मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

वनिता जागीर

दर पाच दहा मिनिटांनी छनछन असा आवाज होत होता. आवाज झाला की तिची नजर भांड्याकडे वळत होती...पुन्हा डोके वर करुन छोट्याशा नजरेने ती वरच्या दिशेला पाहायची आणि थोडं स्मितहास्य करुन मग पुन्हा पुढच्या 'छनछन'ची वाट पाहायची. खाली जमीन आणि वर तळपणारा सूर्य...पायात चप्पल नाही अन् अंगातील कपड्यांना ठिगळं लावलेली.

छोटी वनिताला आज मात्र पायाला बसणाऱ्या चटक्यांची तमा नव्हती. तिला कसेही करुन दुपारपर्यंत दीडशे रुपये गोळा करायचे होते. आतापर्यंत शंभर जमले होते. अजून पन्नासाची गरज होती. त्या शहरातल्या नगरपालिका शाळेने शाळाबाह्य मुलांचा सर्वे केला त्यात त्यांना वनिताचा शोध लागला होता. मग वनिता दुपार सत्रांत शाळेत जायला लागली. शिक्षकांनी तिचं नाव वयानुरुप प्रवेश देत डायरेक्ट सहावीच्या इयत्तेत घातलं होतं. ती मराठी गणितात तशी बऱ्यापैकी होती पण पैशांचे मोजमाप तिला अचूक करता यायचे कारण चौकातल्या बस स्टँडजवळ उन्हातान्हात उभे राहून भिक मागून खाण्याची वेळ तिच्यावर आली होती. ती वयाने लहान असली तरी घरची जणू कर्ती मुलगी होती. तिची आई तिच्या लहानपणीच अपघातात वारली होती आणि बाप तर असूनही नसल्यासारखाच होता. दिवसभर भिक मागून मिळवलेल्या पैशाची दारु प्यायची आणि कुठेतरी काहीतरी खाऊन दिवस घालवायचा हा त्याचा दिनक्रम.

शेवटी कसाही असला तरी तो आपला बाप आहे ही जाणीव वनिताला होती. आज तिला दीडशे रुपये मिळवायचे होते कारण चाळीस रुपयांचे चार वडापाव आणि दहा रुपयांच्या तापाच्या गोळ्या तिला तिच्या बापासाठी न्यायच्या होत्या. उरलेले शंभर रुपये तिला चौकात बोर्ड लावलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी भरायचे होते. स्पर्धा उद्याच्याच दिवशी होणार होती.

वनिताला शाळेकडून एक शाळेचा ड्रेस मोफत भेटला होता. सारखा तोच धुवायचा आणि सुकवून घालायचा असा तिचा दिनक्रम चालू होता. शाळेत जायला लागल्यापासून ती स्वच्छ आणि साफसुधरी राहू लागली. पण तिचा बाप मात्र अजागळ होता. दारुमुळे त्याची हालत खराब झाली होती.

एक माणूस चालत वनिताजवळ आला. त्याने खिशातून काही काढून भांड्यात टाकले आणि तो निघून गेला. नाण्यांचा छनछन आवाज का झाला नाही म्हणून वनिताने खाली भांड्यात पाहीले आणि तिला आश्चर्य वाटले. तो माणूस चक्क पन्नास रुपये भांड्यात टाकून पुढे निघून गेला होता.

वनिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती भांडं घेऊन पटकन उठली. सगळे पैसे थैलीत टाकले आणि ती औषधाच्या दुकानाकडे झपझप पावले टाकू लागली. रात्री बापाचं अंग तापलं होतं हे तिच्या लक्षात होतं.

"दादा तापाच्या गोल्या द्याल का ह्याच्या.." वनिता दहाची नोट सरकवत म्हणाली.

मेडीकलच्या मालकाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि चार गोळ्या दिल्या. गोळ्या थैलीत टाकून वनिता आता वडापवच्या हातगाडीकडे निघाली..

"भाऊ गरम वडापाव दे की रं...बापाला पायजेल.."

गिऱ्हाईकांची गर्दी असल्याने वडापाववाल्याला बोलायला वेळ नव्हता. त्याने पेपराच्या कागदात चार वडे, चार पाव आणि दोन मिरच्या बांधून दिल्या.

आता मात्र जिंकल्याचा अविर्भाव तिच्या डोळ्यांत दिसत होता. ती घरी गेली. घर कसले कापडं बांधून बनवलेला छोटा तंबूच होता तो. बाप हातभट्टी पिऊन नशेत काहीबाही बरळत होता.

"बापा उठ रं..बघ खाऊन घे आनि ह्या गोल्या खा...बघ आंग थंडगार पडल."

तिच्या बापालाही वनिताची काळजी होती पण दारुपुढं त्याची मति गेली होती. चांगलं वाईटाची जाण हरपली होती. त्याला खुप वाटायचं की पोरीला मोठ्ठं कुणीतरी बनवायचं पण दारुने त्याला हतबल बनवलं होतं...

तो उठला. पेपराची पुडी सोडून त्यातल्या वडापावच्या दोन वाटण्या केल्या. पण वनिताने लगेचच आपल्यातला एक वडापाव बापाच्या पुढ्यात ठेवला.

"आगं खा की..."

"नको ...मी खाल्लंय रं मगाशीच...तुजं दोनानी काय व्हतंय बापा...तापात तू जरा खाशील तर दमनार नाहीस...होशील बरा लवकर...खा नि मग औषध खा..."

"वने तू जातेय न्हवं शालेला?"

"व्हय..."

एक वडापाव आणि दोन ग्लास पाणी पिऊन वनिताचं पोट फुल्ल भरलं. रस्सीवरचे शाळेचे कपडे तिने हाताने काढले. केसांना फणी लावली मग पायांच्या गाडीने निघाली शाळेला.

शाळा एक किलोमीटर अंतरावर होती. शाळेतील शिक्षक तिच्याशी खुप चांगले वागायचे मात्र इतर मुले तिला सहसा जवळ घ्यायची नाहीत. कारण होते फक्त एकच...ती चौकात भिक मागायची म्हणून ! पण करणार तरी काय....देव काहींना खुपच खडतर आयुष्य देतो. पण वनिता सारे काही तक्रार न करता सहन करायची...देवाने आयुष्य खडतर दिले असले तरी ते सहन करण्याची शक्ती आणि समज मात्र या छोट्याशा वयात तिला दिली होती.

संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली. वनिता संध्याकाळीही भिक मागूनच रात्रीच्या खाण्याची सोय करायची. कारण दारुमुळे बाप काम करत नव्हता आणि बालकामगारांना बंदी असल्याने वनिताला कुणी कामावरही ठेवत नव्हते...नाईलाजाने तिला तो मार्ग पत्करावा लागला होता. रात्री सुद्धा वडापाव खाऊनच ते छोट्याशा तंबूत झोपी गेले.

सकाळ झाली. आज रविवार होता. वनिताची ऊठून तयार होण्याची घाई चालली होती. तिने बापाच्या कपाळावर हात ठेऊन पाहीले. अंग गार होतं. मग तिने त्याला हलवलं...

"बापा ऊठ रं..."

"का गं..आज सुट्टी हाय न्हवं?"

"हो रं...माजं काम हाय यक...मी जातेय."

"बर्र जा.." बाप अर्ध्या झोपेच्या तंद्रीत बोलला.

चौकाच्या बाजूलाच असलेल्या हॉलमध्ये आज कुठल्यातरी संस्थेने चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्याचा चौकातला बोर्ड वनिताची नजर वेधून घेत होता. प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते पाच हजार रोख...!

वनिता हॉलमध्ये पोहोचली. अंगात तोच शाळेचा ड्रेस होता. तिने फ्रॉकच्या खिशातून पन्नासची एक नोट आणि बाकीची चिल्लर नाणी बाहेर काढली...समोरच नाव नोंदणी करणारा माणूस बसला होता. वनिताची नजर त्याच्याकडे गेल्यावर तिला मोठे नवल वाटले. तो माणूस तोच होता ज्याने तिच्या भांड्यात पन्नासची नोट टाकली होती...

वनिताने न राहवून त्याबद्दल त्या माणसाला विचारलेच...

"हो गं बाळा...तू चौकात असताना मधून मधून पाच ते सहा वेळा स्पर्धेच्या बोर्डजवळ येऊन गेलीस. तो बोर्ड तू सारखाच निरखून पाहत होतीस. मी ते सारे इथून पाहीले. तुला यात भाग घ्यायचाय हे मी ओळखले...पण तुझी पैशांची अडचण असावी असे वाटले म्हणून मी ते पैसे टाकले..."

स्पर्धा सुरु झाली. कागद, पेन्सील, कलर, पट्टी, रबर सारे काही तिथे स्पर्धकांना फी च्या शंभर रुपयांत पुरवले गेले. वनिताच्या वयाचेच बरेचसे स्पर्धक होते साधारण दहा ते बारा वर्षांचे..

एक तास पूर्ण झाला. स्पर्धा संपली. प्रत्येकाची चित्रे गोळा केली गेली. एक तासाने निकाल जाहीर होणार होता. प्रथम क्रमांकाच्या  विजेत्याला नगरसेवकांकडून पाच हजाराचे बक्षीस दिले जाणार होते...सर्व स्पर्धकांच्या मनाची घालमेल सुरु होती. कोण विजेता ठरेल कुणाला काहीही अंदाज लावता येत नव्हता.

बक्षीस वितरणासाठी नगरसेवकांची गाडी आली. मागे दोन सुरक्षारक्षक होते. रांगेत शेवटी बसलेली वनिता हे सर्व भोळ्या नजरेने पाहत होती...बक्षीस वितरणाला सुरुवात झाली.

"तृतीय क्रमांक मिळाला आहे...." नगरसेवक असे म्हणताच सर्वांचे कान टवकारले गेले...

".....कुमार रोशन वानखेडे शाळा जॉन्सन इंग्लिश मिडीयम स्कूल याला...."

सर्वांनी टाळ्यांनी अभिनंदन केले.

नगरसेवक पुढे बोलू लागले....

"द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेय.....कुमारी श्वेता सिंग, सुभेदार हायस्कूल...."

पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला...

आता मात्र सर्वांचीच ऊत्सूकता ताणली गेली होती. नव्हे शिगेलाच पोहोचली होती !

हॉलमध्ये एकदम शांतता ! टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल इतकी...
आणि नगरसेवकांच्या तोंडून शब्द निघाले.....

"होय...तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचे नाव आहे वनिता जागीर नगरपालिका शाळा...$$$"

वनिता भारावल्यासारखी शेवटच्या रांगेतून ऊठली. पण रोज चौकात भिक मागणाऱ्या मुलीला पहिला नंबर मिळाला असल्याने टाळ्यांचा गजर होईना....सगळे सुन्न आणि स्तब्ध झाले होते.

..इतक्यात हॉलच्या दरवाज्या बाहेर कुणीतरी टाळ्या वाजवत आत आलं ! वनिताने कोण म्हणून बाहेर पाहीलं...तिचा बाप होता तो. पोरीला पाहायला सहज चौकात आला होता पण माईकवर पुकारलेले तिचे नाव ऐकताच तो हॉलकडे धावला होता. वनिता भारावून गेली. होती. दरवाजात जाऊन तिने बापाला स्टेजवर आणले. नगरसेवकांनी प्रशस्तीपत्रक आणि पाच हजार रोख बक्षिस तिच्या हातावर ठेवले...आणि अजून एक माणूस आनंदाने टाळ्या वाजवू लागला...

होय...तोच माणूस ज्याने पन्नास रुपये तिच्या भांड्यात टाकले होते...मग जेव्हा स्वत: नगरसेवकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. एखादी गोष्ट लगेच पचनी पडत नाही याचे याची देही याची डोळा जिवंत उदाहरण होते ते !

नगरसेवक मात्र त्या पोरीचे कौतुक करताना थकत नव्हते. त्यांना तिचा अभिमान वाटत होता...त्यांनी लगेचच तिला दत्तक घेऊन तिच्या पुढील सर्व शिक्षणाचा सगळा खर्च करीत असल्याचे उपस्थितांसमोर जाहीर केले. दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रांत वनिता झळकली होती. मदतीचे हात पुढे आले. त्या माणसाच्या पन्नास रुपयांनी जणू कमाल केली होती.

राजकारणी फक्त आश्वासने देतात ही सर्वसामान्यांची समजूत पण आज ही मुलगी M.B.B.S च्या दुसऱ्या वर्षाला आहे हे पाहीले तर खात्री पटते की सगळी माणसे सारखी नसतात...माणसांमध्येही काही देवमाणसे असतातच...

आज तिचा बाप छोटेसे दुकान चालवतोय. पोरीची प्रगती पाहून बापही सुधारला होता.

काळ खडतर आयुष्याचेही सोने करु शकतो हेच खरे !
________________________________________
कथा लेखक- श्री. प्रविण निकम


रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आत्मविश्वासाचा मंत्र

रायपूरचा राजा चंद्रदेव सध्या खुपच चिंतेत होता. त्याचे राज्य खुपच लहान. जेमतेम एक हजाराच्या आसपास सैन्य होतं त्याच्याकडे. त्यामुळेच आसपासचे बलाढ्य राजे रायपूरवर आक्रमण करण्याचा नेहमीच मनसुबा करीत.

एकदा शेजारील ब्रम्हपूरचा बलाढ्य राजा बलदेव हा रायपूरवर आक्रमण करुन ते राज्य जिंकण्याचा विचार करत आहे अशी वार्ता एक गुप्तहेर घेऊन आला. राजा चंद्रदेव काळजीत पडला. कारण राजा बलदेवकडे जवळजवळ २०००० सैन्य होतं आणि राजा चंद्रदेवकडे फक्त १०००.

चंद्रदेव राजाची चिंता वाढू लागली. राजाने अन्नपाणी सोडले. प्रजाही भयभीत झाली. सैन्यही पूरते घाबरुन गेले. संपूर्ण रायपूर नगरीवर जणू भीतीचेच साम्राज्य पसरले होते.

राजा मात्र आता दरबारातील बुद्धीवंतांचा सल्ला घेऊ लागला. दरबारात तशी खुप विद्वान मंडळी होती परंतु बलदेवाचे आक्रमण कसे परतून लावायचे यावर कुणाकडेच काही उपाय नव्हता.

शरणागती पूर्वी शेवटचा उपाय म्हणून राजाने राज्यात दवंडी पिटवली. आक्रमणाविषयी प्रजेला माहीती देण्यात आली. कुणाकडे काही जालीम उपाय असेल तर दरबारात यावे...राजा त्याला सुवर्ण मुद्रांनी मढवून टाकेल असेही सांगण्यात आले...

नेहमीप्रमाणे दरबार भरला. दरबारातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचाच लवलेश होता. राजा, सेनापती अस्वस्थ दिसत होते. इतक्यातच दरबारात एका साधूने प्रवेश केला. लांब दाढी, कपाळाला टिळा लावलेल्या साधूला सेवकांनी राजापुढे हजर केले.

"महाराजांचा जयजयकार असो."

"या साधू महाराज, तुमचे दरबारात स्वागत आहे. युद्धाविषयी,आक्रमणाविषयी आपल्याला काही सांगावयाचे आहे का?"- राजाने चौकशी केली

"होय महाराज, आपण सगळे घाबरुन गेले आहात. कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे म्हणून."

दरबीरातील सर्व साधूच्या बोलण्याकडे टक लावून पाहू लागले.

"महाराज, निव्वळ सैन्य कमी आहे म्हणून घाबरणे योग्य नाही. सैन्य कमी आहेच परंतु आपण आपला आत्मविश्वासही गमावला आहे.
युद्ध हे सैन्याच्या बळावर लढले जाते हे खरे आहे पण त्याही पेक्षा ते आत्मविश्वासाच्या बळावर जास्त लढले जाते."- साधू.

साधू महाराज आता पुढे काय बोलणार याबाबत राजासह सर्वांचीच ऊत्सुकता वाढली.

"महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. बोलण्यास क्षमा असावी. परंतु आपण मला परवानगी दिलीत तर आपल्या फक्त एक हजार सैन्याच्या बळावरच मी हे युद्ध जिंकून दाखवेन...!!!"

साधूच्या या बोलण्यावर दरबार अवाक् होऊन स्तब्ध झाला. आता पर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त पराभवाचेच शब्द होते...पहील्यांदाच कुणीतरी युद्ध जिंकण्याची भाषा बोलले होते. ती व्यक्ती सुद्धा कुणी युद्धातील तरबेज व्यक्ती नव्हती तर ते होते साधू महाराज...

सततच्या जप आणि ध्यानामुळे साधू महाराजांचा आत्मविश्वास खुप मोठा होता.
राजालाही आश्चर्य वाटले. एक साधू युद्ध जिंकण्याची भाषा बोलतोय आणि आपण मात्र ऊगाचच घाबरतोय हे त्याच्या लक्षात आले. आपण घाबरल्याने दरबारातील सर्वांचाच आत्मविश्वास ढळून गेलाय, सैनिकही घाबरुन गेलेत हे राजाच्या चांगलेच लक्षात आले.

कितीही कठीण परिस्थिती असली तरी घाबरुन जायचे नाही, त्या परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करायचा हा मंत्र राजाला नव्याने मिळाला होता...

राजाचा आत्मविश्वास वाढला. दरबारातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढला. सैनिकही जोमाने युद्धास तत्पर झाले. प्रजाही आत्मविश्वासाने तळपली.

साधूमहाराजांनी दरबारात येऊन प्रत्येकात आत्मविश्वास फुंकण्याचे महत्त्वाचे काम केले होते. राजाने देऊ केलेल्या सुवर्ण मुद्रा न स्विकारताच साधूंनी दरबारातून प्रस्थान केले.

पुढे घनघोर लढाई झाली. राजा चंद्रदेवकडे जरी १००० सैन्य होते तरी ते शत्रूच्या २०००० पेक्षाही जास्त होते कारण त्या एक हजार सैन्याकडे जो आत्मविश्वास होता तो वीसहजार  सैन्यांची तुलना करेल इतका होता.

आत्मविश्वासाच्या बळावर सैन्य तुटपुंजे असूनही राजा चंद्रदेवने युद्ध जिंकले...राज्यात सगळीकडे गोड पक्वाने वाटून आनंद साजरा करण्यात आला....एक नवा मंत्र सगळ्यांना मिळाल्याने आता कुणाच्याच चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता....

लेखन-प्रविण निकम
(जून्या ऐकीव कथेवर आधारीत)


________________________________________

बाप बेटीचं नातं...

लेखन- श्री. प्रविण निकम

श्री. सारंगे ज्यूनीअर कॉलेजवर प्रिंसिपल या पदावर कार्यरत होते. त्यांची शिस्त आणि दरारा आख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्यांनी बोलायचं आणि इतरांनी त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानूनच झेलायचा..असे जणू समीकरणच बनले होते.

सारंगे सरांनी कॉलेजमधील कडक शिस्त घरीही आणली होती. त्यांच्या घरीही जणू सर्व काही शिस्तबद्ध असायचे. सारंगे सरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की तो जणू अंतिमच अशीच घरातील सर्वांची धारणा झाली होती. त्यांची बायकोही त्यांना 'सर' म्हणायची आणि स्वत:ची मुलेसुद्धा सरच म्हणायची..! 

सरांनी स्वत:च्या घराचंही जणू शिस्तबद्ध कॉलेजच बनवून टाकलं होतं...जे कॉलेजमध्ये तेच घरी. माणसाचं वागणं सर्व ठिकाणी सारखंच असावं अशा मताचे ते होते...

आज त्यांनी घरातील सर्वांची मिटिंग बोलावली. होय..संवाद नव्हे चक्क मिटिंगच म्हणा !त्यांच्याकडे भावनांचा अभाव होता म्हणा किंवा त्यांनी स्वत:ला तसे बनवले होते म्हणा... ते घरातसुद्धा ते अगदी मशीनसारखेच वागायचे...

"या घरात मी बोलेन तेच फायनल...बाकी कुणाच्या मताला काडीचीही किंमत नाही." सरांनी हुकूम सोडला.

"अहो पण..." बायको बिच्चारी साधी होती.

"तुम्ही तर एकही शब्द बोलायचा नाही आमच्यापुढे.." घरगूती मिटिंगमध्ये जणू फतवा निघाला.

मुलं बिच्चारी अगदीच गप्प होती. त्यांची तेवढी समजही नव्हती. ती नुसतीच धाक म्हणून तिथे बसायची....तोफेच्या तोंडी फक्त त्यांच्या आईलाच जावे लागायचे. ती सुद्धा पोरांसाठी मुग गिळून गप्प राहायची....

त्यांच्या घरात जणू हुकूमशाही होती...प्रेम, आपुलकी, आपलेपणा या गोष्टी कित्येक मैल दूर होत्या...

मुलांनाही पप्पा हवे होते..पण तशी सोय नव्हती...वातावरण नव्हते. मुलांची आईसुद्धा हतबल झाली होती. काहीतरी चमत्कार होईल अन् यांचे वागणे बदलेल या एकाच आशेवर बिच्चारी तग धरुन होती...

सरांच्या अशा वागण्याचे एक कारण मात्र मुलांनी शोधून काढले होते. सरांना कॉलेजात कामाचा खुपच लोड असतो. म्हणून ते घरी अशी चिडचिड करतात हे मुलांनी पुरते ओळखलेले होते.

औपचारीक मिटिंग संपली होती. सर्वजण जेवणाच्या निमित्ताने पंक्तीला बसले होते.
सरांना दोन मुलं होती. मुलगी मानसी आणि मुलगा दिनेश...मानसी पाचवीत होती आणि दिनेश सातवीत.

आज रात्री जेवताना मुलांच्या आईने सर्वांना जेवण वाढलं होतं...प्रत्येकाच्या पुढ्यात मेथीची भाजी, चपाती, आमटी आणि भात वाढला होता. वाढल्यानंतर लगेच काहीही न बोलता खायला सुरुवात करायची ही सरांची शिस्त होती. दिनू आणि सरांनी सुरुवात केली होती पण मानसी मात्र शांत होती.

"तुझ्या घशाखाली घास जात नाहीय का? गिळवत नाहीय वाटतं.." सरांच्या मशीनमधून शब्द बाहेर पडले.

"मानसी, राणी खा गं...सर सांगताहेत ना.." आई म्हणाली.

"आई मला भूक नाहीय गं.." मानसीचे निर्वीकार उत्तर.

सरांनी मानसीकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
मानसीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण नाराजी दिसत होती. पण सरांना त्याची काहीच पर्वा नव्हती. रात्री सर्वजण झोपी गेले.

सकाळ झाली. सर शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. दिनेशही ऊठला होता. आईची टिफीन तयार करण्यासाठीची लगबग सुरु होती. परंतू रोज लवकर उठणारी मानसी मात्र आज उठली नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले. आई काळजीने मानसीजवळ आली आणि तिला हलवून उठवू लागली.

"राणी, अगं उठतेस ना...उशिर झालाय शाळेला जायला. उठ पटकन..."

"आई, अगं मला जावंसं वाटत नाही गं आज शाळेला.." छोटीशी मानसी म्हणाली.

मानसीचं हे वाक्य सरांच्या कानी गेलं. तणतणतच सर बेडरुममध्ये आले.

"काय झालंय तुला? काय धाड भरलीय शाळेत जायला....?"

मानसी गप्प होती.

"मी काय म्हणतोय, कान बहिरे झाले आहेत काय तुझे.....मुकाट्याने उठायचं आणि शाळेत निघायचं. मला बाकी काही माहीत नाही."

"अहो तिला नाही जायचं आज तर राहूद्या...कशाला सक्ती करायची..." मानसीची आई बोलली.

"फुकटचं मिळतय ना...म्हणून हे सूचतंय तुम्हाला...कशी नाही शाळेत जात तेच बघतो.."

सरांच्या शरीरात जणू हुकूमशहा शिरला होता. त्यांनी मांजरांना हाकलायची काठी उचलली आणि झोपलेल्या मानसीवर एकच फटका ओढला....

"उठ....उठ म्हणतोय ना....जातेस की नाही शाळेत...."

मानसीला बसलेल्या फटक्याने ती तळमळली....सहन न होण्याइतपत तो फटका तिने कसाबसा सहन केला..डोळ्यांतून पाणी घळाघळा बाहेर पडलं पण तोंडातून रडण्याचा आवाज जराही बाहेर पडला नाही...
मुलांनी आपली सहनशक्ती जणू वाढवली होती.

"या घरात मी सांगेन तस्सच झालं पाहीजे. कुणीही आपला शहाणपणा चालवायचा नाही." सरांनी हिटलरी फर्मान सोडलं.

पण मानसी काही सरांच्या फर्मानाला जूमानली नाही. ती अंथरुणावर ऊठून बसली पण शाळेत जायला काही राजी होत नव्हती.

आता मात्र सरांच्या इगोचा कडेलोट झाला. 'आपली मुलगी आपलं ऐकत नाही म्हणजे काय'...या एकाच विचाराने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. 

त्यांनी मानसीचा हात धरला आणि तिला फरफटत आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेऊ लागले. पोरांना याची सवय होती...पण आज सरांना मात्र थोडे विचित्र वाटले. मानसीला ओढताना त्यांचा हात गरम झाला होता. मानसीचं अंग तापाने फणफणलय याची त्यांना पुसटशी जाणीव झाली. मानसीच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. ती जणू अर्धवट शुद्धीत होती. काय घडले म्हणून किचनमधून तिची धावतच आली. पाहते तर मानसीची शुद्ध हरपलेली होती. 

मानसीची आई ते दृश्य पाहून ओक्साबोक्शी रडू लागली. राणी तिचा जणू जीव की प्राण होती. काय करावे हे तिला कळेना...

"अहो...का एवढे निष्ठूर होताय, उचला की राणीला, चला न्या की पटकन दवाखान्यात...!"

सरांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुठेतरी माणूसकी शिल्लक होती. त्यांनी लगबगीने मानसीला दोन्ही हातांवर उचललं आणि ते बाहेर धावले. त्यांच्या हाताला चटके बसतील इतका ताप मानसीच्या अंगात होता. बाहेर आल्यावर तिची आई रिक्षाला हात करुन थाबण्यासाठी आर्जव करु लागली. अखेर एक रिक्षा थांबली आणि ते रिक्षात बसून जवळच्याच दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी करुन लगेचच सलाईन लावली. दोन तासांच्या औषधोपचारानंतर मानसी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली.

मानसीने डोळे उघडले. समोर तिची आई उभी होती.

"आई, सर कुठे आहेत?" मानसीने प्रश्न केला.

" ते बाहेर बसलेत.."

"आई, माझं एक काम करशील?"

"बोल राणी....नक्की करेन..."

"आई तू बाहेर जा, आणि सरांना पाठवून दे आत..."

मानसीची आईला काही कळायला मार्ग नव्हता. ती थोडी गोंधळली...पण आपल्या आजारी मुलीची इच्छा म्हणून ती बाहेर आली...

"तुम्हाला राणीने आत बोलावले आहे...."

"बरं..." सर गंभीर होते. ते आत गेले. त्यांनी मानसीकडे एक हलका कटाक्ष टाकला. पण मानसी मात्र त्यांच्याकडे अगदीच रोखून बघत असलेली त्यांना दिसली.

"बोल..." सर उद्गारले.

"पप्पा...इकडे या ना..."

सरांना काही कळत नव्हतं...ते तिच्या जवळ गेले. मानसी हलकेच उठून बसली. सरांचा हात तिने आपल्या छोट्याशा हातांत घेतला आणि म्हणाली...

"पप्पा...सकाळपासून उपाशी आहात ना...तुमचे हात किती गरम लागताहेत...ताप तर नाही ना तुम्हाला...थांबा..."

असे म्हणून मानसी धडपडत उठली...रात्री तिने जेवण करावं म्हणून तिचा भाऊ दिनेशने आमिष म्हणून तिला एक कॉफी चॉकलेट दिले होते ते तस्सेच तिच्या फ्रॉकच्या खिशात होते....तिने ते चॉकलेट गुपचूप बाहेर काढले...

"पप्पा 'आ' करा ना...प्लीज.."

मानसीच्या या बोलण्याने दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फुटला. सरांनी काही कळायच्या आतच नकळत 'आ' करुन तोंड उघडले आणि मानसीने पटकन त्यांना ते चॉकलेट भरवले...

"पप्पा आता बघा तुमच्यात शक्ती येईल..." मानसीचे भाबडे बोल बाहेर पडले आणि...

सर हुंदके देऊन ढसाढसा रडू लागले....
त्यांच्याकडे आता शब्दच नव्हते. होत्या फक्त भावना....त्यांनी रडता रडता मानसीला आपल्या छातीशी धरले....तिलाही तेच हवे होते...

"मी खूप वाईट आहे गं राणी...."

आज पहिल्यांदाच ते आपल्या मुलीला राणी म्हणाले होते....

"रात्री तुला ताप आला होता म्हणून जेवली नाहीस ना...मग मी ओरडल्यावर सांगीतले का नाहीस.?"

"पप्पा तुम्ही आमच्यासाठी किती काम करता..तुम्ही दमून घरी येता...तुम्हाला आणखी त्रास नको म्हणून नाही सांगीतलं..."

"सकाळीही मी मारलं तरी तू मुकाट्यानं मार खाल्लास बेटा....तू रात्रीपासून उपाशी होतीस, तुला ताप आला होता...तरीही मी तुला मारलं...मी निष्ठूर आहे..."

"पप्पा तुमचा हात मला कधीच लागत नाही.." मानसीच्या डोळ्यांतूनही पाणी आले.

सरांच्या मनाची घालमेल झाली...त्यांनी डोळे पुसले आणि ते तडक बाहेर पडले. मानसीची आई आत आली...तिला तर काही कळायलाच मार्ग नव्हता...

तासाभरात सर परत आले...सोबत मुलगा दिनेश होता. त्याला शाळेत जाऊन त्यांनी आणले होते. त्यांनी दवाखान्यातील त्या रुमच्या दाराला आतून कडी घातली. समोर मुलगा दिनेश, मानसी आणि तिची आई होती...
सरांना गहिवरुन आले. त्या तिघांसमोर त्यांनी सपशेल हात जोडले आणि ते ढसाढसा रडू लागले.

त्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं...

"मला माफ करा....मी चुकीचा वागलो...तुम्ही मला हवे आहात...!"

थोडावेळ वातावरणात गंभीरता पसरली...पण थोड्यावेळानंतर मात्र सगळं वातावरण छान, झक्कास झालं...सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य पसरलं होतं...

तेवढ्यात दारावरची बेल वाजली...

दिनेशने कडी काढली. डॉक्टर आत आले. त्यांनी मानसीला तपासले आणि डिस्चार्ज दिला. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर आले. 


सरांनी हातातल्या घड्याळात पाहीले. दुपारचे साडेबारा वाजले होते. सरांनी फर्मान सोडलं...
"आता आपण अजिबात घरी जायचं नाही.."

मग काय....पहिल्यांदा आईस्क्रीम..मग जेवण..नंतर सिनेमा...संध्याकाळी गार्डन...मग शॉपींग....

सर्वांनी सरांचं फर्मान अगदी आवर्जून डोक्यावर घेतलं होतं....

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

आदर्श माणसाचे मॉडेल

"विद्यार्थ्यांनो बरोब्बर तीन दिवसांनंतर तुम्ही तुमचे मॉडेल याठीकाणी सर्वांसमोर सादर करायचे आहे." आपले डोळे थोडेसे किलकिले करुन प्रोफेसर वांगी मुलांना सांगत होते.

अकरावी आर्ट्सच्या मुलांना थोडे नवलच वाटले. प्रोफेसर त्यांच्या टॅलेंटची परीक्षा घेऊ इच्छीत होते. पण मॉडेलचा विषय ऐकून जवळजवळ सर्वच विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.

"सर, विषय चेंज करुन दिलात तर बरे होईल." प्रियाने आपले मत व्यक्त केले परंतू प्रोफेसरांनी नकारार्थी मान हलवली आणि आता आपल्याला दिलेल्या विषयावरील मॉडेलचेच सादरीकरण करणे अनिवार्य आहे हे सर्व विद्यार्थी ओळखून गेले.

आणि मॉडेलचा विषयही तसा जरा आगळा वेगळाच होता..."आदर्श माणूस !"

या विषयावर काय डोकेफोडी करायची याचाच ज्याच्या त्याच्या मनात विचार सुरु होता. कँटीनमध्येही वडापाव खाताखाता हीच चर्चा रंगली होती. काहीजणांना आज वडापावही घशाखाली उतरत नव्हता. याला कारणही तसेच होते. जो उत्कृष्ट मॉडेल बनवेल त्याला त्या ज्यूनिअर कॉलेजचा जीएस म्हणून नेमले जाणार होते. आणि योग्य जीएस निवडला जावा म्हणून आता मुलांच्यातही चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातूनच स्वभावधर्मानुसार गट पडू लागले. आणि बघता बघता दोन गट पडले.

प्रोफेसर वांगी तसे शांत स्वभावाचे. आदर्श व्यक्ती खरेतर त्यांच्यातच दडली होती. पण आज त्यांनीच हा विषय दिला होता त्यामुळे त्यांना नक्की काय अपेक्षीत होते हेच मुलांच्या लक्षात येईना....

मुलांचा पहिला दिवस फक्त विचार करण्यातच गेला. कुणालाच काही सूचत नव्हते. मॉडेल नक्की कसे बनवायचे, सादरीकरण काय अन् कसे करायचे याबाबतीत प्रोफेसरांनी मुलांना पूर्णपणे सूट दिली होती. फक्त मॉडेल मधून सर्वात आदर्श माणूस व्यक्त व्हावा एवढीच काय ती त्यांची माफक अपेक्षा होती...

खरेतर प्रोफेसर वांगी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असत पण आताचा विषय जरा वेगळाच होता. मॉडेल कसे करायचे याची मुलांना चिंता होती. त्यांना जीएस होण्याची हाव अथवा आवड नव्हती पण आपल्या आवडत्या प्राध्यापकांना आपले मॉडेल कसे वाटेल, किती आवडेल याची थोडी भीती आणि उत्सुकताही होती. 

मुळात प्राध्यापकांना मुलांचं भविष्य आणि  कुमार वयातल्या जाणीवा समजून द्यायच्या होत्या आणि त्या दृष्टीने मुलेही विचार करीत होती. वांगी सरांना आपलं मॉडेल आवडावं म्हणून जणू विद्यार्थ्यांत स्पर्धाच लागली होती आणि कॉलेज हे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे जणू एक केंद्रच बनून गेले होते.

आधीच कॉलेजमध्ये दोन ग्रुप झाले होते म्हणजे आता दोन गटात उत्कृष्ट मॉडेल बनविण्याची जणू स्पर्धाच सर्वांना दिसत होती. हे दोन्ही ग्रुप प्रोफेसर वांगीसरांना आपले मॉडेल कसे आवडेल व ते कसे खुश होतील हा विचार करण्यातच गुंतले होते.

आता कॉलेज कॅन्टीनचं रुपांतर जणू कॉन्फरन्स हॉल मध्ये झालं होतं आणि सर्वांच्या विचारांची चक्र फिरु लागली होती की नेमकं करायचं काय...!

प्रियालाही अगदी काही सुचेनासं झालं होतं, कारण आदर्श माणूस हे मॉडेल म्हणून घ्यावं की जीवनशैली म्हणून काही कळतच नव्हतं.

शेवटी खुप विचार केल्यावर रुळलेल्या वाटेनं न जाता अगदी वेगळ्या वाटेनं जावं आणि समाजातल्या माणसांच्या गर्दीत माणुसकी जपणारी माणसं शोधावी आणि त्यांना एक  मॉडेल म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून बघावं हे ठरलंच. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाठ बांधली होती ती म्हणजे आदर्श माणूस शोधून काढण्याची.

...ठरल्याप्रमाणे मुलांनी तो शोध सुरु केला. खरंतर हा शोध खुप कठीण होता परंतू या मुलांसाठी तो सोपा बनला होता कारण 'पुस्तकात आदर्श शोधण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून समाजात बघावं' ही वांगी सरांची शिकवण त्यांच्या चांगलीच लक्षात होती. 

आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली होती. प्रत्येक विद्यार्थी आता आदर्श माणसाचा शोध घेऊ लागला. तसं पाहता मुलांकडे वेळ कमीच होता. या कमी वेळातच त्यांना आदर्श माणूस शोधून त्याचा अभ्यास करुन मॉडेलही ठरवायचं होतं. 

आदर्शाच्या प्रवासात मुले खुप ठिकाणी फिरली. लहान मोठ्या वाड्या-वस्त्यांना त्यांनी भेटीही दिल्या आणि तिथल्या लोकांच्या समस्या व त्या समस्या सोडवणारी माणसं ती शोधू लागली. पण हजारो मैलांचा प्रवास करुन हवं तसं यश मुलांना मिळत नव्हतं. 

ही सर्व मुलं अगदी त्यांच्या लहानपणापासूनच ज्यूनिअर कॉलेजच्या समोरील खासगी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती. ज्यूनिअर कॉलेजवर प्राध्यापक असलेले वांगी सरच ते अनाथाश्रम देणग्या गोळा करुन चालवत होते. आई-बापाविना असलेल्या या पोरांना त्यांनी कधीही आईवडीलांची कमतरता भासू दिली नव्हती इतकी प्रेमाने ते या मुलांची काळजी घेत असायचे. आता मोठी झालेली ही मुले कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती.

अशा प्रकारे लहानपणापासूनच वांगी सरांच्या विचारांत वाढलेली ही मुलं आज 'आदर्श माणूस' या मॉडेलच्या शोधात कितीतरी ठिकाणी फिरत होती. 

शेवटी आदर्श माणूस न मिळाल्यानं हताश झालेली ही मुलं परत आली आणि निशब्द झाल्यासारखी हॉस्टेलच्या पायरीवरच बसली.
वातावरणात जणू स्मशान शांतता पसरली होती. कुणाच्या तोंडून साधा 'ब्र' ही निघत नव्हता. बोलण्याची इच्छा जरी असली तरी मुलांमध्ये आता शक्ती उरली नव्हती.

मॉडेल शिवाय आपल्या लाडक्या प्राध्यापकांच्या पुढे कसं उभं राहावं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. या विचारांत सगळी मुले मग्न असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समोरच्या चिंचेच्या झाडावरच्या घरट्यातून एका पक्ष्याचं पिल्लू खाली पडलं. प्रियाने ते पाहीलं आणि ती झटकन ऊठली. तिने पिल्लाला उचललं आणि गोंजारु लागली. सचिनने त्याबद्दल प्रियाला हटकलं आणि पिल्लाला परत घरट्यात ठेऊन दिलं.

विद्यार्थ्यांचे दोन्ही गट त्या हॉस्टेलच्या पायरीवरुनच घरट्याकडे कुतूहलाच्या नजरेने पाहत होते. थोड्या वेळानं दोनचार पाखरं त्या ठिकाणी आली आणि त्या पिल्लाला चोचीने मारु लागली. सारेजण त्या दृश्याकडे अगतिकतेने व हताशपणे पाहू लागले.

इतक्यातच प्रविणच्या डोळ्यांत एक वेगळीच तगमग दिसू लागली आणि त्याने त्या सर्वांनाच वरच्या दिशेला लक्ष देण्यास सांगीतले. आकाशात विजेचा लपंडाव चालू होता. आणि एक घार चित्कारत वरुन घिरट्या घालत होती. पापणी लवते ना लवते तोच घारीने वाऱ्याच्या वेगाने खाली येत घरट्यातील पिल्लाला चोचीत पकडले आणि ती उडून गेली आकाशात !

क्षणात घडलेले हे दृश्य पाहून सर्व मुलांचे मन हेलावले. त्यांचे डोळे ओले झाले होते. एक जीव क्षणात मारला गेला होता ज्याला अजून नीटसे जग कळले नव्हते. 

सर्वांचे चेहरे पडले होते.
आणि हे दृश्य पाहता पाहता त्या सर्वांची नजर गेली समोरच्याच अनाथाश्रमाकडे ज्यावर मोठ्या अक्षरांत लिहीलं होतं 'आपलं घर !'
जिथे एवढे कोवळे जीव आजपर्यंत फुलांसारखे जपले गेले होते. सर्वांच्या नजरा आता एकटक त्या अनाश्रमाकडे होत्या....

....कारण त्या अनाथाश्रमात बसला होता एक महान असा 'आदर्श माणूस'....तो म्हणजेच प्रोफेसर वांगी सर !!!

_________________________________
कथालेखक:- Pravin Nikam & Sachin Rana
__________________________________________
टिप:- सदर कथेचा पूर्वार्ध मी लिहीला असून उत्तरार्ध श्री. सचिन राणा सर यांनी लिहीला आहे.


___________________________________________