काल कामावरुन घरी येत होतो. सध्या कामाचा व्याप खुप असल्याने जरा ऊशीरच झाला होता. मी बाईकचे एक्सेलीटर वाढविले. आणि भर रस्त्यात मध्येच ब्रेकवर करकचून पाय द्यावा लागला....जोराने काच फुटावी तसा रस्त्यावर माझ्या पुढ्यातच आवाज झाला...
"खळ्ळळळ....!!!"
माझ्या शरीरातून जणू विज संचारुन आरपार गेल्याचा मला भास झाला.
मी मान जमिनीकडे वळवली आणि पाहतो तर काय !
...पुढ्यातच सगळ्या काचा दिसत होत्या. जणू एका बाटलीने चक्क आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याचे त्यातून व्यक्त होत होते.
अचानक काय घडले म्हणून रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. ट्रॅफिक जॅम झाली होती पण मग हळूहळू एकाबाजूने गाड्या बाहेर निघत होत्या. मी बाईकवरुन उतरलो आणि आश्चर्याने निरखून पाहू लागलो. त्या बाटलीच्या शरीराचे तुकडे सर्वत्र विखुरलेले दिसत होते. मला राहावले नाही म्हणून मी त्या तुकड्यांमध्ये शोधाशोध सुरु केली. आणि माझ्या हाती एक मोठा पुरावा सापडला.
बाटलीने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे संपूर्ण आत्मकथन असलेली ती चिठ्ठी मी मनातल्या मनात वाचू लागलो....
सुखापूर गावातली ती गोष्ट. नाव सुखापूर परंतू सुखाचा पूर येईल अशी कल्पना स्वप्नातही त्या गावात केली जात नव्हती. त्याचे कारणही साजेसे होते. गाव तसा आर्थिकदृष्ट्या बेताचा. मोलमजूरीवर गुजराण करणारी जोडपी. दिवसभर परक्या गावातील सावकाराच्या शेतांमधून राबराब राबणारी. श्रीमंती त्यांच्या गावाकडे फिरकेल अशी आशाही संपूष्टात आलेली. सर्व बायका आणि पोरे नुसती चिंताग्रस्त असायची. त्याचे कारणही योग्य होते. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष दारुच्या आहारी गेलेला. प्रशासनाचे बाटली आडवी करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले. कारण जास्त दराने विक्री करणारे दलाल तयार झालेले....
दिवसभर राबराब राबायचे. जो काही थोडा पैसा मिळायचा तो ही पुरुष मंडळी दारुच्या आहारी घालवायची. कष्ट करुनही त्याचे चीज होत नव्हते. बायका पोरे प्रसंगी उपाशी राहत होती.
मोठमोठ्या व्यक्ती गावात व्याख्याने देऊन गेली. समुपदेशकांनी समुपदेशन केले. पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पण छे ! कुठलाच उपाय रामबाण ठरत नव्हता. आता स्त्रियांनीच बंडाचे निशाण फडकावले. जोडप्यांमध्ये रोज कडाक्याची भांडणे होऊ लागली. त्याचाच उलटा परिणाम म्हणजे पुरुष बायकांना मारहाण करु लागली...आणि मग मात्र कहर झाला. स्त्रियांनी आत्महत्येचा ईशारा दिला....दोघांच्या भांडणात मुलांची वाताहात झाली.
...या सर्व विनाशाला फक्त एकच कारण होते ती म्हणजे बाटली !!
आपल्यामुळेच कित्येकांच्या जीवनाची, संसाराची राखरांगोळी होतेय हे बाटलीला सहन झाले नाही. प्रशासन उभी असलेली बाटली आडवी करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. खरे तर बाटली आडवी नव्हे तर फोडून टाकण्याचीच नितांत गरज होती. आपल्यामुळे स्रिया आत्महत्या करणार या विचाराने स्वत: बाटलीच अस्वस्थ झाली आणि मग बाटलीनेच निर्णय घेतला.....'स्वत:च आत्महत्या करण्याचा !'
चिठ्ठी वाचून झाली होती. खुप वाईट वाटले. दारुच्या आहारी आजकाल पौढांसह तरुण पिढीही जात असल्याने मलाही अस्वस्थ व्हायला झाले. भारतात नव्हे अख्ख्या जगात अशी दारुने घात केलेली कितीतरी कुटुंबे सापडतील. सुखापूरसारखी कितीतरी गावे आजही आपल्या भारतात आहेत.
विचार केला...'लोक अजूनही दारुत सुख शोधतात. दु:ख झालं की ते दारुत विरघळवण्याचा प्रयत्न करतात. कुणी अगदी टाईमपास म्हणूनही पितात तर कुणी यातले कारण नसताना निव्वळ नशेसाठीही पितात.
पितात तेही देहभान विसरुन....आणि पुन्हा कधीही भानावर येत नाहीत.
"चला, यापुढे आपल्यामुळे एखादा जरी दारुच्या जंजाळातून बाहेर पडला तरी खुप होईल असा विचार करुन मी भर रस्त्यातील अस्ताव्यस्त बाटलीच्या काचा गोळा करुन कचराकुंडीत टाकून दिल्या आणि मगच घरचा प्रवास केला...
____________________________________________
लेखन:- श्री. प्रविण निकम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा