा लुटली.

"चला आता तुम्हाला संपूर्ण स्वर्ग दाखवतो"- असे म्हणून मास्तरांनी गावकऱ्यांना आसपासच्या परिसरात नेले. अतिशय सुंदर घरे, स्वच्छता, चांगुलपणा जिकडेतिकडे पसरल्यासारखा वाटत होता...स्वर्गातील लोक अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या वर्तनाचे वाटत होते...जिकडे तिकडे झाडांनी, फुलांनी शोभा आणली होती. लोकांनी स्वर्गात आणल्याबद्दल मास्तरांचे आभार मानले...! !!

प्रत्येकजण मास्तरांच्या पायांवर डोके ठेवत होता...!!!

मास्तरांनी सर्वांची हात जोडून माफी मागीतली.
"मला माफ करा ग्रामस्थ मंडळींनो...!!!"

सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. काय भानगड आहे ते कुणाच्याही लक्षात येईना.

"मित्रांनो, हा स्वर्ग नसून आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आदर्श गाव आहे...!!! तुम्ही 'स्वर्ग' नावाची जी पाटी वाचलीत ते इथले एक झक्कास उपहारगृह होते स्वर्ग नावाचे. मी तुमच्याशी खोटं बोललो. पण चांगलं वागल्याने इथे पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करता येतो हे तुम्हाला पटवून द्यायचे होते...म्हणून हा सारा खटाटोप...तोही आपल्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून मी पुढाकाराने घडवून आणला..."

लोकांना यावर काय बोलावे तेच कळत नव्हते.
त्यावर सरपंचांनी पुढे होऊन टाळ्या वाजवल्या आणि मग त्यांचे अनुकरण करत आख्खा गाव टाळ्या वाजवू लागला...!!!

"मंडळीनो, मी अशा दहा गावांना आजपर्यंत भेट दिल्यामुळेच मी दहा वेळा स्वर्गात जाऊन आलोय असे तुम्हाला सांगीतले होते."

एव्हाना सगळ्यांची ट्यूब पेटली होती....
स्वर्गाचे अमिष दाखवून मास्तरांनी आपल्याही गावाचा महीन्याभरात जणू स्वर्गच करुन टाकला आहे हे साऱ्यांच्या लक्षात आले...
आणि मग सुरु झाली...आपल्याच स्वत:च्या स्वर्गाची वारी....!!!

 ______लेखन-प्रविण निकम